स्कुबा डायव्हिंग

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जून २०१६

स्कुबा डायव्हिंग - मराठी कथा | Scuba Diving - Marathi Katha

हे ऐकल्यावर रमेश मालवणकरांच्या सगळा प्रकार लक्षात आला. वेळ फार थोडा आहे तेव्हा घाई करायला पाहिजे हे त्यांनी ताडले. “मी आता जे काय सांगतंय ते निट समजून घेवा आणि तसाच करा. सायबानु, यात टायमिंगच मेन असा, त्यामुळे जराशी जरी चुक झाली तरी तुमी तुमच्या बायलेक कायमचे मुकतलात.” असे म्हणत त्यांनी दोघांना काय करायचे आहे हे नीट समजावले. मग सोबत आणलेल्या पिशवीतून त्यांनी भस्म काढले व त्यापासून एक वर्तुळ बनवले. नंतर पिशवीतून आणलेल्या मिठाने त्यांनी भस्माच्या वर्तुळाभोवती त्यापेक्षा एक मोठे वर्तुळ काढले. दोन वर्तुळामधील जागेत त्यांनी एक पिशाच्चबंध मंत्र गोलाकार लिहिला. दोन्ही वर्तुळे प्रथम बाथरूमच्या बाजुने उघडी केली आत येण्यासाठी अरुंद रस्ताच जणू. तसाच रस्ता विरुद्ध बाजूला बाहेर पडण्यासाठी दरवाज्याच्या दिशेने बनवला. किशोर आणि सारिका ते काय करत आहेत हे कुतुहलाने पाहात होते. काम पुर्ण झाल्यावर त्यांनी सारिकाला गळ्यातील लॉकेट काढून त्या वर्तुळात झोपायला सांगितले, तसे किशोरने त्याला विरोध केला पण मालवणकरांनी त्याला सर्व काही ठीक होईल असा दिलासा दिला. त्याने सारिकाच्या गळ्यातील लॉकेट काढुन घेतले व तिला वर्तुळात झोपवले. सारिका प्रचंड घाबरली होती पण किशोर खातर ती तयार झाली.

सारिका वर्तुळात झोपताच रमेश मालवणकरांनी पिशाच्च आवाहन सुरु केले, थोड्याच वेळात रुम मधील वातावरण जड आणि थंड जाणवू लागले. बाथरूम जवळ एक काळी आकृती मनुष्य रूपात आकार घेऊ लागली. तिचे डोळे, नाक, कान, चेहरा, हात, पाय, शरीर हळूहळू स्पष्ट दिसु लागले. त्या आकृतीला एका स्त्रीचा आकार प्राप्त झाला. ती एकटक वर्तुळात बसलेल्या सारिकालाच पाहात होती. तिच्या चेहऱ्यावर एक खुनशी हास्य विलसत होते. तिचे हात तिच्या सावजाच्या नरडीचा घोट घ्यायला आतुर झाले होते. हळूहळू तरंगत ती सारिकाच्या दिशेने पुढे सरकु लागली. तिला आपल्या कडे येताना पाहून सारिका गलीतगात्र झाली, पण किशोर आणि रमेश मालवणकरांवर विश्वास टाकून ती तशीच पडून राहिली. ती आकृती वर्तुळात शिरताच रमेश मालवणकरांनी शिताफीने एका मुठीत भस्म आणि दुसऱ्या मुठीत मीठ घेऊन बाथरूमच्या दिशेची दोन्ही वर्तुळे बंद केली आणि ओरडले, “सायबानु हीच वेळ असा!” त्याबरोबर मालवणकरांचा आवाज ऐकून ती स्त्री सदृश्य आकृती त्यांच्या दिशेने वळली. तो क्षण साधुन सारिका दोन्ही वर्तुळातुन बाहेर पडली आणि किशोरने दरवाजाच्या दिशेची दोन्ही वर्तुळे बंद केली. ती लावसट त्या वर्तुळात अडकलेली पाहून रमेश मालवणकरांसह किशोर आणि सारिकाच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. आपण अडकल्याची जाणीव झाल्यावर ती लावसट आपल्या भयानक मुर्त रूपात त्यांच्या अंगावर धाऊन जाऊ लागली पण तिने वर्तुळाच्या बाहेर पडायचा प्रयत्न करताच वेदनेने आर्त किंचाळली. तिचा पाय जबरदस्त भाजला होता. रागातच ती त्वेषाने बोलली, “मालवणकरां तुका काय वाटला? तु माका बांधून ठेऊ शकतय! माका माझा बाळ व्हया असा, मी ह्या बायलेक (स्त्रीला) तर मारतलयंच पण तुका पण सोडूचं नाय. माका मुक्त कर, नायतर तुझ्या पुऱ्या घरादाराचो निर्वंश केल्या बिगर मी शांत बसूची नाय.” तिचा तो आवेश ऊरात धडकी भरवत होता.