स्कुबा डायव्हिंग

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जून २०१६

स्कुबा डायव्हिंग - मराठी कथा | Scuba Diving - Marathi Katha

मालवण बसस्टँड वरून फोन करून किशोरने आपण येत असल्याची कल्पना हॉटेलवाल्याला दिली होती. श्रीकृष्ण मंदिराजवळ अक्षय मालवणकर त्या दोघांची वाट पाहताच उभा होता. गाडी थांबताच त्याने त्या दोघांना हात दाखवला. टिशर्ट आणि बर्मुडावर आलेल्या अक्षयला पाहून किशोर आणि सारिकाने विस्मयाने एकमेकांकडे पहिले. “येवा, प्रवास कसो झालो? आज गाडी लवकर ईली, सकाळ असल्यामुळे ट्रॅफिक लागुक नाय वाटतां” वगैरे बोलत अक्षयने त्यांचे स्वागत केले. त्यांच्या बॅग्स वगैरे उचलण्याच्या भानगडीत न पडता, माझ्या वांगडा (सोबत) येवा म्हणत तो एका घराच्या दिशेने चालू लागला. किशोर आणि सारिका निमूटपणे त्याच्या मागे जाऊ लागले. जसा अक्षय घरात शिरू लागला तसे किशोरने त्याला थांबवले आणि म्हणाला की आम्हाला हॉटेल वर जायचय, तुम्ही इकडे कुठे घेऊन चाललात? तेव्हा, थोडो प्रोब्लेम झालो असा, आत येवा; सांगतंय! म्हणत अक्षय घरात शिरला, सारिकाने कपाळावर आठ्या आणल्या पण ती काही बोलण्या अगोदर किशोर घरात शिरल्यामुळे तिही त्याच्या मागे निमुटपणे आत गेली. ते कौलारू घर बऱ्यापैकी मोठे होते. समोरच एका गणपतीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केलेली होती. ह्यो आमचो गणपती, नवसाक पावता हो! तुमका काय नवस बोलुचो असतलो तर बोलान घेवा, नक्की पुरो होतलो, अक्षय अभिमानाने बोलला.

शेवटी संय्यम संपल्यामुळे किशोरने अक्षयला विचारले हा काय प्रकार आहे? आम्हाला हॉटेल वर न्यायचे सोडुन तुम्ही या घरात आणुन नवस कसले बोलायला सांगताय? तसा अक्षय त्यांना म्हणाला, “दादानु भडकताव कशाक? तुमचा बुकिंग ज्या हॉटेलात झाला होता ना ता माज्या मावस भावाचा असा, पण थय रूम फुल असत म्हणान तुमची सोय माज्या घरात केलेली असा”. ते ऐकताच किशोर आनखीनच भडकला. अहो याला काय अर्थ आहे? बुकिंग केलेले असताना रूम फुल कश्या असु शकतात? आणि हॉटेल सोडून तुमच्या घरात आम्ही कसे राहायचे? तेव्हा अक्षय म्हणाला, “अवो! तुमका माझो भाव फोन लावी होतो पण तुमचो फोन लागाक नाय. तुमी चार दिवसापूर्वी बुकिंगचा नुसता फोनवर सांगलेला होता, आगाऊ पैशे पण देऊक नाय, येतलास की नाय ता पण कळुचो मार्ग नाय. म्हणान काल जे कस्टमर, रुम हा काय? इचारुक ईले होते; त्यांका त्याने रूम देऊन टाकल्यान. आता त्याचे सातही रूम फुल असत. उद्या खाली होतले. माझ्याकडे दोन रूम असत. त्याच्या एवढे पॉश नाय पण चांगले असत. आता तिथे कस्टमर असत, ते १०-१०:३० वाजता रूम सोडतले मग रूम साफ करून मी तुमका थय शिफ्ट करतय. तोवर तुम्ही फ्रेश व्हा, च्या घ्या आणि इथे या रूममधे वाईच पडा”. यावर चिडून किशोर म्हणाला, “अरे! पण सकाळी मी मालवणात पोहोचल्यावर त्यांना फोन लावला होता, तेव्हा त्यांनी हे का नाही सांगितले? आम्ही मालवणातच एखाद्या हॉटेलवर उतरलो असतो ना! उलट ते या म्हणाले, मग आधीच कशी काय रूम दिली?” किशोर आता चांगलाच चिडला होता. “अवो त्याने तुमका रूम नाय म्हणान सांगल्यान असता तर तुमी आणि चिडले असतत. आणि हय माझी रूम असा ना तुमच्यासाठी! म्हणान तर त्याने तुमका येऊक सांगल्यान. अहो तीन दिवस लागून सुट्टी ईली हा, म्हणान सगळेच रूम फुल असत. हयसर बऱ्याच जणांनी आपापल्या घरात एक दोन रूम उठवून न्याहारी-निवासचो धंदो सुरु केलो हा. पावण्यांका हॉटेलपेक्षा थोडा स्वस्त पडता आणि इथल्या लोकांका पण चार पैसे सुटतत. आता या टायमाला तुमका पुऱ्या देवबागात खय पण रूम मिळाची नाय. सगळा फुल हा! थोडावेळ हयसरच आराम करा नंतर रूम खाली झाली की थय शिफ्ट व्हा. टेन्शन घेवा नको, मी आसय मा?” आये, दोन कप च्या टाक ग पावण्यांका! म्हणत त्याने घरातील एक रूम उघडून दिली आणि अक्षय माजघरात गेला पण.