स्कुबा डायव्हिंग

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जून २०१६

स्कुबा डायव्हिंग - मराठी कथा | Scuba Diving - Marathi Katha

अर्ध्या तासात ते घराजवळ पोहोचले आणि जशी गाडी मालवणकरांच्या घरापाशी आली तशी अचानक सारिकाच्या किंकाळण्याने मालवणकर आणि किशोर दोघेही दचकले. करकचून ब्रेक लावल्यामुळे गाडी स्लिप झाली पण मालवणकरांनी मोठ्या शिताफीने तिच्यावर ताबा मिळवला. सारिकाच्या मांडीवर ठेवलेल्या पिशवीमध्ये हालचाल होऊ लागली होती. प्रचंड घाबरलेल्या सारिकाने मांडीवरील पिशवी जवळ जवळ फेकुनच दिली आणि गाडीचा दरवाजा उघडून ती समुद्राच्या दिशेने धाऊ लागली. रमेश मालवणकर दबक्या आवाजात ओरडले, किशोर! तुमच्या बायलेक पकडा! तिका जर का लावसटीने धरल्यान तर तुमची बाईल वाचुची नाय! सारिका समुद्राच्या दिशेने धावलेली पाहताच रागाने धुसफुसणारी ती लावसट तिच्या मागे गेली. ती लावसट आपल्या मूर्त रुपात आली होती. किशोर सारिकाच्या जवळ पोहोचायच्या आत तिने सारिकाला गाठले आणि क्षणात गायब झाली. धावणारी सारिका अचानक हवेत उचलली गेली आणि तरंगत समुद्राच्या दिशेने पुढे सरकू लागली. ते पाहून किशोर चक्रावलाच. त्याने धावायचा स्पीड वाढवला, पण वाळूत फार वेगात धावणे त्याला शक्य होत नव्हते. सारिका समुद्रापर्यंत पोहोचली होती आणि आता ती समुद्रात जाऊ लागली. छातीपर्यंत पाणी आल्यावर तिने पाण्यात बुडी मारली पाठोपाठ किशोरने देखील पाण्यात बुडी मारली. सारिका पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली. ती लावसट तिला पाण्यात बुडवू लागली. तितक्यात किशोरने सारिकाला गाठले आणि तिला धरून पाण्याबाहेर ओढू लागला पण त्या लावसटीच्या ताकदी पुढे त्याची ताकद तोकडी पडत होती. आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा किशोरने सारिकाला स्पर्श केला होता तेव्हा तेव्हा लावसटीने सारिकाला सोडले होते पण आता मात्र ती तिला सोडत नव्हती. किशोरचा हात त्याच्या गळ्याकडे गेला आणि त्याला धक्काच बसला त्याचे लॉकेट त्याच्या गळ्यात नव्हते. त्याला आठवले की रुममध्ये सारिकाला मिठाच्या आणि भस्माच्या वर्तुळात झोपवताना मालवणकरांनी त्याला ते सारिकाच्या गळ्यातून काढायला सांगितले होते, पण पुढच्या गडबडीत तो ते आपल्या गळ्यात घालायला विसरला होता आणि ते तिथेच बेडवर राहिले होते.

आपल्या गळ्यात लॉकेट नाही हे लक्षात येताच किशोर पुरता घाबरला कारण आता त्या लावसटीच्या ताकदी पुढे त्याचे काहीच चालणार नाही हे लक्षात यायला त्याला वेळ लागला नाही. तरीही हिम्मत न हारता तो सारिकाला किनाऱ्याकडे ओढण्याची शर्थ करू लागला. तिकडे किशोर सारिकाला वाचवण्यासाठी त्या लावसटीसोबत लढत होता आणि त्याचं वेळी रमेश मालवणकर आजूबाजूचा अंदाज घेत होते. सगळीकडे सामसूम झाली होती. रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांव्यतिरिक्त चिटपाखरुही नव्हते हे एका अर्थी बरे झाले होते. उगाच गवगवा झालेला त्यांना नको होता. त्यांनी पटकन ते अर्भक असलेली पिशवी आणि आपली सामग्री असलेली पिशवी गाडीतून काढली आणि त्या दोन्ही पिशव्या घेऊन ते त्यांच्या घरापासून जवळच असलेल्या दफनभुमीकडे धावले. फटका जवळ खुर्ची टाकून बसलेला चौकीदार बसल्या बसल्याच घोरत होता. दफनभुमीतील शांत वातावरणात त्या चौकीदाराच्या घोरण्याचा आवाज खूप मोठा वाटत होता. अजिबात आवाज न करता त्याच्या बाजुने ते हळूच फटकामधुन आत शिरले. आयत्या वेळी गडबड नको म्हणून तिथे कबर खोदण्याचे काम करणाऱ्या गड्याने काही खड्डे खणून ठेवले होते त्यातल्या एका अर्धवट खणलेल्या खड्याकडे त्यांचे लक्ष गेले. तो खड्डा त्या अर्भकाला पुरण्यासाठी पुरेसा होता त्यामुळे त्यांनी पिशवीतून आणलेले ते अर्भक त्याच्या कपड्यासकट त्या खड्ड्यात ठेवले त्या अर्भकाच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी काही मंत्र म्हणत ते त्याच्यावर माती टाकू लागले. मालवणकरांनी मंत्र म्हणण्यास सुरवात करताच त्या लावसटीने सारिकाचे शरीर सोडले आणि भयाकारी चित्कार करत ती दफनभुमीच्या दिशेने जाऊ लागली.