स्कुबा डायव्हिंग

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जून २०१६

स्कुबा डायव्हिंग - मराठी कथा | Scuba Diving - Marathi Katha

किशोर आणि सारिका एकमेकांकडे पाहतच राहिले. आलीया भोगाशी असावे सादर म्हणत दोघांनी प्रातर्विधी आवरले, दिलेला चहा निमुटपणे घेतला आणि त्या रूम मधे ताणून दिली. किशोरला झाला प्रकार सांगावा की नाही या विचारात सारिका असतानाच रात्रभर प्रवास आणि जागरण झाल्यामुळे किशोरला चटकन झोप लागली. तिच अवस्था सारिकाचीही असल्यामुळे तिही झोपेच्या अधीन झाली. साधारण १०:३० ला अक्षयची हाक ऐकून दोघांची झोप उघडली. सारिका तर दचकुनच उठली. तिला स्वप्न पडले होते आणि स्वप्नात तिला मगाशी घडलेला अतर्क्य प्रसंग पुन्हा जसाच्या तसा दिसल्यामुळे ती प्रचंड घाबरली होती. किशोरने तिला जवळ घेतले, “काय गं? स्वप्न पडले का भीतीदायक? जागी हो नीट. आणि चल ऊठ पाहु लवकर! रूम रिकामी झाली आहे. पटकन आवरून निघुया नाहीतर सगळा दिवस वेस्ट होईल”. असे म्हणत किशोर कपडे वगैरे गोळा करू लागला. सारिका त्याला हाक मारेपर्यंत तो रूमच्या बाहेर पडला पण. मग सारिकाने त्याला काहीच न सांगण्याचा निर्णय घेतला. तिला किशोरचा मुड आणि दिवस खराब करायचा नव्हता. तसेही आता काही भीती नाही असे तिने स्वतःला समजावले आणि किशोरच्या मागोमाग ती उरलेले समान घेऊन बाहेर पडली. सगळे सामान हातातच घेऊन रस्त्यातून चालत ते दोघे एक घर सोडून असलेल्या अक्षयच्या त्या हॉटेल वजा घराकडे निघाले. वातावरणात तितकासा उकाडा असल्यामुळे त्यांनी १००० रुपयात नॉन एसी रूम घेतली. १० बाय १२ ची रूम आणि तिलाच जोडून असलेले एक संडास बाथरूम, बस! एसीसाठी असलेल्या स्वीच जवळचा फ्युज काढून अक्षय ने एसी रूमला नॉन एसी केले व साबण आणि गरम पाणी आणण्यासाठी निघुन गेला. त्या रूममधे १ डबल बेड आणि एक टेबल होते त्यावर टाटा स्कायचा बॉक्स होता पण टीव्ही मात्र गायब होता. एकंदर आपला पुरता पचका झाला हे लक्षात येताच किशोरची जाम चिडचिड झाली. पण सारिकाने त्याला समजावले, “अरे, तसेही दिवसभर आपण बाहेरच असणार आहोत, रात्री झोपण्यापुरतीच तर रूम पाहिजे आपल्याला. काय करायची आहे ३ हजाराची रूम? ही ठीक आहे! आणि आपले पैसे पण वाचलेत. ते खाण्या-पिण्यावर आणि एन्जॉयमेंटवर खर्च करू. चल आवरून घे पटकन” म्हणत ती बाथरूम मधे पळाली. सारिकाचा समजुतदारपणा पाहुन किशोरला नकळत तिचा अभिमान वाटला.