सप्तपदी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ ऑगस्ट २०१६

सप्तपदी - मराठी कथा | Saptapadi - Marathi Katha - Page 5

दरवाजावरील टकटक ऐकुन अस्मिता सावध झाली. दार ढकलुन आत येणाऱ्या वामनरावांना पाहुन तिने तोंड फिरवले. वामनरावांना वाईट वाटले पण शेवटी ती त्यांची मुलगी होती. मन घट्ट करून ते तिच्यापाशी आले. “अस्मिता! बाळा, मी काय संगतोय ते शांतपणे ऐकुन घे मग तुझा निर्णय तुच घे.” असे म्हणत वामनरावांनी बोलायला सुरवात केली. “मुळात हे तुझं लग्नाचं वय नाही, आणि कॉमर्सचे हे शेवटचं वर्ष आहे पुढे तुला सी.ए. देखील व्हायचय ना? तु आधी तुझं शिक्षण पुर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहा मग पुढचा विचार कर. एकदा का संसारात पडलीस की मग शिक्षणाला वेळ देणे शक्य होतेच असे नाही. तु जो मुलगा पाहिला आहेस त्याची मी सगळी माहिती काढली आहे. तो तुझ्या दुप्पट वयाचा आहे. शिक्षण नाही, नोकरी करून दोन हजार कमवतो, तिही धड करत नाही. तुझा तर आठवड्याचा पॉकेट मनीच पाच हजार आहे. दुकानात चोरी करताना किती तरी वेळा पकडला गेलाय. मालकाने त्याच्या बापाकडे आणि घरच्या गरीबीकडे पाहुन त्याला काढला नाही आणि पैसे पगारातुन कापुन घेतले. सर्व व्यसनं करतो, जुगार खेळतो. मारामाऱ्या करतो. घरात सतत भांडणे आणि शिवीगाळ करतो. ह्या अशा माणसाबरोबर तु संसाराची स्वप्न पाहात आहेस? काय सुख देणार तुला तो? अगं माझा, आपल्या घराण्याच्या इज्जतीचा, नातेवाईक आणि लोकांचाही सोड पण स्वतःच्या भविष्याचा, निदान स्वतःच्या फायद्याचा तरी विचार कर गं! उद्या तु सी.ए. होशील चार मोठ्या माणसात तुझी उठबस होईल तेव्हा तुला आज जो तुझं सर्वस्व वाटतोय ना, त्याचीच लाज वाटेल. जरा थंड डोक्याने विचार केलास तर तुझे तुलाच पटेल. आपल्या आयुष्याशी नको खेळुस पोरी!” एवढे बोलुन सद्गादित झालेले वामनराव अस्मिताच्या रूममधुन जाण्यास उठले.

“मला सगळे पटतय बाबा, मी असे वागायला नको होते, कसा कुणास ठाऊक पण माझा माझ्यावर ताबाच उरला नव्हता. मला कळतंय की प्रेमाच्या धुंदीत मी माझी मर्यादा ओलांडली आहे, पण आता मी त्याला सोडु शकत नाही. मला माझीच शरम वाटते की मी कशी इतकी बहकु शकते! माझ्या चुकीची शिक्षा मला भोगावीच लागेल. मला माफ करा बाबा. पण मी आता खरंच मागे फिरू शकत नाही.” असे म्हणत अस्मिता धाय मोकलुन रडु लागली. अस्मिता आपल्या जाळ्यात अडकल्यावर पुन्हा सुटु नये म्हणुन आनंदने आधीच सगळी फिल्डिंग लावली होती. वशिकरणाचा प्रयोग करून करून तिला आपल्या जाळ्यात ओढली आणि नंतर तिला खाण्यातुन मानवी हाडांची मंतरलेली भुकटी खाऊ घातली होती जेणेकरुन तिला कोणी कितीही समजवायचा प्रयत्न केला तरी ती त्याला बधणार नाही. खबरदारी म्हणुन त्याने तिच्याकडुन लग्नाचे वचन घेतले होते आणि ते मोडल्यास तिच्या घरच्यांना त्रास देण्याची धमकी दिली होती. वामनरावांना अस्मिताच्या या निर्लज्ज स्पष्टीकरणाने प्रचंड संताप आला पण त्यांनी स्वतःला सावरले. अस्मिताला प्रेमाने जवळ घेत वामनराव समजावु लागले की जे झाले ते झाले. अजुनही वेळ गेलेली नाही. सगळे काही व्यवस्थित होईल. तेव्हा अस्मिता त्यांना म्हणाली, “आनंदच्या ओळखी गुंडांशी तसेच अघोरी तंत्रिकांशी असल्यामुळे आपल्या घरच्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. मी जर लग्नाला नकार दिला तर तो तुम्हाला नक्कीच काही दगा फटका करेल. माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि मलाही तो हवाय. त्याच्यातील सगळ्या चांगल्या वाईटासह मी त्याला स्विकारले आहे. माझी खात्री आहे की माझ्या प्रेमाने मी त्याला बदलेन. पुढे मी आणि माझे नशीब”, एवढे बोलुन अस्मिता शांतपणे तिच्या रूमच्या बाहेर निघुन गेली. वामनराव तिचे बोलणे ऐकुन आवाकच झाले. अस्मिताच्या पाठोपाठ बंद झालेल्या दरवाज्याकडे पाहात ते दूर कुठेतरी शुन्यात हरवले.