सप्तपदी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ ऑगस्ट २०१६

सप्तपदी - मराठी कथा | Saptapadi - Marathi Katha - Page 8

सकाळी सासुच्या कर्कश आवाजाने अस्मिताची झोपमोड झाली. तिने उठायचा प्रयत्न केला पण लादीवर झोपल्यामुळे तिचे अंग आखडले होते. आनंदच्या जबरदस्तीमुळे तिच्या गोऱ्या नाजुक अंगावर काळे निळे चट्टे उमटले होते आणि ते ठसठसतही होते. डोळ्यातील पाणी काजळ सोबतीला घेऊन तिच्या गालांवर सुकल्यामुळे सर्व चेहरा काळवंडला होता. अंगाला रग लागल्यामुळे कळ जिरुन तिला उठुन उभे राहायला खुप वेळ लागला. इतक्यात तिची सासु करवादली, “झाली का झोप महाराणीची? उशीरापर्यंत झोपुन राहायला हे काय तुझ्या बापाचे घर नाही, चल उठ, आवर आणि कामाला लाग. कालची भांडी आणि कपडे पडलेत ते धुऊन घे, मग स्वयंपाकाचे पण बघायचे आहे. येतो ना स्वयंपाक की त्यासाठी आता नोकर बोलवायचे तुझ्या घरून? चल ऊठ लवकर. माझे तोंड नको बघत राहु. आनंद उठला की त्याला कडक चहा पण द्यायचा आहे, त्याशिवाय त्याची रात्रीची उतरणार नाही.” लाडा-कोडात वाढलेल्या अस्मिताने कधी स्वयंपाक घरात जाऊन साधे पाणीही घेतले नव्हते, ते ही घरातील नोकर तिला तिच्या रूम मध्ये आणुन द्यायचे, भांडी घासणे आणि कपडे धुणे याच्याशी तिचा दूरपर्यंत संबंध नव्हता. आपण कुठे आहोत याचा अंदाज यायला तिला काही काळ गेला मग तिने स्वतःला सावरले. काही न बोलता छोट्याश्या मोरीत आपली आंघोळ आणि इतर प्रातर्विधी पटपट उरकले आणि किचन मध्ये आली. गादीवर आनंद वाकडा तिकडा पसरला होता. त्याच्या कपड्यांवरची घाण बेडसीटलाही लागली होती. ती त्याच्याकडे पाहात असताना मागून सासु ओरडली, “हे आम्हाला रोजचंच आहे, तुलाही सवय होईल. आता त्याच्याकडे बघत बसणार आहेस की घरातली कामे उरकणार आहेस? आम्हालाही जायचंय कामावर. जा सगळ्यांसाठी चहा टाक.” अस्मिताने आईला बाबांसाठी चहा करताना अनेकदा बघितले होते पण स्वतः मात्र कधीच केला नव्हता. घरातील माणसे मोजुन तिने अंदाजाने चहाचे आधण ठेवले.

घरातील सर्व सदस्य चहासाठी जमले पण साखर पावडरचे प्रमाण चुकल्यामुळे चहा खुप कडु झाला होता. पहिला घोट घेताच आनंदने चहाची चुळ भरली आणि “तुझ्या बापाने तरी कधी असा चहा केला होता का?” म्हणत सर्वांसमोर अस्मिताच्या एक कानाखाली वाजवली आणि तणतणत घरातुन कामावर निघुन गेला. सुमन फिदी फिदी हसत तिला म्हणाली, “लवकर सगळे शिकुन घे बाई नाहीतर तुझे काही खरे नाही.” अस्मिता रडत रडत किचन मध्ये गेली तशी तिची सासु कडाडली, “साधा चहा सुद्धा करता येत नाही मग संसार कसा करणार आहेस देव जाणे. आणि ही रडायची नाटकं आहेत ना, ती आपल्या बापाच्या घरी जाऊन करायची इथे नाही समजलं! जा जाऊन आधी भांडी घास आणि कपडे धु.” डोळे पुसत अस्मिता मोरीकडे गेली. कशीतरी भांडी घासुन तिने सासुला दिली व कपडे धुऊ लागली. तिचे डोळे अखंड वाहत होते, आपल्या वडिलांच्या घरी तिने घालवलेले ऐषारामी आयुष्य, तिच्या आई वडिलांनी प्रेमाने पुरवलेले तिचे सर्व योग्य अयोग्य हट्ट तिच्या डोळ्यासमोरून तरळु लागले. माहेरच्या आठवणीने ती खुपच व्याकुळ झाली होती. आपल्या प्रेमळ वडिलांचा मायेचा शब्द ऐकण्यासाठी तिचे मन आतुर झाले होते. सकाळपासुन तिने काहीही खाल्ले नव्हते त्यामुळे पोटात भुकेचा डोंब उसळला होता. आपल्या आईच्या हातच्या अनेक चविष्ठ पदार्थांच्या आठवणीने तिच्या जीभेला पाणी सुटत होते. या सगळ्या आठवणीत ती हरवलेली असतानाच सासुचा आवाज तिच्या कानावर पडला, “आम्ही कामावर जातोय, कपडे धुऊन झाले की नीट वळत घाल. जेवण करून ठेवलय ते त्या पोश्या थेरड्याला (सासऱ्याला) गिळायला घाल आणि तु पण गिळ. नंतर संध्याकाळची भाजी साफ करून ठेव.” अशा सगळ्या सुचना देऊन तिची सासु आणि सुमन धुणी भांडी करायला निघुन गेल्या. त्यांच्या बरोबर आकाशही घराबाहेर पडला.

“अस्मिताच्या स्वप्नांची कशी राख रांगोळी झाली ते आपण पाहीले. वशीकरणाच्या प्रभावामुळे या दुष्टचक्रातुन ती कधी बाहेर पडू शकेल का? की उभा जन्म तिला आनंदच्या लाथा खात काढावा लागेल? या सारख्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी पुढे वाचा.”