स्कुबा डायव्हिंग

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जून २०१६

स्कुबा डायव्हिंग - मराठी कथा | Scuba Diving - Marathi Katha

"म्हणजे मला झालेला तो भास नव्हता तर!” किशोरच्या या वाक्याने सारिका हादरलीच. “म्हणजे? तुला नक्की काय म्हणायचंय किशोर?” सारिकाच्या प्रश्नावर किशोर म्हणाला, “सकाळी बसमध्ये अशीच एक आकृती तुझ्या बाजूला तरंगताना मी पहिली. आधी मला वाटले की मला भास झाला असेल, पण आता जे तू सांगितलंस, त्यावरून मला वाटते की तू त्या शौचालयातून येताना एकटी नाही आलीस. तर आपल्या सोबत काहीतरी अमानवीय घेऊन आली आहेस. मला वाटते की आपण लगेच पुण्याला निघूया. बॅग्स पॅक कर. मी अक्षयला सांगतो की आम्ही रुम सोडतोय.” असे म्हणुन किशोर बाहेर जाण्यासाठी वळला. तो जेमतेम दरवाज्यापाशी गेला असेल तोच सारिकाचा आवाज त्याच्या कानावर पडला, “थांब!". त्या आवाजात जरबंच एवढी होती की किशोर जागेवरच थांबला. त्याने वळून पहिले तर सारिका उठून उभी राहिली होती. तिचा चेहरा विलक्षण शांत वाटत होता. भितीचा लवलेशही तिथे नव्हता ते पाहुन किशोरला आश्चर्य वाटले. अचानक नेहेमीचे हसरे खेळकर भाव चेहऱ्यावर आणत सारिका त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, “काही नको रूम सोडायला, मी ठीक आहे. नको काळजी करूस. एकाच दिवसाचा तर प्रश्न आहे! तसेही रुम सोडली तरी भाडे तर द्यावेच लागेल ना? त्या पेक्षा आज मस्त एन्जॉय करू, उद्या बघु काय करायचे ते. तू जाऊन नाश्ता सांग. तोपर्यंत मी आवरते". एवढे बोलून गाणे गुणगुणत ती आवरायला लागली. तिच्यातील अमुलाग्र बदल किशोरला चक्रावून गेला. आत्तापर्यंत भीतीने गाळण उडालेली सरू अचानक इतकी बिनधास्त कशी झाली हेच त्याला समजेना. पण तिच्या बोलण्यात तथ्य होते आणि त्या आकृतीने अजुनपर्यंत काही त्रास दिला नव्हता त्यामुळे तोही थोडा निर्धास्त झाला. तुला जर काही प्रॉब्लेम वाटत नसेल तर ठीक आहे. मी नाश्त्याची ऑर्डर देऊन येतो म्हणत तो बाहेर गेला. इकडे आवरत असलेल्या सारिकाच्या चेहेऱ्यावर मात्र एक वेगळेच खुनशी हास्य पसरले होते.

ज्या हॉटेल मधे ते उतरणार होते ते अक्षयच्या हॉटेल कम रूमच्या समोरच होते. आवरल्यावर किशोर आणि सारिका तिथे गेले तेव्हा तिथला मालक अक्षय देसाई त्यांना सामोरा गेला, त्याने तसदी बद्दल त्यांची माफी मागितली. ३० रुपये पर प्लेट या दराने पोहे आणि १५ रुपये दराने चहा घेऊन, मनात शिव्यांची लाखोली घालत किशोर आणि सारिका रूमवर परतले. तोपर्यंत अक्षय मालवणकरने स्कुबा डायव्हिंगसाठी एका माणसाला बोलावले होते. घासाघीस करत १५०० वरून १४०० रुपये स्कुबा डायव्हिंग साठी आणि ६०० रुपये स्नॉर्केलिंग साठी द्यायचे ठरले. साधारण १ किलोमिटर चालत ते बिच वर पोहोचले. बिच पूर्णपणे पर्यटकांनी भरले होते. सर्वचजण बोटिंग, वॉटर स्कुटर, पॅरा सेलिंग, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग, बनाना राईड इत्यादीचा आनंद लुटण्यासाठी आतुर झाले होते. पैसे भरून झाल्यावर किशोर आणि सारिका इतर पर्यटकांसह ठरलेल्या बोटीत बसण्यासाठी निघाले तेव्हा दुपारचे साडेबारा झाले होते. सूर्य माथ्यावर तळपत होता आणि वाळु चांगलीच तापली होती. शूज काढून चटके बसणाऱ्या वाळुवर उघड्या पायांनी धावतच किशोर बोटी जवळ पोहोचला. सारिका कुठे राहिली म्हणुन त्याने वळून पाहिले तर त्या भाजून काढणाऱ्या वाळूत सारिका मजेत बसली होती. किशोरसह आजूबाजूचे सगळेच लोक तिच्याकडे आश्चर्याने पाहात होते. वेडी आहे का ही? त्या गरम वाळूत कशी बसली आहे बघा तरी! हिला भाजत नाही का? वगैरे कुजबूज सुरु झाल्यावर अजून तमाशा नको असा विचार करून नाईलाजाने किशोर परत त्या तापलेल्या वाळूत तिला जाऊन घेऊन आला. किशोरचे तळपाय चांगलेच पोळले होते, बिचाऱ्याला आग आग होत होती. समुद्राच्या थंड पाण्यात पाय बुडवल्यावर त्याला जरा बरे वाटले. एरव्ही जरा काही झाले तर आकांडतांडव करणारी सारिका आज मात्र त्या गरम वाळूवर, हिरवळीवर फिरावे तशी फिरत होती. आपल्याच विश्वात हरवलेल्या सारिकाच्या चेहऱ्यावर एक कमालीचे गुढ स्मित विलसत होते.