स्कुबा डायव्हिंग

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जून २०१६

स्कुबा डायव्हिंग - मराठी कथा | Scuba Diving - Marathi Katha

साधारण १५ मिनिटात सगळे बोटीत बसल्यावर कोरल्स पाहण्यासाठी त्यांची बोट खोल समुद्राच्या दिशेने जाऊ लागली. काही जण खूप ऊत्साहित होते तर काहीना पाण्यात उतरण्याच्या नावानेच धडकी बसली होती. सारिकाच्या चेहऱ्यावर अजूनही ते गुढ स्मित विलसत होते. अनिमिश नेत्रांनी ती बोटीमुळे उसळणाऱ्या पाण्याकडे पाहात होती. किशोरला तिचे वागणे जरा विचित्रच वाटत होते, पण लोकांसमोर फुकटचा तमाशा नको म्हणुन तो गप्प होता. अचानक सारिकाच्या डोळ्यातील एक वेगळीच चमक त्याने टिपली. कोणाला काही कळायच्या आत सारिका ऊठुन ऊभी राहिली आणि बोटीच्या कठड्यावरून पाण्यात हात बुडवायला झुकली त्याने बोटीचे संतुलन बिघडले आणि बोट सारिकाच्या बाजुने झुकली. पण वेळीच किशोरने तिला मागे खेचल्यामुळे ती पाण्यात पडता पडता वाचली. बोटीत एकच घबराट पसरली. नावाड्यासह बोटीतील इतर प्रवासी सारिकाला दुषणे देऊ लागले. सारिकाच्या वतीने किशोर माफी मागत होता पण कोणीच ऐकायला तयार नव्हते. लोकांचा आवाज जसा चढत होता तशी सारिका जास्तच अस्वस्थ होत होती. शेवटी ती ताडकन उभी राहिली आणि तिने मोट्ठी आरोळी ठोकली. तिची आरोळी एवढी कर्कश होती की सर्वांनी कानावर हात घेतले. बोटीत एक भयाण शांतता पसरली होती. सर्वजण तिच्याकडे भितीयुक्त विस्मयाने पाहत होते. तोच ती कडाडली, “आता जर का माका कोणी काय बोल्लो, तर त्याची खांडोळी करून टाकतलय. तुमच्या पैकी एकाक पण मी जित्तो सोडुचं नाय”. एवढे बोलून तीने उरात धडकी बसेल असे एक अमानवी खरंतर सैतानी म्हणावे असे हास्य केले. तिचा तो आवेश आणि चेहेऱ्यावरील भाव पाहून सर्वांचीच पाचावर धारण बसली. मराठी बोलणारी सारिका अस्सल मालवणीत बोलली होती. बोटीत स्मशान शांतता पसरली. किशोरही मनातून हादरला होता. पुढच्याच क्षणाला सारिका एकदम नॉर्मल झाली जणु काही झालेच नाही. किशोरच्या हाताला आपल्या हातांनी वेढा देत तिने आपले डोके त्याच्या खांद्यावर ठेवले. पुन्हा तिच्या चेहऱ्यावर तेच गुढ स्मित विलसु लागले होते.

तिच्या वागण्यातील अमुलाग्र बदल पाहून सर्वजण चक्रावलेच. हळू आवाजात लोकांची कुजबुज सुरु होती पण अजूनही भीती गेली नसल्यामुळे सर्वच तिची नजर टाळत होते. थोडा वेळ गेल्यावर सर्वजण ठरलेल्या स्पॉट जवळ पोहोचले. तिथे आधीच असलेल्या एका बोटीला खेटून त्यांची बोट थांबली आणि पाण्यात नांगर टाकला गेला. नंतर सुरु झाले बोटीतील प्रवाशांचे हस्तांतरण. या बोटीतील प्रवासी त्या बोटीत आणि त्या बोटीतील प्रवाशी या बोटीत असा रोजचा सरावाचा पण थोडा धोकादायक प्रकार सुरु झाला. ५ मिनिटात सर्व प्रवाश्यांची अदलाबदल करून आलेली बोट किनाऱ्याकडे निघुनही गेली. मग सुरु झाले स्कुबा डायव्हिंग. एक एक करून लोकं ट्रेनर सोबत समुद्रात उतरत होते, डायव्हिंगचे टेक्निक समजुन घेत होते आणि अथांग समुद्राच्या अंतरंगात डोकावण्यासाठी बुडी मारत होते. किशोरला स्कुबा डायव्हिंग करायचे असल्यामुळे तो खूप ऊत्तेजित झाला होता. पण सारिका मुळातच घाबरट असल्यामुळे ती स्नॉर्केलिंगसाठी पण पाण्यात उतरायला तयार नव्हती. किशोरने तिला खूप समजावले, धीर दिला, पैसे वाया जातील असे सांगितले पण तिचा काही धीर होईना. मग आपल्याला पाण्यात उतरलेले पाहुन तिचाही मुड होईल असा विचार करून त्याने स्कुबा डायविंगचे उपकरण आपल्या शरीरावर बसवण्यास तिथल्या लोकल ट्रेनरला सांगितले. चेहऱ्यावर मास्क बसवून व बोटीवर बसवलेल्या एअर कॉमप्रेसर पासून निघालेली लांबलचक पाईप, तोंडाने श्वास घेण्याच्या उपकरणाला जोडून तो ट्रेनर सोबत त्या थंड पाण्यात उतरला. लाईफ सेव्हिंग ट्यूब गळ्यात घालून प्रथम त्याने पाण्याखाली तोंडाने श्वास घ्यायचे टेक्निक समजावुन घेतले. ऑल ओकेसाठी छानची खुण आणि काही प्रॉब्लेम वाटल्यास थम्स अपची खुण अशा खुणा ठरवून बघता बघता तो ट्रेनर सोबत पाण्याखाली गायब झाला. डायव्हिंग करण्याच्या उत्साहात तो सारिकाला बाय करायलाही विसरला.