सात दिवस आणि सहा रात्री भाग १

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ मार्च २०१८
सात दिवस आणि सहा रात्री भाग १ - मराठी कथा | Seven Days And Six Nights Part 1 - Marathi Katha
सात दिवस आणि सहा रात्री भाग १

पिकनिकमध्ये काही मित्रांना सस्पेंन्स, भयानक घटना अनुभवयाला मिळतात व इथेच मैत्री, प्रेम आणि आयुष्याची खरी किंमत कळते व त्यांची सहा दिवसांची पिकनिक ‘सात दिवस सहा रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा.

नाशिक शहरातील ‘सेंट मेरी अ‍ॅण्ड जोसेफ’ या टेक्निकल एज्यूकेशन कॉलेजमधील स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमामधून कॉलेजची सर्वात सुंदर, रूपवान मुलगी प्रार्थना हिचा परफॉर्मन्स होणार असतो. ती आपल्या मेकअप रूममध्ये असते. तिच्या मित्रमंडळींपैकी किरण हा प्रेक्षक वर्गात बसलेला असतो तर नेहा व विवेक बाईकवरून कॉलेजमध्ये येतात. त्यांची किरणशी भेट होते. विवेक किरणला विचारतो कि “अज्या, अजिंक्य अजून आला नाही ? किरण म्हणतो, “मी त्याला ब‌र्‍याच वेळापासून फोन करत आहे. पण तो माझा फोन उचलत नाहीये.” यावर नेहा म्हणते, “अजून तरी यांचा अबोला मिटला नाही बहुतेक?”.

तेवढयात प्रार्थनाच्या परफॉर्मन्सची घोषणा होते. ते तिघेही आत जातात. प्रार्थना एका मराठमोळ्या वेशभूषेत स्टेजवर येते. छान पोपटी रंगाची साडी. केसांचा अंबाडा व त्याला माळलेली गजरा - वेणी आणि तिला निसर्गकृपेने मिळालेले नखशिखांत सौंदर्य यांमुळे ती एका हिर्‍याप्रमाणे चमकत होती. तिने एका मराठी लावणीवर जबरदस्त ठेका धरला. तिच्या नृत्यावर उपस्थितांनी टाळ्या - शिट्टयांचा अक्षरशः पाऊस पाडला. प्रार्थनाच्या नृत्याने त्या स्नेहसंमेलनाची सांगता होते. प्रार्थनाशी त्या तिघांची गाठ पडते. नेहा प्रार्थनाजवळ जाते. प्रार्थना आपली आवरावर करत असते. नेहा तिचे अभिनंदन करते. प्रार्थना तिला आपल्या नृत्याबाबत विचारते व त्या दोघी मेकअप रूमच्या बाहेर पडतात. नेहाला मनात वाटते कि ही आपल्याला अजिंक्यबाबत काही विचारेल तर ही स्वतःच्या नृत्याबाबत विचारत आहे.