स्कुबा डायव्हिंग

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जून २०१६

स्कुबा डायव्हिंग - मराठी कथा | Scuba Diving - Marathi Katha

भिंतीवर जोरात डोके आपटल्यामुळे किशोर कळवळला. त्याने इकडे तिकडे पाहिले तर तो जमिनीवर पडला होता. हाताला काही तरी ओले लागले म्हणुन त्याने पहिले तर त्याला रक्त दिसले. त्याला काहीच कळेना की तो जमिनीवर कसा फेकला गेला. जखमेवर हात दाबून धरत तो भिंतीचा आधार घेत कसाबसा उभा राहीला. सारिका बेडवर शांत झोपली होती. तिला सुरक्षित पाहून त्याला हायसे वाटले, तोच कोणीतरी त्याचा गळा आवळत असल्याची त्याला जाणीव झाली, त्याचा श्वास कोंडू लागला. तो त्या पकडीतून सुटायचा प्रयत्न करत होता पण ती पकड इतकी जबरदस्त होती की त्याचे डोळे फिरू लागले. तो हातपाय झाडू लागला, त्याची एक लाथ बेडवर बसली. त्या दणक्याने जाग्या झालेल्या सारिकाने लाईट लावला, आणि समोरचे दृश्य पाहून तिचा श्वासच अडकला. आत्तापर्यंत तिला दिसणारी ती स्त्री सदृष्य आकृती तिच्या किशोरचा गळा दाबत होती. ते पाहून सारिका प्रचंड चिडली. अचानक कोण जाणे कुठून तिच्यात शक्ती संचारली आणि त्या आकृतीवर धावून जात ती ओरडली, “सोड माझ्या किशोरला! का आम्हाला त्रास देत आहेस तु? आम्ही काय बिघडवले आहे तुझे म्हणुन असा छळ मांडला आहेस?” असे म्हणत ती त्या आकृतीचे हात त्याच्या गळ्यापासून दूर करण्यासाठी पुढे सरसावली. त्या बरोबर ती आकृती भयानक हास्य करत गायब झाली, पण जाता जाता तिचे वाक्य त्या रुम मध्ये घुमले, “माका माझा बाळ व्हया असा”. रूम मध्ये सुरु असलेली गडबड ऐकून अक्षय मालवणकर धावतच आला व “सायबानू काय झाला?” म्हणत रुमचा दरवाजा ठोठावू लागला. त्याचा आवाज ऐकून सारिकाच्या जीवात जीव आला. किशोरला सावरत तिने दरवाजा उघडला.

रक्ताने माखलेल्या किशोरला पाहून अक्षय चाटच पडला, “काय झाला काय, सायबांका? डोका कशान फुटला?” अक्षयने प्रश्नांची सरबत्ती सुरु केली, तेव्हा “सगळं सांगते आधी यांना डॉक्टर कडे घेऊन चला” म्हणत सारिकाने रूमला लॉक लावले. डॉक्टरांनी मलमपट्टी केल्यावर ते रुमवर परतले. तसे तिने मालवणच्या बसस्टँड वरील शौचालयापासून ते आत्तापर्यंत अनुभवलेले सर्व काही अक्षयला कथन केले. अक्षय सर्व काही ऐकल्यावर, वाईच (जरा), हयसरच बसा सायबांच्या वांगडा (जवळ); मी इलय म्हणत आपल्या घरात गेला. त्याने घडलेला सर्व वृत्तांत आपल्या वडीलांच्या कानावर घातला. किशोर बेडवर पडून होता तर सारिका त्याच्या उशाशी बसून होती. दोघेही कुठुन या संकटात सापडलो असा विचार करत असतानाच अक्षयचे वडील रमेश मालवणकर, अक्षय सोबत सारिका आणि किशोर उतरलेल्या रूमवर आले. त्यांना आलेले पाहाताच किशोर उठुन बसला. रमेश मालवणकर बाहेरची बाधा झालेल्या लोकांना अमानवी शक्तींच्या त्रासातुन मुक्त करत असत. रुम मध्ये येताच त्यांना तिथे असलेल्या आत्म्याचे अस्तित्व जाणवले. त्याबरोबर त्यांनी अक्षयला रूमच्या बाहेर जाण्यास सांगितले व आतुन कडी लावली. रमेश मालवणकर म्हणाले, “काळजी करा नको, मी तुमका यातून खात्रीने सोडवतलंय फक्त मी जे काय प्रश्न विचारतलय त्यांची तुमी निट आठवून उत्तरा देऊक व्हयी. भूतां कोणाक पण असा धरनंत नाय, त्यांचो कायतरी उद्देश असताच जो पूरो करूक त्यांका माणसांची गरज पडता. ही जी काय बायलेची (स्त्रीची) काळी आकृती तुमकां दिसता तिने तिका तुमच्या कडून काय व्हया असा याची कायतरी हिंट तुमकां नक्की दिली असतली. माका निट आठवून सांगशाल तर माका त्येचो इलाज करूक मदत होतली”. यावर सारिका लगेच म्हणाली, “मी जेव्हा शौचालयात त्या मृत अर्भकाला पाहिल्यावर घाबरून म्हणाले की कोणाचे आहे हे? तेव्हा तिने ऊत्तर दिले की, ते तिचे आहे आणि नंतर ती म्हणाली की माका माझा बाळ व्हया असा, मी येव तुझ्या वांगडा? का असच काहीतरी. मगाशी जेव्हा मी तिचे हात किशोरच्या गळ्यावरून दूर करायचा प्रयत्न केला तेव्हा ती गायब झाली पण परत तेच वाक्य बोलली, “माका माझा बाळ व्हया असा”.