स्कुबा डायव्हिंग

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जून २०१६

स्कुबा डायव्हिंग - मराठी कथा | Scuba Diving - Marathi Katha

सारिका आंघोळीला बाथरूम मध्ये गेली. गरम पाणी अंगावर पडताच तिला खुप रिलॅक्स वाटले, पटकन तिने आंघोळ उरकली आणि बादलीत उरलेले चार तांबे डोळे मिटुन अंगावर घेताना तिला आजूबाजूचे वातावरण अचानक खुप थंड झाल्यासारखे वाटले. चक्क तिच्या तोंडुन थंडीत जशी बाहेर पडते तशी वाफ बाहेर पडली. तिला एकदम हुडहुडी भरून आली. समुद्र किनारी इतकी थंडी वाजणे हे तिच्या बुद्धीच्या पलीकडले होते. तिने डोळे उघडले तसे तिला त्या बाथरूम मध्ये कोणाचे तरी अस्तित्व असल्याचे जाणवले. मालवणच्या स्टँडवर शौचालयात तिला जी सावलीसारखी काळी आकृती दिसली होती तिच बाथरूमच्या खिडकी जवळ तरंगताना दिसली. त्या आकृतीला निश्चित असा आकार नव्हता पण डोळ्यांसारखे दिसणारे दोन तेजस्वी गोळे तिच्याच रोखाने पाहत होते. भीतीने तिची बोबडीच वळली. ज्या गोष्टीला ती इतका वेळ भास म्हणुन उडवून लावायचा प्रयत्न करत होती तीच गोष्ट तिच्या समोर आपले अस्तित्व सिद्ध करत होती. तिने किशोरला हाक मारायचा केविलवाणा प्रयत्न केला पण तिच्या तोंडुन एक एक्षरही बाहेर पडले नाही. हळु हळु त्या आकृतीला एक मानवी आकार प्राप्त होऊ लागला. तो स्त्री सदृश्य आकार पाहुन आपले सगळे अवसान गोळा करून सारिकाने बाथरूमचा दरवाजा उघडला व बाहेर येऊन दरवाजा घट्ट लावला. तिने किशोरला हाक मारली. बाहेर अक्षयशी बोलत असलेल्या किशोरला तिच्या आवाजातील भय जाणवले. तो धावतच रुम मध्ये आला तेव्हा सारिका बेसिन खाली अंग चोरून बसलेली त्याला दिसली. तो तिच्या जवळ जाऊन तिला बाहेर बोलावू लागला पण त्याची हाक तिच्यापर्यंत पोहचलीच नाही. त्याने तिच्या खांद्याला स्पर्ष करताच ती कमालीची दचकली. त्याला पाहताच ती वेगाने बाहेर आली आणि त्याला घट्ट मिठी मारून ती ओक्साबोक्षी रडु लागली.

तिचा आवेग ओसरेपर्यंत किशोरने काहीही न बोलता तिला आपल्या छातीशी धरले. ती जशी शांत झाली तसे त्याने तिला प्रेमाने विचारले, “काय झाले सरू? मगाशी झोपून उठल्यावर पण तु केवढ्याने दचकलीस! काय होतंय तुला?” यावर सारिका मुसमुसत म्हणाली की आपण परत जाऊ, मला नाही राहायचे इथे. “कायतरीच काय बोलतेस सरू! अगं तुला समुद्रकिनारी जायचे होते, म्हणून तर आलो ना आपण इथे? आता तूच इथे राहायचे नाही म्हणतेस! नक्की काय झालय ते मला सांगशील?” किशोर काळजीने म्हणाला. सारिका बोलू लागली, मालवणला उतरल्यावर मी शौचालयात गेले होते, आठवतंय? खूप घाण होते पण नाईलाजाने मी उरकले आणि निघणार इतक्यात माझे लक्ष कोपऱ्यात पडलेल्या एका पिशवीकडे गेले काही कुत्रे त्या पिशवीला हुंगत होते. त्या कुत्र्यांना मी हाकलले. कोणी तरी गडबडीत विसरून गेले असावे. त्यात काय आहे ते पाहावे आणि ती पिशवी बस स्थानक प्रमुखाकडे द्यावी असा विचार करून मी आत पहिले. त्यात स्त्री जातीचे मृत अर्भक होते. घाबरून माझ्या तोंडून निघाले, अगं बाई कोणाचे आहे हे? आणि मागून एक आवाज आला, “माझा असा ता!” दचकल्यामुळे ती पिशवी माझ्या हातून खाली पडली. मी वळून पाहिले पण तिथे कुणीच नव्हते. निट पाहिले तर तिथे एक काळी आकृती तरंगत होती. ती इतकी भयानक दिसत होती की मला घामच फुटला. “माका माझा बाळ व्हया असा, मी येव तुझ्या वांगडा (बरोबर)?” असे तिने विचारताच माझे अवसानच गळाले आणि मी जीव मुठीत घेऊन पळत सुटले. तिच काळी आकृती मला आत्ता बाथरूम मध्ये पुन्हा दिसली. सारिका भीतीने थरथरत होती.