स्कुबा डायव्हिंग

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जून २०१६

स्कुबा डायव्हिंग - मराठी कथा | Scuba Diving - Marathi Katha

नाकातोंडात पाणी गेल्याने घुसमटलेल्या सारिकाला घेऊन किशोर किनाऱ्यावर आला. वाळुत सारिकाला झोपवुन किशोर तिच्या पोटावर दाब देऊ लागला, सारिकाच्या पोटात गेलेले वाळुमिश्रित पाणी बाहेर पडू लागले पण सारिका श्वास घेत नाही हे लक्षात आल्यावर किशोर मनातुन हादरला, पण लगेच स्वत:ला सावरत त्याने सारिकाच्या हृदयावर हात ठेऊन तिची छाती पंप करायला सुरवात केली. मध्येच तो तिच्या तोंडात आपल्या तोंडाने हवा पण सोडत होता. पाच एक मिनिटे ही क्रिया केल्यावर सारिकाने दीर्घ श्वास घेतला आणि खोकू लागली तसा किशोरच्या जीवात जीव आला. योग्य वेळी CPR देऊन सारिकाला मृत्युच्या दाढेतून त्याने एकाच दिवसात दोन वेळा ओढून आणले होते. तिला घट्ट मिठी मारून तो लहान मुलासारखा रडू लागला. नाका-तोंडात समुद्राचे खारट पाणी गेल्याने सारिकाची चांगलीच घुसमट झाली होती. मोठ्या प्रयत्नाने तिने आपल्या श्वासावर ताबा मिळवला. आपण किशोरच्या मिठीत सुरक्षित असल्याचे लक्षात येताच तिची भीती थोडी कमी झाली.

इकडे दफन भूमीच्या दरवाज्यापर्यंत पोहोचलेल्या त्या भयंकर लावसटीने खुर्चीवर घोरत असलेल्या त्या रखवालदाराला एक जोराचा तडाखा दिला, त्याने तो दूरवर फेकला गेला आणि खाली पडताच बेशुद्ध झाला. रागाने फणकारत ती लावसट दफनभूमीच्या फाटकातून आत शिरली. आत मध्ये रमेश मालवणकर तिच्या मुलीच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी प्रार्थना करत होते. तिच्या मृत मुलीला जिवंत करण्याचा तिचा मनसुबा धुळीला मिळत असलेले पाहून ती पिसाळलीच. रागाने ती रमेश मालवणकरांच्या दिशेने निघाली पण मालवणकरांनी पिशाच्चरक्षा मंत्राने स्वतःला सुरक्षित केले असल्यामुळे ती काही करू शकली नाही. पण त्यामुळे ती आणखीनच पिसाळली. रमेश मालवणकरांनी तिच्या मुलीचा मुक्तीविधी पूर्ण केल्यावर खड्डयामध्ये माती टाकून तो बुजवला व नमस्कार केला. त्याच बरोबर त्या थडग्यावर एक दिव्य प्रकाश अवतरीत झाला आणि त्या मृत मुलीचा आत्मा त्या प्रकाशात विलीन झाला. ते पाहताच आत्ता पर्यंत रागाने धुमसणारी ती लावसट केविलवाणे होऊन चक्क रडू लागली ते पाहून मालवणकरांचेही डोळे पाणावले. ते तिला म्हणाले, "काळजी करा नको. तुझा चेडू (मुलगी) मुक्त झाला असा. आता तिचो पुनर्जन्म होतलो. तू तिका तुझ्या स्वार्थासाठी अडकवून ठेवणा बरा नाय. मी तुझ्या मुक्तीसाठी पण प्रयत्न करतंय म्हणजे तुझो पण पुनर्जन्म होतलो आणि तुका या जन्मात न मिळालेला मातृसुख पुढच्या जन्मात मिळतला. पण तू तुझ्या चेडवाक (मुलीला) शौचालयात टाकलंय कित्या?" असे मालवणकरांनी विचारताच तिचे रडणे एकदम थांबले आणि चेहऱ्यावर तेच खुनशी भाव प्रकट झाले.