Download MarathiMati.com's New Android App from Google Play

सप्तपदी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ ऑगस्ट २०१६

सप्तपदी - मराठी कथा | Saptapadi - Marathi Katha - Page 9

घरातील सासरे सोडून सर्व सदस्य कामासाठी बाहेर गेल्यावर अस्मिताला थोडी उसंत मिळाली तशी ती घराबाहेर पडली. तिने कॉईन बॉक्सवरून वामनरावांना फोन लावला, त्यांनी तो उचलला पण अस्मिता काहीच बोलली नाही. एक दोन वेळा हॅलो बोलुनही समोरून काही प्रतिसाद न मिळाल्यामुळे वामनराव थोडेसे चिडले पण अस्मिताच्या एक हुंदक्याने त्यांनी ओळखले की विरुद्ध बाजुला आपली लाडकी अस्मि आहे. एका क्षणात त्यांच्या चेहेऱ्यावर उत्सुकता, आनंद, दुःख, राग अशा अनेक भावना तरळुन गेल्या. त्यांचा आवाज कातर झाला पण दुसऱ्या क्षणाला तितकेच कठोर होऊन ते म्हणाले की, “तु मला कायमची मेलीस, परत मला फोन करू नकोस” आणि त्यांनी खाडकन फोन ठेऊन दिला. त्यासरशी इकडे अस्मिताच्या आणि तिकडे वामनरावांच्या दोघांच्याही डोळ्यातुन अश्रुंचे पाट वाहू लागले. डोळे पुसत ते कामाला लागले आणि तिनेही आपल्या घराचा रास्ता धरला. आता हे जवळ जवळ रोजचेच झाले. ठीक बारा वाजता अस्मिता आपल्या वडिलांना फोन करायची ते तो घ्यायचेही पण कोणीच काही बोलायचे नाही. मग भरल्या डोळ्यांनी फोन कट व्हायचा. असेच दोन महिने निघुन गेले. अस्मिता आता घरकामात बरीच तरबेज झाली होती पण तिचा सासुरवास काही संपायची लक्षणे दिसत नव्हती. असे घरात किती दिवस बसणार म्हणुन तिने एका सी ए च्या ऑफिसमध्ये नोकरी पत्करली. पाच हजार रुपये पगार ठरला. तिने घरी ही आनंदाची बातमी सांगितली पण पगार तीन हजारच सांगितला. तिला खात्री होती जर का खरा पगार कळला तर आनंद तो सगळाच दारूत उडवेल अडचणीच्या वेळी उपयोगी पडतील म्हणुन तिने दोन हजाराची आर.डी. उघडायचे ठरवले. घरी तिच्या नोकरीच्या बातमीचे थंड स्वागत झाले त्यामुळे ती हिरमुसली.

रात्री आनंद घरी आल्यावर तिने त्याला ती बातमी दिली पण त्यावर त्याने तिला शिव्या दिल्या, “तुझ्या तीन हजारांनी काय होणार आहे, बापाकडुन चांगले आठ दहा लाख घेऊन ये तर घराची परिस्थिती काही तरी सुधारेल. झक मारली आणि तुझ्याशी लग्न केले. तुझ्या बापाकडुन असा पैसा नाही बाहेर पडणार तो कसा बाहेर काढायचा ते मला माहीत आहे” असे म्हणुन त्याने तिला लाथा बुक्क्यांनी अक्षरशः तुडवून काढले. ती गुरासारखी ओरडत होती पण घरातील कोणालाच दया नाही आली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकुन दारात आलेल्या शेजाऱ्यांना त्यांनी हाकलून दिले. बिचारी अस्मिता त्या भयानक माराने अर्धमेली झाली होती. तिला तसेच जमीनीवर पडलेले सोडुन आनंद दारूच्या गुत्त्यावर जायला निघाला. जाताना त्याने तिला तिच्या वडिलांकडून पैसे आणण्यास सांगितले आणि न आणल्यास पुन्हा असाच मार मिळेल अशी धमकीही दिली. आपल्या आईला तिला जेवायला देऊ नकोस असे सांगुन तो घराबाहेर निघुन गेला. रात्री उशिरा घरी आल्यावर तिची विचारपुसही न करता किंवा तिच्या वेदनांची पर्वा न करता त्याने तिच्यावर पाशवी बलात्कार केला. आणि तिला एखाद्या पोतेर्‍यासारखे दूर सारून तो झोपी गेला. ती रात्रभर वेदनेने कण्हत होती पण कोणालाच दयेचा पाझर फुटला नाही, सर्वाना फक्त हवी होती ती तिच्या बापाची दौलत.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play