स्कुबा डायव्हिंग

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जून २०१६

स्कुबा डायव्हिंग - मराठी कथा | Scuba Diving - Marathi Katha

आता आपल्यालाच काहीतरी करावे लागेल हे लक्षात येताच किशोर त्या लावसटीकडे पाहून म्हणाला, "तू स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्या सारिकाचा जीव नाही घेऊ शकत. तुझी कहाणी ऐकून तुझ्या बद्दल करुणा वाटली पण आता तुझ्या कृतीने तू सिद्ध केलेस की तुझ्या सासरच्यात आणि तुझ्यात काहीच फरक नाही. तुझ्या सासरच्यांनी तुझ्या मुलीला तुझ्या पासून दूर केले आणि आता तू पण तेच करत आहेस. तू ही एक स्त्री आहेस, तू दुसऱ्या स्त्रीची आणि तिच्या बाळाची हत्या करण्याचा विचारच कसा करू शकतेस?" किशोरचे शब्द कानावर पडताच, सारिकाच्या गळ्यावरील त्या लावसटीची पकड ढिली झाली. शेवटी तीही एक आई होती. तिने सारिकाला सोडून दिले आणि किशोर कडे पाहत म्हणाली, "बरोबर हा तुझा, सुडाने माका आंधळा केला होतान. माझी चेडू (मुलगी) मुक्त झाली, आता माकापण मुक्त होऊक लागतला. म्हणजे मी पुन्हा जन्म घेतलंय आणि आई होतलय. माका माफ करा. तुम्ही दोघ खुश ऱ्हावा. मी आता तुमका त्रास देवाचं नाय." असे म्हणून ती लावसट रमेश मालवणकरांकडे वळून म्हणाली, "मालवणकरानु माका मुक्त करा. माका माझ्या चेडवाक भेटूचा हा. मालवणकरांचे अनुष्ठान पूर्ण होत आलेच होते. त्यांनी शेवटचा मंत्र म्हणताच ती लावसट आपल्या मुलीच्या आत्म्याप्रमाणेच अनंतात विलीन झाली. इकडे किशोर आणि सारिकाने सुटकेचा निश्वास सोडला आणि मालवण करांचे आभार मनात दोघे आपल्या नॉनएसी रूमकडे चालू लागले.