स्कुबा डायव्हिंग

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जून २०१६

स्कुबा डायव्हिंग - मराठी कथा | Scuba Diving - Marathi Katha

अक्षय घरातील सगळ्यांना रूम न उघडण्याची तंबी देऊन गेला खरा पण नेमकी त्याची मोठी बहिण अंकिता नवऱ्याबरोबर मुलाला घेऊन घरी आली. चहा करण्यासाठी अक्षयची आई किचन मध्ये गेली आणि तिच्या पाठोपाठ अंकिता पण गप्पा मारण्यासाठी किचन मध्ये गेली. अंकिताचा नवरा रवि हॉल मध्ये पेपर वाचत बसला होता. त्यांचा मुलगा कुणाल किरकिर करू लागला म्हणून तो त्याला बाहेर घेऊन गेला. थोडा वेळ खेळल्यावर कुणालला जोराची लाघवी लागली. घराच्या पाठीमागे दूरवर असलेल्या संडासात त्याला नेण्याऐवजी घरात हॉल मध्ये टांगलेली चावी घेऊन भाड्याने दिलेल्या रूम मधील संडासात नेणे रविला जास्त सोयीस्कर वाटले. दुर्दैवाने त्याने किशोर आणि सारिका उतरलेल्या रूमची चावी घेतली आणि दरवाजा उघडला. रवीने लाईट लावण्याआधीच कुणाल वेगात बाथरुमकडे धावला. तितक्यात मासे घेऊन आलेल्या अक्षयने नाही! थांब! म्हणत धावत येऊन त्याला अडवायचा अयशस्वी प्रयत्न केला पण वेळ झाला होता. नकळत कुणालच्या पावलांनी मीठ आणि भस्मापासून बनवलेले ती वर्तुळे उधळली गेली होती. शेवटी व्हायचे तेच झाले. अक्षय आणि रविला जोराचा धक्का देऊन ती लावसट गडगडाटी हास्य करत दरवाजातून बाहेर निघुन गेली.

रमेश मालवणकर किशोर आणि सारिकासह सरकारी हॉस्पिटल पाशी आले. ७:३० वाजुन गेल्यामुळे काळोख झाला होता पण हॉस्पिटल मध्ये बऱ्यापैकी गर्दी होती. रुग्णांना भेटायची वेळ संपायला अजून अवकाश होता. त्यामुळे थोडी सामसूम व्हायची वाट पहावी असे रमेश मालवणकरांनी किशोरला सुचवले. साधारण तासभर गेल्यावर, गाडीत नुसते बसून राहण्यापेक्षा काहीतरी खाऊन घ्यावे असा विचार करून ते तिघे एका हॉटेलपाशी आले. त्यांचे जेवण उरकेपर्यंत रात्रीचे ९ वाजले होते. गाडी पार्क करून ते तिघेही शवागाराच्या दिशेने चालु लागले. रात्री ९:३० वाजता नाईट शिफ्टचा शवागाराचा वॉचमन कम वॉर्डबॉय जनार्दन परब दोन क्वार्टर लाऊन ड्युटीवर हजर झाला होता. आपले लक्ष नसल्यासारखे दाखवत रमेश मालवणकर शवागाराच्या बंद दरवाज्याच्या बाहेर स्टूलवर बसलेल्या जनार्दन परबाच्या जवळून गेले. दोन क्वार्टर लावलेल्या असूनही जनार्दनने त्यांना ओळखले आणि हाक मारली, “ओ मालवणकरानू! चल्लाव खय? कोणाक शोधताव?” मालवणकरांनी पण आश्चर्य झाल्यासारखे दाखवत, “एका ओळखीच्याक बघुक इलय होतंय, पण बाहेर पडत असताना खय तरी चुकीचो वळलय आणि हयसर येउन पोचलय. पण झाला ता बरा झाला, त्यामुळे तुझी भेट झाली? खय असय खय? आज काल दिसनय नाय” म्हणत जनार्दनला बोलण्यात गुंतवले. शवागाराच्या दरवाज्याकडे त्याची पाठ झाल्याचे पाहताच किशोर आणि सारिका हळूच चोरपावलांनी त्या शवागाराच्या दरवाज्यातून आत प्रवेश केला. कसली तरी चाहूल लागली म्हणुन जनार्दनने वळून पहिले पण तोपर्यंत सुदैवाने दरवाजा बंद झाला होता. मालवणकरांनी पुन्हा त्याला बोलण्यात गुंतवले. आधीच दोन क्वार्टर झालेल्या असल्यामुळे जनार्दनलाही बडबड करायला कोणीतरी हवेच होते त्यामुळे त्यानेही फारसे लक्ष दिले नाही. तसेही शवागाराकडे कोणी फिरकत नसे त्यामुळे तो निवांत होता.