स्कुबा डायव्हिंग

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जून २०१६

स्कुबा डायव्हिंग - मराठी कथा | Scuba Diving - Marathi Katha

साहसाची आवड अनेकांना असते. खुप थ्रिल वाटते, अंगावर रोमांच येतात. जेवढा धोका जास्त तेवढीच मजा जास्त, असे साधे समीकरण असते. मग अजून जास्त धोका पत्करायचा. कारण साहसाची नशा काही औरच असते. अशीच साहसाची ओढ किशोर आणि सारिकाच्या काही भलतीच अंगलट येते आणि सुरु होतो त्यांचा मृत्युशी पाठशिवणीचा खेळ याचीच कहाणी म्हणजे स्कुबा डायव्हिंग.

मॉर्निंग शिफ्ट जशी संपत येत होती तशी किशोरची चलबिचल वाढत होती. एव्हाना सारिकाचे ३ कॉल्स येऊन गेले होते. नाईट शिफ्टच्या इंजीनियरला त्याने विनंती करून १ तास लवकर बोलावले होते, पण तो अजुन आला नव्हता. एखादा चहा घ्यावा असा विचार करून किशोर ऑफिस जवळच्या एका टपरीपाशी आला. तेवढ्यात त्याला घाई गडबडीत कंपनीच्या बिल्डींग मध्ये शिरणारा विशाल दिसला. चहाची तलफ टाळून विशालच्या पाठोपाठ किशोरही ऑफिस मध्ये गेला. शिफ्ट अपडेट दिल्यावर, विशालचे लवकर आल्याबद्दल आभार मनात किशोरने आपल्या बुलेटला किक मारली आणि त्याची बुलेट धडधडत घराकडे निघाली. २५ मिनिटातच किशोर घरी पोहोचला, सारिका त्याची वाटच पाहात होती. तो आलेला दिसताच तिच्या चेहऱ्यावरील टेन्शन गायब झाले आणि त्याची जागा एका मधुर स्मिताने घेतली. “काय रे, किती उशीर?” असे ती लटके रागावताच त्याने तिला घट्ट मिठीत घेतले आणि कानात हळूच पुटपुटला “हॅप्पी ऍनिव्हर्सरी डियर, लेट्स सेलिब्रेट”. किशोर मुड मध्ये येत आहे; हे लक्षात येताच सारिका त्याच्यापासुन दूर होत म्हणाली, “आपली ८ ची गाडी आहे साहेब! आणि इथेच ७:१५ झालेत. ऍनिव्हर्सरी इथेच साजरी करायच्या विचार आहे की काय?’’ सारिकाने वेळेचे भान करून देताच किशोर पटकन फ्रेश होऊन आला, तिने केलेला गरमागरम चहा घेऊन ते दोघे बस स्टँडकडे दोन दिवसाचे मोजकेच कपडे व जुजबी सामान घेऊन निघाले.

किशोर एका कंपनीत टेक सपोर्ट इंजिनिअर म्हणुन काम करायचा तर त्याची बायको सारिका, PWD मध्ये असिस्टंट सिव्हिल इंजिनिअर म्हणुन कार्यरत होती. किशोर आणि सारिकाच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी तारकर्ली जवळील देवबाग हे ठिकाण निवडले होते. पहिल्या दिवशी समुद्रात मस्त डुंबायचे. स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग, फोटोग्राफी वगैरे करायची. डॉल्फिन सफारीचा आनंद लुटायचा, सोबत मालवणी माशाच्या जेवणावर ताव मारायचा आणि दुसऱ्या दिवशी मालवण आणि आसपासचा परिसर फिरून यथेच्छ कोंबडी वडे हाणायचे. आणि मालवणच्या PWD च्या रिसॉर्टवर मस्त आराम करायचा असा बेत किशोरने आखला होता. तारकर्लीला PWD चे रिसॉर्ट नसल्यामुळे, तिथे याआधी गेलेल्या त्याच्या मित्राकडून किशोरने सगळी माहिती करून घेतली आणि तो राहिलेल्या हॉटेल मध्येच त्यानेही आपले राहण्याचे बुकिंग करून ठेवले.

निगडी-मालवण बसने, रात्री बरोबर ८ वाजता पुणे सोडले. सातारा, कराड, कोल्हापूर, तळेरे, कणकवली करत पहाटे बरोबर ६ वाजता गाडी मालवणला पोहोचली. बसस्टँडवर देवबागसाठी गाडी लागलेलीच होती, त्यामुळे वेळ न घालवता हॉटेल वर गेल्यावरच फ्रेश होऊया असे किशोरचे मत होते. पण फार वेळात टॉयलेटला न गेल्याने, “दोनच मिनिटात आले, फार अर्जंट आहे”, म्हणत सारिका टॉयलेटकडे धावली. गाडीला उशीर होत असल्याने महिला कंडक्टर घाई करू लागली होती. सारिका अजून न आल्याने किशोरही वैतागला होता. इतक्यात घामाघुम झालेली सारिका, धावत त्याच्या दिशेने येताना त्याला दिसली. धापा टाकत सारिका त्याला काही सांगू पाहात होती, पण आधी गाडीत बस! म्हणत किशोरने तिला गाडीत जवळ जवळ ढकललेच. दोघे त्या गाडीत चढले आणि लगेचच गाडीने मालवणचे बसस्टँड सोडले.