स्कुबा डायव्हिंग

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जून २०१६

स्कुबा डायव्हिंग - मराठी कथा | Scuba Diving - Marathi Katha

किशोर सारखेच बोटीतील इतर लोक डायव्हिंगसाठी उत्साही असल्यामुळे बोटीच्या एका टोकाला बसलेल्या सारिका आणि तिच्या मागे असलेल्या त्या काळ्या आकृतीकडे कोणाचेच लक्ष नव्हते. सारिकाला आणि इतर कोणालाही काही कळण्यापूर्वीच त्या आकृतीने सारिकाला पाण्यात ढकलुन दिले. सारिका पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली, आणि बोटीवर एकच गलका झाला. सर्वच जण आरडा ओरडा करू लागले. बोटीतील नावाडी झाला प्रकार समजून काही कृती करेपर्यंत त्या काळ्या आकृतीने सारिकाला समुद्रात खोलवर नेण्यास सुरवात केली होती. इकडे ट्रेनर सोबत पाण्यात कोरल्स आणि विविध मासे बघण्यात हरवलेल्या किशोरला आपल्या डाव्या बाजूला काही हालचाल जाणवली. एखादा डॉल्फिन असावा असा समज करून त्याने तिकडे पहिले तशी पाण्यात खोलवर ओढली जाणारी सारिका त्याला दिसली आणि तो हादरलाच. खुणेनेच त्याने सोबत असलेल्या ट्रेनरचे लक्ष्य सारिकाकडे वेधले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ट्रेनर वेगाने पोहत सारिकापाशी पोहोचला त्याने सारिकाचे नाक दाबून धरले व स्वतःचे हवेचे उपकरण तिच्या तोंडात घातले. तिचा हात धरून तिला पाण्याच्या पृष्ठभागावर नेण्याचा तो प्रयत्न करू लागला. पण खालून त्या आकृतीने तिला धरून ठेवल्याने तिला वर खेचणे त्याला शक्य होत नव्हते. इतक्यात किशोर त्याच्या मदतीला आला. त्याने सारिकाचा पाय धरून तिला वर ढकलायचा प्रयत्न करताच त्या आकृतीने तिला सोडले व सारिका वेगाने वर जाऊ लागली तोच सारिकाच्या भोवती गरागरा फिरणारी ती भयानक आकृती किशोरच्या नजरेस पडली आणि तो क्षणभर घुसमटलाच. वेगाने हातपाय मारत तो आणि ट्रेनर सारिकाला घेऊन पृष्ठभागावर आले. नावाड्यानी हात देऊन सारिकाला बोटीत खेचून घेतले, पाठोपाठ किशोर आणि तो ट्रेनरही बोटीवर आले. ताबडतोब CPR दिल्यामुळे सारिकाचे प्राण तर वाचले होते पण किती काळासाठी?

बोटीने एव्हाना समुद्र किनारा गाठला होता. मलुल पडलेल्या सारिकाला घेऊन किशोर रूमवर पोहोचला तेव्हा ४ वाजून गेले होते. अक्षय देसाईंने आणून ठेवलेल्या जेवणाच्या थाळ्या पाहून दोघांनाही भुकेची जाणीव झाली. अजिबात किरकिर न करता थंडगार झालेल्या त्या थाळ्यांवर दोघेही तुटून पडले. सारिका थकल्यामुळे लगेचच झोपेच्या अधीन झाली, पण मनातून खूप धास्तावल्यामुळे ती झोपेतही किशोरला बिलगूनच होती. पोटात अन्न गेल्यामुळे मेंदुला तरतरी आलेला किशोर, आत्तापर्यंत भास म्हणून उडवून लावलेल्या आणि मालवण पासून घडत आलेल्या सर्व घटनांचा तपशीलवार विचार करू लागला. किशोरच्या एव्हाना लक्षात आले होते की आपल्या सरुच्या जीवाला त्या काळ्या आकृतीपासून धोका आहे. पण जेव्हा जेव्हा किशोर जवळ होता त्या आकृतीने सारिकाला काही नाही केले पण तो दूर असतानाच तिने सारिकाच्या जवळ जाण्याचा अथवा हानी पोहोचवायचा प्रयत्न केला होता. मगाशी पाण्याखाली सुद्धा किशोर सारिका जवळ जाताच तिने सारीकाला सोडले होते, पण का? असे काय होते जे तिला किशोर पासुन दूर ठेवत होते? विचार करता करता किशोरचे लक्ष त्याच्या गळ्यातील मारुतीच्या लॉकेट कडे गेले जे त्याच्या आईंने तो लहान असताना जेव्हा रात्री घाबरून उठायचा तेव्हा खास त्याच्यासाठी एका महाराजांकडून सिद्ध करून आणले होते. कोणताही विचार न करता त्याने ते लॉकेट सारिकाच्या गळ्यात बांधले. त्या आकृतीने आत्तापर्यन्त किशोरला काहीच त्रास दिला नव्हता त्यामुळे तो निर्धास्त होता. एकदा का सकाळ झाली की लगेच पुणे गाठु मग आपणाला काही धोका असणार नाही असा विचार करून तो ही थोडा सुस्तावला.