शाळा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ जुलै २०१५

शाळा - मराठी कथा | Shala - Marathi Katha

सगळे घामाने चिंब भिजले होते आणि सगळ्यांचेच उर धपापत होते, कोणीही एक अवाक्षर देखील काढले नाही. ‘सगळेजण सुटलो बाबा एकदाचे’ असा विचार करत असतानाच आमचे लक्ष्य शाळेकडे गेले. दोन दरवाज्यांमध्ये अर्धी भिंत आणि भिंतीवर दोन मोठ्या जाळीच्या खिडक्या होत्या आणि त्याच्या मागे व्हरांडा होता. अचानक खिडकीच्या आत उजव्या बाजुला एक ज्योत पेटलेली आम्हाला दिसली. मेणबत्ती किंवा समईची ज्योत जशी दिसते अगदी तशीच ती ज्योत होती. ती ज्योत कशावर पेटली होती ते कळत नव्हते आणि कुणी पणती किंवा मेणबत्ती धरून असेल तर तेही दिसत नव्हते. जणु काही ती ज्योत अधांतरी होती. आता हळू-हळू ती ज्योत खिडकीच्या उजव्या टोकापासून डाव्या टोकाकडे सरकु लागली. दरवाज्यांना कुलपे लावलेली असताना तो माणुस आता कसा गेला आणि ती ज्योत कोणी पेटवली असा विचार मनात येतो न येतो तोच मला एक अनामिक ओढ वाटू लागली आणि नकळत मी शाळेच्या दिशेने ओढला जाऊ लागलो. शैलूच्या हे लक्षात येताच त्याने मला घट्ट पकडून ठेवले आणि वैभवला पटकन जाऊन देवीचा अंगारा घेऊन यायला सांगितले. इकडे एकट्या शैलूला मी आवरत नाही हे पाहून प्रताप आणि सचिनने पण मला पकडून ठेवले, पण मी त्या तिघांना ओढत शाळेच्या दिशेने पुढे सरकु लागलो होतो. इतक्यात वैभवने देवीचा अंगारा माझ्या कपाळावर लावला आणि मी शरीरातील सगळी ताकद गेल्यासारखा सैल पडलो. माझा विरोध मावळून गेला. थोड्या वेळाने मी भानावर आलो तेव्हा झाला प्रकार सगळ्यांनी मला सांगितला. आपण उगाच या भानगडीत पडलो असे वाटुन सर्वानुमते असे ठरले की “आपण शाळेच्या बाहेर उभे राहून माफी मागुया की आम्ही परत तुझ्या वाटेला जाणार नाही. आम्हाला माफ कर.” नंतर आम्ही सर्वांनी देवीचा अंगारा कपाळावर लावला व त्या अज्ञात शक्तीची माफी मागितली आणि आपापल्या घरी गेलो. सुदैवाने कोणी आजारी पडले नाही की कोणाला काही त्रास झाला नाही.

पुढे चौकशी केल्यावर असे कळले की पुर्वी एका तरुण वडाराचा खुन करून त्या शाळेमागच्या संडासात त्याचा मृतदेह टाकला होता. वडार लोक म्हणजे रस्त्याच्या बाजुला चर खणणारे त्यांचा पेहराव तसाच असतो फुल बाहीची बनियन, कमरेला टॉवेल आणि डोक्याला फडके. आम्हाला शाळेच्या व्हरांड्यात दिसलेली आकृती हुबेहूब त्या वडाराशी जुळणारी होती. सुदैवाने त्या शाळेत शिकणाऱ्या कोणत्याच विद्यार्थ्याला, शिपायाला किंवा शिक्षकांना एवढेच काय आजु बाजुला राहणाऱ्या लोकांनाही कधीच काही जाणवले किंवा त्रास झाला नव्हता त्यामुळे आम्ही सर्वानीच ही गोष्ट तिथेच विसरून जायचे ठरवले. आज या कथेच्या रूपाने त्या जुन्या आठवणीला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. आजही रत्नागिरीला घरी जाताना मी जेव्हा त्या शाळेवरून जातो तेव्हा शाळेकडे नजर जातेच, आणि तो प्रसंग आठवल्यावर अजुनही अंगावर सरकन काटा येतो. पण परत कधीच असा काही अनुभव तिथे आला नाही. आम्हाला दिसले ते भुत होते की आमच्याच मनात वसलेली एक प्रतिमा? कोणास ठाऊक, पण अनुभव मात्र आजही ताजा आहे जसा काही काल परवाच घडला असावा.