सप्तपदी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ ऑगस्ट २०१६

सप्तपदी - मराठी कथा | Saptapadi - Marathi Katha - Page 7

अस्मिताच्या सासरी येण्यामुळे आनंदच्या घरचे सगळेच खुश झाले होते. अस्मिताच्या पाठोपाठ भरपुर पैसा घरात येणार आणि आपले दारिद्र्य कायमचे मिटणार या विचाराने सर्वांनाच आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पण अस्मिताला तिच्या वडिलांनी आपल्या इस्टेटीतुन बेदखल केल्याचे कळताच मात्र सर्वांचीच तोंडे पाहण्यासारखी झाली. त्यांची सगळी स्वप्नेच धुळीला मिळाली होती. अस्मितासमोर कोणीच काही बोलले नाही पण आनंदला बाजुला घेऊन सगळेजण त्याला शिव्या देऊ लागले. तेव्हा आनंदने त्यांना विश्वास दिला की, सुरवातीला तिचे वडिल थोडी नाटके करतील पण नंतर त्यांना हे लग्न मान्य करावेच लागेल आणि त्यांनी नाही मान्य केले तर ते कसे मान्य करवुन घ्यायचे हे तो व्यवस्थित जाणतो. “थोडे दिवस दम धरा, तिच्या बापाला, नाही नाक घासत माझ्या पायाशी लोळण घ्यायला लावली तर आनंद नांव नाही सांगणार. आणि समजा आपल्या प्लॅनप्रमाणे काही नाहीच झाले तर जगात श्रीमंत बापांची आणि त्यांच्या मुलींची काही कमी नाही. फक्त बिचाऱ्या अस्मिताला त्यासाठी मरावे लागेल,” असे म्हणुन आनंद खदाखदा हसु लागला आणि त्याचे कुटुंबीय त्याच्या हसण्यात सामील झाले. आपल्या सुखाच्या संसाराची स्वप्ने रंगवत एक हॉल आणि किचन असलेल्या त्या ओबड-धोबड घरातील स्वयंपाकघरामध्ये अस्मिता साजशृंगार करून आपल्या नवऱ्याची वाट पाहत बसली होती. बराच वेळ आनंद न आल्यामुळे तिने जाऊन सुमनला तो कुठे आहे असे विचारले. तर “कळेल तुला लवकरच” म्हणत ती फिदी फिदी हसु लागली. अस्मिताला तिचे वागणे जरा विचित्रच वाटले, पण पुढे काही न बोलण्यात शहाणपण मानुन ती गप्प बसली. घरातील इतर सदस्य जेवुन एव्हाना हॉल मध्ये झोपायच्या तयारीला लागले होते. रात्रीचे बारा वाजुन गेले तरी आनंदचा पत्ता नव्हता, किचन हीच आज त्यांची बेडरूम आणि जमीनीवर अंथरलेली एक गादी हीच त्यांची सुहागरात्रीची शेज होती. आनंदची वाट पाहुन थकलेली अस्मिता गादीवर बसल्या बसल्या पेंगु लागली.

रात्रीचे साधारण दिड वाजले असतील, भांडे पडल्याच्या आवाजामुळे अस्मिता दचकुन जागी झाली. उठुन तिने लाईट सुरु केला तर दारूच्या नशेत झुलणारा आनंद तिला दिसला. त्याच्या अंगावरचे लग्नाचे कपडे चिखलाने बरबटले होते आणि त्याच्या तोंडाला दारूची घाणही मारत होती. तो नशेत बरळू लागला, “अरे अस्मिता, तु झोपली नाहीस अजुन? अरे हो, आज आपल्या लग्नाची पहिली रात्र नाही का? विसरलोच मी! मित्रांनी आज जबरदस्तीने पाजली, नाहीतर मी दारूला हात सुद्धा लावत नाही तुझी शप्पथ” असे म्हणुन तो अस्मिताच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी पुढे सरकला आणि तोल जाऊन धाडकन गादीवर कोसळला. अस्मिता त्याला सावरायला गेली तसे त्याने तिला आपल्या जवळ खेचले आणि जबरदस्तीने तिचा उपभोग घेतला. तिच्याकडे पाहात तो छद्मी हसला आणि तिला वेदनेने तडफडत ठेऊन पुढच्याच क्षणाला झोपी गेला सुद्धा. त्या रानटी प्रकाराने अस्मिताला एखाद्या जंगली श्वापदाने आपल्यावर पाशवी बलात्कार केल्यासारखे वाटले. आजच्या रात्रीची तिने किती सुंदर स्वप्ने रंगवली होती पण वास्तव मात्र एवढे बीभत्स, ओंगळ आणि यातनामय होईल याची तिला कल्पनाच नव्हती. वामनरावांचा एक एक शब्द तिच्या कानात घुमु लागला. (“आपल्या आयुष्याशी नको खेळुस पोरी! ह्या अशा माणसाबरोबर तु संसाराची स्वप्न पाहात आहेस? काय सुख देणार तुला तो?ऽऽऽ) तिचे डोळे भरले पण ती सांगणार तरी कोणाला? तिने स्वत:हुन हे सगळे निवडले आणि स्वीकारलेही होते. आता तिला ते निभवावेच लागणार होते. ज्या आनंदला तिने “मी त्याला सुधारेन, जवाबदार बनवेन” असे वडिलांना ठणकावून सांगितले होते त्यानेच तिच्या इच्छा, आकांक्षा, तिचे स्त्रीत्व, तिची अस्मिता आणि तिचे प्रेमही निर्दयपणे पायदळी तुडवले होते. ती त्याच्यालेखी पैसे मिळवण्याचे एक साधन आणि केवळ एक भोग्य वस्तु होती. एवढे सगळे होऊनही ती त्याचा द्वेष करत नव्हती. वशीकरणाची जादुच काही और होती. आपल्या मनाची आणि अब्रुची लक्तरे गोळा करून ती त्याच्या बाजुला जमीनीवरच बसुन राहिली. विचारांच्या गर्दीत रात्री उशिरा तीला झोप लागली तशी ती जमीनीवरच झोपी गेली.