सप्तपदी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ ऑगस्ट २०१६

सप्तपदी - मराठी कथा | Saptapadi - Marathi Katha - Page 6

अस्मिताने आनंदचा ध्यास काही सोडला नाही. तिला घरातील सर्व मोठ्या माणसांनी, काका व आत्यांनी समजावुन झाले. वामनरावांनी साम, दाम, दंड, भेद इ. सर्व वापरून पाहिले. तिचे मन बदलावे म्हणुन ज्योतिषी, मांत्रिक, तांत्रिक, देव-धर्म, पुजा-अर्चा या सगळ्यावर जवळपास पाच लाख रुपये खर्च केले पण अस्मितावरील वशीकरण एवढे जालीम होते की कशाचाही उपयोग झाला नाही. वामनराव एवढे हताश झाले की त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटकाही येऊन गेला पण अस्मितावर त्याचा तिळमात्रही परिणाम झाला नाही. ज्योतिषानेही सांगीतले की अस्मिता कोणाचेही ऐकणार नाही. ती हे लग्न करणारच. लग्नानंतर मात्र दोघांचे अजीबात पटणार नाही. तिच्या आयुष्यात कोणी तरी दुसरा आल्यावर ती आनंदपासुन वेगळी होईल आणि नंतर तिच्या आयुष्यात सुख येईल. तोपर्यंत मात्र तिला खुप दु:ख आणि हाल अपेष्टा सहन कराव्या लागतील. त्याने पुढे सांगीतले की, “तुमचा हा जावई तुम्हालाही खुप त्रास देईल आणि तुम्हाला आर्थिक नुकसान पण घडवील तेव्हा सावध रहा.” हे सर्व ऐकल्यावर वामनरावांनी एक निर्णय घेतला आणि तो सांगण्यासाठी आपल्या बहीणी आणि भावाला बोलावले. सर्वांसमक्ष त्यांनी अस्मिताला शेवटचे विचारले, “अस्मिता ज्योतिषांनी काय सांगीतले ते तु ऐकलेस. या लग्नामुळे तुला आणि आपल्या कुटुंबाला फक्त दु:ख, त्रास, अपमान आणि हाल सोसावे लागणार आहेत तेव्हा तु आनंदचा विचार सोडणार आहेस की नाही हे सगळ्यांसमोर शेवटचे सांग.”

अस्मिताने ठामपणे आनंदशीच लग्न करणार असल्याचे सांगताच मात्र वामनरावांचा नाईलाज झाला. त्यांनी अस्मिताला ठणकावुन सांगीतले की जर का हा तिचा शेवटचा निर्णय असेल, तर ना ते तिचे लग्न आनंदसोबत लावुन देतील ना त्यांच्या लग्नाला येतील. तिच्या लग्नानंतर तिचा कुलकर्णी परिवाराशी काडीचाही संबंध उरणार नाही. इस्टेटीतही तिचा वाटा असणार नाही. आणि एकदा का घर सोडले की घराचे दरवाजे तिला कायमचे बंद होतील. वामनराव ही वाक्ये इतक्या करारीपणे बोलले की मनात असुनही कोणीच अस्मिताची बाजु घेऊ शकले नाही. अस्मिताच्या डोळ्यातुन अश्रु ओघळु लागले. एरव्ही अस्मिताला जरा काही झाले तर हवालदिल होणारे वामनराव; अस्मिताच्या ऊत्तराने एवढे कठोर झाले की आज तिचे अश्रु देखील त्यांचे हृदयपरिवर्तन करू शकले नाहीत. शेवटी परीक्षा झाल्यावर अस्मिताने आनंदसोबत पळुन जाऊन एका देवळात लग्न केलेच. वामनरावांना ही बातमी कळताच स्वतःवर विज कोसळल्यासारखे वाटले. कधी तरी अस्मिताचे मन बदलेल ही त्यांची वेडी आशा त्या बातमीने साफ धुळीला मिळाली होती. त्यांना अतीव दुःख झाले. मोठ्या कष्टाने त्यांनी स्वतःला सावरले. ईश्वरी इच्छा भली असे म्हणुन त्यांनी स्वतःला कामात बुडवून घेतले जेणेंकरुन त्यांना अस्मितांचा विसर पडेल. दिवस कामात निघुन जात असे पण रात्र मात्र त्यांना बेचैन करत असे. अस्मिताचे विचार त्याची पाठ काही सोडत नसत. आपली मुलगी “बाबा मला वाचवा” असे ओरडत आपल्याकडे मदतीची याचना करत असल्याची त्यांना स्वप्न पडत असत. ते झोपेत अस्मिता!ऽऽऽ असे ओरडत आणि दचकुन जागे होत असत. त्यांच्या सारखीच अवस्था त्यांच्या पत्नीची झाली होती. पण त्या घामाघुम झालेल्या वामनरावांना धीर देत असत.

“आई वडिल स्वतःच्या इच्छा मारून आपल्या मुलांच्या हौशी पुरवतात. आपली मुलंच त्यांचं सर्वस्व असतं, पण पुढे जोडीदार मिळाल्यावर तिच मुलं आपल्या आईवडिलांना विसरतात हे फार दुर्दैवी आहे. आपल्या आईवडिलांना दुःखाच्या खाईत लोटणारी अस्मिता स्वतः तरी सुखी होते का? ते आता पुढे वाचा.”