स्कुबा डायव्हिंग

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जून २०१६

स्कुबा डायव्हिंग - मराठी कथा | Scuba Diving - Marathi Katha

शवागारात शिरताच तिथल्या थंड वातावरणाने दोघांच्याही अंगावर काटा आला. सारिका प्रमाणेच किशोरलाही भिती वाटत होती पण ठरवलेले काम करणे भाग होते. आतमध्ये त्या अर्भकाला शोधायचे कुठे हा प्रश्न दोघांना पडला पण तितक्यात मोबाइलच्या टोर्चच्या प्रकाशात त्याला टेबलावर ठेवलेले एक पॅड दिसले त्यावर एका वहीत एका पानाच्या सुरवातीला त्या दिवसाच्या तारखेला एका स्त्री जातीच्या अर्भकाची नोंद केलेली त्याला दिसली व त्यापुढे ज्या शवपेटीत त्या स्त्री अर्भकाचा मृतदेह ठेवला होता त्या पेटीचा क्रमांकही त्याला दिसला. देवाचे आभार मानत त्या दोघांनी भीत भीतच ती पेटी शोधली. पेटी उघडताच आतील बल्ब पेटला आणि आत ठेवलेले ते स्त्री अर्भकाचे कलेवर पाहून दोघांचेही डोळे पाणावले पण भावनेला आवर घालून किशोरने सारिकाला सावरले. का कोणास ठाऊक पण त्या अर्भकाच्या डेड बॉडीला उचलताना त्याचे डोळे हलल्यासारखे किशोरला वाटले. आपण शवागारात आहोत याची जाणीव झाल्याने त्या थंड वातावरणातही त्याला घाम फुटला. आपल्याला भास झाला असेल असा विचार करून त्या बद्दल त्याने सारिकाला काही न बोलता जवळच पडलेल्या एका फडक्यात त्या अर्भकाला गुंडाळून सोबत आणलेल्या पिशवीत ठेवले. दरवाजातून बाहेर पडण्याआधी त्यांनी दरवाजा थोडासा किलकिला करून बाहेरचा अंदाज घेतला अजूनही जनार्दनची दरवाज्याकडे पाठच होती. ती संधी साधून त्याने सारिकाला पिशवी घेऊन हळूच बाहेर पडायला सांगितले. तिने एकटीने जायला विरोध केला तेव्हा किशोरने तिला समजावले की त्याला त्या वहीतील त्या अर्भकाची नोंद केलेले पान फाडून आणायचे आहे जेणेकरून कोणताही पुरावा मागे राहणार नाही. त्यामुळे तिने पुढे जावे आणि तो मागून येईल आणि काही गडबड झालीच तर तिने सरळ जाऊन गाडीत बसावे तो काही तरी शक्कल लढवून तिला येउन भेटेल. सारिकाला त्याचे म्हणणे पटले व तिने बाहेरचा कानोसा घेत हळूच दरवाजा उघडला तसे रमेश मालवणकरांनी बोलण्या बोलण्यात जनार्दनला तिथून थोडेसे दूर नेले. ती संधी साधून सारिका त्या अर्भकाला घेऊन तिथून पसार झाली.

इकडे आवाज होणार नाही याची काळजी घेऊनही किशोरने वहीतील तो कागद फाडला आणि त्याचा आवाज त्या शवागाराच्या शांततेत चांगलाच घुमला. आपल्या घाईबद्दल किशोरने स्वत:लाच एक शिवी हासडली आणि पुढे काय होते याचा तो कानोसा घेऊ लागला. दुर्दैवाने तो आवाज दरवाजाला टेकून बसलेल्या जनार्दनच्या कानात शिरला आणि तो एकदम दचकलाच. शवागारातून आवाज कसा काय आला या विचाराने त्याच्या पाठीतून भितीची थंड शिरशिरी गेली. त्याने खात्री करण्यासाठी मालवणकरांना विचारले की त्यांनी कोणता आवाज ऐकला काय म्हणुन, पण मालवणकरांनी त्याची शंका, “तुका भास झालो असतलो”, असे म्हणत धुडकावून लावली. जनार्दनने तो आवाज अगदी स्पष्टपणे ऐकला होता पण त्याला आत एकट्याने जाऊन खात्री करायची भिती वाटत होती म्हणुन त्याने मालवणकरांना सोबत यायची विनंती केली. मालवणकरांनी त्याचे मन वळवायचा खूप प्रयत्न केला पण तो अडून बसला. शेवटी धाडस करून भीत भीत त्याने दरवाजा ढकलला व डोळे बारीक करून आत मधल्या काळोखात पाहण्याचा प्रयत्न करू लागला पण काही दिसेना म्हणुन आत मध्ये जाऊन आतील लाईट सुरु करण्यासाठी तो हळू हळू पुढे सरकू लागला. तो दरवाज्यातून आत शिरला तोच दरवाज्याच्या आड लपलेल्या किशोरने त्याच्या मागून आपल्या दोन्ही हातानी त्याची मान धरली आणि जनार्दन इतका प्रचंड घाबरला की त्याच्या तोंडातून आवाजच फुटला नाही आणि तो धाडकन बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. ते पाहताच आपल्या हुशारीवर खुश होत किशोर बाहेर आला तसा मालवणकरांनी त्याला पटकन गाडीकडे जाण्यास सांगितले.