सप्तपदी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ ऑगस्ट २०१६

सप्तपदी - मराठी कथा | Saptapadi - Marathi Katha - Page 4

आता अस्मिताची आनंदशी सतत गाठभेट होऊ लागली. गप्पा होऊ लागल्या. आनंदही तिला दुकानातली महागडी चॉकलेट्स, गिफ्ट आर्टिकल्स चोरून देऊ लागला. जादा क्लासच्या नावावर ती रोज संध्याकाळी त्याला भेटायला जाऊ लागली. आनंदची तिला अशी काही भुरळ पडली की तो आपल्या पेक्षा जवळपास दुप्पट वयाचा आहे, त्याच्याकडे धड नोकरी नाही की शिक्षण नाही, आपल्या आणि त्याच्या राहाणीमानात जमीन आसमानाचे अंतर आहे, आपले वडिल या लग्नाला मान्यता देतील की नाही या सर्व गोष्टी तिच्या खिजगणतीतही नव्हत्या. ती फक्त त्याचा हात धरून प्रेमाच्या लाटांवर झुलत होती. आता ती राजरोसपणे आनंदसोबत समुद्रावर, लव्हर्स पॉईंटवर, बाजारातुन ऍक्टिवा वरून फिरताना दिसू लागली, पिक्चर पाहायला जाऊ लागली. दोघांचे एकत्र काढलेले फोटो फेसबुकवर अपलोड करू लागली. छोट्या शहरात ही बातमी लपुन राहीली असती तर नवलच म्हणायचे. शेवटी काही दिवसांनी अस्मिताचे कोणातरी मोठ्या वयाच्या माणसाबरोबर अफेयर सुरु असल्याचे तिच्या वडिलांच्या म्हणजेच वामनराव कुलकर्णींच्या कानावर पडलेच. वामनरावांचा आपल्या तसेच आपल्या भावंडांच्याही मुलांवर खुप जीव होता. सर्वांचे हट्ट ते खुप प्रेमाने पुरवत त्यामुळे सर्व मुलांचे ते लाडके होते. पण वामनराव जितके प्रेमळ होते तितकेच तापट म्हणुन पण प्रसिद्ध होते. ते भडकले की कोणी त्यांच्या वाऱ्यालाही उभे राहात नसे.

अस्मिता मान खाली घालुन वामनरावांच्या समोर उभी होती. सुरवातीला वामनरावांना थोडे सबुरीने घेण्याचा सल्ला त्यांचा मोठ्या भावाने केशवरावांनी दिला असल्यामुळे वामनरावांनी आवाज शक्य तेवढा शांत ठेवत अस्मिताशी बोलायला सुरवात केली. अस्मिताला प्रेमाने विचारुनही ती काहीच उत्तर देत नाही हे पाहुन मात्र वामनरावांचा संयम संपला. काही कळायच्या आतच अस्मिताच्या गालावर वामनरावांची पाचही बोटे उमटली होती. अस्मिता कोलमडून खाली पडताच सर्व मुलं आत पळाली. वामनरावांच्या पत्नी, नानी पुढे झाल्या आणि त्यांनी अस्मिताला सावरले पण तिने त्यांना झिडकारले आणि वामनरावांकडे ती रागाने पाहु लागली. ते पाहाताच वामनरावांचा राग अनावर झाला आणि ते अस्मिताच्या अंगावर धाऊन जाताच केशवरावांनी त्यांना अडवले. तरुण मुलगी आहे, हात नको उचलुस, रागाच्या भरात काही बरे-वाईट करून घेतले तर काय करशील? शांत हो, म्हणत केशवराव वामनरावांना ओढतच घराबाहेर घेऊन गेले. इकडे अस्मिता धुसफुसत लाल झालेला गाल चोळत आपल्या रूममध्ये गेली आणि धाडकन दरवाजा लावून घेतला. विरोधाची पहिली ठिणगी पडली होती. आजवर जिने कधी साधी नजर वर करूनही पाहिले नव्हते ती आपली लाडकी मुलगी आज आपल्या नजरेला नजर देते आणि कोणा परक्या माणसासाठी आपला द्वेषही करते हे पाहुन त्या बापाचे काळीज तीळ-तीळ तुटले. आजवर पुरवलेले सर्व हट्ट, केलेली माया, दिलेले प्रेम सर्व एका क्षणात मातीमोल व्हावे हे त्यांच्या खुप जिव्हारी लागले होते. आज पहिल्यांदाच त्यांनी अस्मितावर हात उचलला होता पण तिने तर हात न उचलता त्यांनाच एक जोराची चपराक लगावली होती, आणि ती थेट त्यांच्या मनावर आघात करून गेली होती. दु:ख थोडे हलके झाल्यावर त्यांनी आनंदची सगळी माहिती काढली. वस्तुस्थिती समोर येताच त्यांनी कपाळावर हातच मारून घेतला. आनंदचा डाव लक्षात न यायला ते काही मुर्ख नव्हते. त्यांनी वेगळ्या प्रकारे हे प्रकरण हाताळायचे ठरवले.

“ही झाली कुलकर्णी आणि शिवलकर कुटुंबीयांची तोंड ओळख. अस्मिता आनंदच्या जाळ्यात कशी गुरफटत जाते, तिच्या घरी तिचे प्रेमप्रकरण कळल्यावर काय नाट्यमय घडामोडी घडतात हे आपण पहिले. आता वामनराव अस्मिताला पाठिंबा देतात की विरोध करतात? अस्मिता आणि आनंदच्या प्रेमाचे पुढे काय होते हे जाणुन घेण्यासाठी पुढे वाचा.”