स्कुबा डायव्हिंग

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जून २०१६

स्कुबा डायव्हिंग - मराठी कथा | Scuba Diving - Marathi Katha

रमेश मालवणकरांसह किशोर आणि सारिका रुमच्या बाहेर आले तसे मालवणकर म्हणाले, “त्या लावसटीचो जिव तिच्या पोरीत अडकलो हा, जोपर्यंत तिच्या पोरीचा क्रिया कर्म होना नाय ती असोच त्रास देत ऱ्हवतली. आत्ताच्या आत्ता तिच्या पोरीचा कलेवर (मृत शरीर) शोधून त्याका मूठमाती देऊक व्हयी. एकदा का ह्या केला की तिच्या पोरीक मुक्ती मिळतली मग तिका ह्या जगात ऱ्हाऊक कारणच उराचा नाय. तिची इच्छा असो वा नसो तिका मुक्त होऊचाच लागतला.” मालवणकरांचे म्हणणे जरी योग्य होते तरी सारिकाने ते मृत अर्भक पाहून आता १२ तासांच्या वर झाले होते. एवढ्या मोठ्या काळात ते अर्भक तिथेच असण्याची शक्यता जवळ जवळ शुन्य होती. एव्हाना त्याची माहिती पोलिसांना होऊन ते अर्भक पोस्ट मॉर्टेम साठी गेले असण्याचीच शक्यता जास्त होती. पण दुसरा पर्याय नसल्याने ते करणे भाग होते. रमेश मालवणकरांनी अक्षयला त्याच्या मावस भावाची ओम्नी व्हॅन मागून आणण्यास सांगितले. गाडी येताच अक्षयला रूमवर लक्ष्य ठेवायला सांगुन, रुम मध्ये कोणालाही सोडू नको असे रमेश मालवणकरांनी अक्षयला बजावले. गाडी सुरु करून रमेश मालवणकर, किशोर आणि सारिकासह मालवणला जायला निघाले. अक्षयने किशोर आणि सारिका उतरलेल्या रूमला कुलुप लावले आणि घरात ती रूम कोणीही उघडू नका असे बजावून रात्रीच्या जेवणासाठी समुद्रावर मासे आणायला गेला.

साधारण तासाभरात रमेश मालवणकर किशोर आणि सारिकासह मालवण बस स्थानकावर पोहोचले. स्थानकावर पोलिसांना पाहून मालवणकरांनी गाडी थोडी दूर लावली. उगाच किशोर आणि सारिकाला कोणी ओळखू नये अशी धास्ती त्यांना वाटली. मालवणकरांना बहुतांश लोक ओळखत होते त्यामुळे त्यांना आलेले पाहताच तिथलाच एक रिक्षावाला त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, “मालवणकरानु एवढ्या उशिरा मालवणात इलास ते! काय विशेष?”. “काय नाय रे पावण्यांका मालवणी खाजे घेऊचे होते म्हणान इलय. पोलिस इलेले दिसतत स्थानकावर! काय झाला काय?” असे मालवणकरांनी विचारताच तो रिक्षावाला सांगू लागला, “तुमका म्हाईत नाय वाटता? पोलिसांका लेडीज टॉयलेट मध्ये एका लहान बाळाची बॉडी मिळाली हा. त्याका थयसर कोणी टाकल्यान ता माहिती नाय पण कोणीतरी बाईलच असतली असो अंदाज हा. पोलिस चौकशी करतत.”“वाईट झाला! नाय रे? मेल्यांका संभाळुक जमना नाय तर जन्माक घालततच कित्याक ताच माका समजना नाय! असा टॉयलेट मध्ये पोटच्या गोळ्याक टाकूक लोकांचो जीव तरी कसो होता देव जाणे. पोरगो होतो की पोरगी काय कळला काय रे?” मालवणकरांनी हळहळत विचारले? “पोरग्याक कोण टाकतलो? पोरगीच असतली! माका काय वाटता, कोणाक तरी पोरगो व्हयो असतलो आणि पोरगी झाली म्हणान टाकल्यानी असतला. कोणाची पोर होती, ता काय कळूक नाय पण पोस्ट मॉर्टेमसाठी बॉडीक सरकारी हॉस्पिटलात नेल्यानी असा. उद्या पेपरात येतलाच” तो रिक्षावाला म्हणाला”. “असा काय? बर चल माका जाऊचा हा, गडबडीत असय, पुन्हा भेटू” असे म्हणून मालवणकरांनी गाडी पुढे घेतली. थोडे पुढे गेल्यावर ते किशोरला म्हणाले, “माझो अंदाज खरो ठरलो. डेड बॉडीक पोस्ट मॉर्टेमसाठी घेऊन गेले असत. आता आपल्याक हॉस्पिटलात जाऊचा लागतला. काय तरी आयडिया करून त्या पोरीची बॉडी मिळवूक व्हयी. ती वर्तुळा त्या लावसटीक किती वेळ बंदिस्त करून ठेवतली ता देवाकच ठाऊक. आपल्याक घाई करुक व्हयी.” एवढे बोलून त्यांनी आपली गाडी सरकारी हॉस्पिटलकडे दामटली.