सात दिवस आणि सहा रात्री भाग ४

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ एप्रिल २०१८
सात दिवस आणि सहा रात्री भाग ४ - मराठी कथा | Seven Days And Six Nights Part 4 - Marathi Katha
सात दिवस आणि सहा रात्री भाग ४

त्या चौघांच्या चेहर्‍यावरून राजेशला असे वाटते कि यांचा माझ्यावर विश्वास नाही. पण तो त्यांना म्हणतो, “विश्वास ठेवा माझ्यावर. मी इथे तुमची मदत करायला आलो आहे.” राजेशचे बोलणे नेहा व अजिंक्यला पटते व ते चौघेही राजेशसोबत चर्चमध्ये जातात. चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यांची मोठी मुर्ती असते. ते पाचही जण त्या मुर्तीला नमन करतात. आता राजेश क्षणभर ही विलंब न लावता या सर्व घटनांचा खुलासा करायला लागतो. तो म्हणतो, “तुमच्या मैत्रिणीच्या शरीरात जी प्रेत आत्मा शिरलेली आहे, ती माझी पत्नी ‘प्रेरणा’ आहे.” हे ऐकून ते सर्व थक्क होतात. राजेश आता त्याच्या आयुष्यातील रहस्यांचा उलगडा करू लागतो.
“तुम्ही जशी येथे पिकनिक सेलीब्रेट करायला आला होता तसा मी देखील दोन वर्षांपूर्वी माझी पत्नी प्रेरणाला घेऊन याच दिवसात येथे हनीमून सेलीब्रेट करायला आलो होतो. प्रेरणाशी माझी ओळख कॉलेजपासून होती. आम्ही एक वर्षे लव्ह रिलेशनमध्ये होतो व नंतर आम्ही लग्नाच्या बेडीत अडकलो.”

“प्रेरणा खूप सुंदर, देखणी व रोमॅंटिक होती. तिला शरीरसुखाची फार आवड होती. जशी ती सुंदर, रोमॅंटिक होती, तशीच ती फार जिद्दी व हट्टी होती. एखादी गोष्ट तिच्या मनासारखी झाली नाही तर ती स्वतःच्या जिवाचे बरेवाईट करून घ्यायला ही ती मागेपुढे पाहत नसायची व एकेदिवशी मला या गोष्टीचा अनुभव आला. त्या दिवशी आम्ही लॉंगट्रीपसाठी लोणावळ्याला जाणार होतो. व त्याच दिवशी आई - बाबांनी मला लग्नासाठी स्थळ दाखविण्याचा घाट घातला. प्रेरणा मला सतत फोन व मॅसेजेस करत होती. मी दोन्ही गोष्टींचा रिप्लाय देत नाही हे पाहून तिने तडक माझे घर गाठले. तेव्हा घरी पाहूणे आले होते. प्रेरणाने मला शेवटचा मेसेज केला. त्या मेसेजमध्ये तिने लिहिले होते कि ‘मला भेटायला आला नाही तर मी तुझ्या घरासमोर स्वतःचा जीव देईन’ तेव्हा मी फार घाबरलो व बाहेर पाहिले असता प्रेरणा गेटजवळ स्वतःच्या गळ्याला चाकू लाऊन उभी होती. मी ताबडतोब तिच्याजवळ गेलो. तिच्या हातातील चाकू बाजूला केला. तिने लगेच माझे एक चुंबन घेतले व मला मिठी मारली. हा प्रकार घरात आलेले पाहूणे व आई - बाबांनी पाहिला. लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलेले पाहुणे बाबांना अपमानित करून निघून गेले. बाबांना तो अपमान सहन झाला नाही. रागाच्या भरात त्यांनी मला घरातून व इस्टेटीतून बेदखल केले. प्रेरणाचा माझ्या आयुष्यात येण्याने हा पहिला कटू प्रसंग माझ्या बरोबर घडला.