स्कुबा डायव्हिंग

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जून २०१६

स्कुबा डायव्हिंग - मराठी कथा | Scuba Diving - Marathi Katha

किशोर पुरेसा दूर जाताच मालवणकरांनी आरडा ओरडा केला तो ऐकून बाजूच्या वॉर्ड मधील वॉर्डबॉय, नर्स व काही पेशंट वगैरे धावत आले. मालवणकरांनी मग झाला प्रकार त्यांना मीठ मसाला लावून सांगितला, सगळ्यांनाच शवागारात जायची भिती वाटत होती पण काही जणांनी धाडस करून जनार्दनला उचलून बाहेर आणले आणि हॉस्पिटलमधील एका कॉटवर झोपवले. तोंडावर पाणी मारल्यावर जनार्दन शुद्धीवर आला, त्याला प्रचंड धक्का बसला होता त्यामुळे तो असंबद्ध बरळू लागला. तो दारू प्यायलेला आहे हे त्याच्या तोंडाला येणाऱ्या वासावरून लक्षात आल्यावर, त्याच्या बडबडीला काही अर्थ नाही असे म्हणुन सर्वजण तिथून पांगु लागले आणि त्या गोंधळाचा फायदा घेऊन मालवणकरपण तिथून निसटले. मालवणकर गाडीपाशी आले तेव्हा किशोर आणि सारिका त्यांचीच वाट पाहत बसले होते. मालवणकरांना पाहताच त्यांच्या जीवात जीव आला. ते तातडीने तिथून निघाले. या सगळ्या गडबडीत रात्रीचे साडेदहा वाजले होते. ट्रफिक खूप कमी असल्यामुळे सफाईदार वळणे घेत गाडी वेगाने देवबागच्या दिशेने जाऊ लागली.

किशोर आणि सारिका मागच्या सीटवर बसले होते. साधारण अकरा वाजले होते, अर्ध्या रस्त्यावर आल्यावर गाडीने गचके खायला सुरवात केली, शेवटी एक मोठा गचका खाऊन गाडी बंद पडली. हातातील वेळ निघून जात चालला असल्यामुळे सर्वच चिंतेत होते त्यात हे नवीन संकट समोर उभे ठाकले होते. मालवणकर आपले सारे कौशल्य पणाला लाऊन गाडी ठीक करण्याचा प्रयत्न करत होते. आणि कुठून इकडे यायची दुर्बुद्धी झाली या विचारात किशोर आणि सारिका दोघेही आपल्या नशिबाला दोष देत होते. फुलासारखी नाजूक आणि सुंदर सारिका एकदम मलूल झाली होती. पुण्यासारख्या मॉडर्न शहरात राहणाऱ्या त्या दोघांना हा सगळा प्रकार न पचणारा होता. गंमत म्हणुन हॉरर स्टोरीज वाचणे आणि सिरिअल्स पाहणे वेगळे आणि आपण स्वतः या सगळ्या प्रकाराचा भाग होणे वेगळे. एवढ्या तणावातही, आपल्याशी कोणतीही ओळख-पाळख नसताना आपल्या मदतीसाठी धावून आलेल्या मालवणकरांचे त्यांना खूप अप्रूप वाटले. सारिकाला धीर देऊन किशोर मालवणकरांच्या मदतीसाठी गेला. मोठ्या प्रयत्नांनी शेवटी एकदा गाडी सुरु झाली. आणि देवाचे आभार मानत ते तिघेही पुन्हा देवबागच्या दिशेने निघाले. किशोरने घड्याळात पहिले तेव्हा रात्रीचे साडे बारा वाजले होते.