स्कुबा डायव्हिंग

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जून २०१६

स्कुबा डायव्हिंग - मराठी कथा | Scuba Diving - Marathi Katha

गाडी मध्ये ड्रायव्हर आणि महिला कंडक्टर व्यतिरिक्त ते दोघेच होते. जांभा दगडाच्या लाल धुळीने माखलेल्या एकेरी अरुंद रस्त्यावरून ड्रायव्हर शिताफीने गाडी हाकु लागला. “येळेत येऊक काय होता तुमकां? फुडे पोचुक अमका लेट होता मा! पॅसेंजर खोळांबतत आणि आमका गाळये (शिव्या) खाऊचे लागतत. खय जाऊचा तुमकां?” महिला कंडक्टर करवादली! २ श्रीकृष्ण मंदिर द्या! किशोर उद्गारला. “गाडी व्हाया मोबार जातली, तिकिटाचे ३ रुपये जास्त लागतले, नंतर म्हणा नको की सांगला नाय म्हणान”, त्या महिला कंडक्टरने अस्सल मालवणी भाषेत सुनावले. “हो, हो! जे काय तिकीटाचे पैसे होतात ते घ्या तुम्ही!” असे किशोर म्हणताच ती कंडक्टर समजावणीच्या सुरात म्हणाली, “तसा नाय ओ, पण तुमका सांगतंय, ३ रुपयांसाठी पण लोकं भांडाक येतत. आता मोबारवाल्यान्का मालवणाक आणूक आणि देवबाग किंवा मोबाराक परत सोडूक जाऊक व्हया की नको? अंतर वाढला म्हटल्यावर पैसे पण वाढतले की नाय? तुमीच माका सांगा! एवढोच जर पैसो जाता तुमचो! तर या गाडीयेन येवा नको ना! पण नाय, त्यांका हीच गाडी व्हयी. फुकटचो डोक्याक ताप”. तिने आपली व्यथा मांडली. बरोबर आहे तुमचे, म्हणत दोघांच्या तिकिटाचे ३२ रुपये देवून किशोर आणि सारिका सिटवर सेट झाले.

सारिका अजुनही गुदरलेल्या प्रसंगातून सावरली नव्हती. काय बोलावे तेच तिला कळेना. किशोरला आत्ता काही सांगावे तर तो वैतागेल; आपल्यालाच वेडात काढेल, त्यापेक्षा नंतरच बोलूया असा विचार करून ती गप्प बसली आणि खिडकीतुन बाहेर शुंन्यात बघू लागली. खिडकीतुन येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळुकीने सारिका हळू हळू पेंगू लागली. एवढ्या सकाळी गाडीत त्या दोघांव्यतिरिक्त इतर कोणीही प्रवासी नसल्यामुळे इकडे ड्रायव्हर आणि कंडक्टर गजाली (गप्पा) मारू लागले. वेडी वाकडी वळणे घेत गाडी देवबाग जवळ करू लागली. थोड्या वेळाने किशोरने सहज म्हणुन सारिकाकडे वळुन पाहिले, तिची मान गाडीच्या तालावर वर खाली हलत होती. तिची बट वारंवार तिच्या गालाला स्पर्श करत होती ते पाहुन किशोरला त्या बटीचा हेवा वाटला. खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशात तिचा मुळचा सुंदर चेहरा आणखीनच सुंदर दिसत होता. किशोर भान हरपुन तिचे सौंदर्य डोळ्यांत साठवत होता. त्याच्या डोळ्यासमोरून सारिकाशी झालेल्या पाहिल्या भेटीपासून ते आत्तापर्यंतचा काळ एखाद्या चित्रपटासारखा निघून गेला. एका खड्डयातून गाडीचे चाक गेल्यावर बसलेल्या दणक्याने भानावर आलेल्या किशोरला अचानक सारिकाच्या बाजूला काही तरी हालचाल जाणवली. एखादी मानवसदृश्य आकृती तिच्या शेजारी असल्यासारखे त्याला जाणवले जणु एखादी सावलीच. क्षणभर त्या सावलीने त्याच्याकडे पाहिल्यासारखे त्याला वाटले. त्यांची नजरा नजर होताच क्षणात ती गायब झाली. आपण पाहिले ते सत्य की भास असा मनात आलेला प्रश्न, त्याने “भासच असेल,” असे म्हणत उडवून लावला. सारिकाला गाढ झोप लागली होती. रस्ता अरुंद असल्यामुळे समोरून तुरळक येणाऱ्या मोठ्या वाहनांमुळे गाडी मागे पुढे होऊन पुन्हा मार्गस्थ होत होती. शेवटी ६:५५ ला गाडी त्या दोघांना घेऊन इच्छित स्थळी पोहोचली.