सप्तपदी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ ऑगस्ट २०१६

सप्तपदी - मराठी कथा | Saptapadi - Marathi Katha - Page 3

दुसऱ्या दिवशी अस्मिता आनंदचे पैसे परत करायला गेली तेव्हा त्याला तिथे न पाहुन संभ्रमात पडली. मालकाला जाऊन आनंदबद्दल विचारायचे तिला धाडस न झाल्याने थोडा वेळ तिथेच घुटमळुन ती परत जायला निघाली. मागे वळुन-वळुन पाहात शेवटी ती हिरमुसली होऊन निघुन गेली. अस्मिता जाताच गोडावूनमधे माल मोजण्याच्या निमित्ताने लपलेला आनंद बाहेर आला. त्याने अस्मितासमोर यायचे मुद्दामहुन टाळले होते. त्याला तिला बेचैन करायचे होते. तिच्या मनात त्याच्याबद्दल उत्सुकता आणि काळजी निर्माण करायची होती. अस्मिताच्या अस्वस्थतेवरून त्याने जाणले की त्यातही तो यशस्वी झालाय. इकडे घरी परतल्यावरही अस्मिताच्या मनात प्रचंड खळबळ उडाली होती. तो का नाही आला? कुठे गेला असेल? आजारी तर नसेल? त्याला मालकाने आपल्यामुळे रागावले किंवा कामावरून काढुन तर टाकले नसेल? असे एक ना अनेक विचार तिला भांडावुन सोडत होते. तिला उगाचच अपराधी वाटत होते. आपण त्याचा एवढा का विचार करतोय हेच तिला समजेना. कालचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून तरळु लागला तसे नकळत तिच्या चेहऱ्यावर हसु फुलले. तिला स्वतःशीच हसताना पाहुन तिच्या आईने तिला कारण विचारताच, “काही नाही” असे म्हणत ती तिच्या रूममध्ये पळाली. बेडवर पडल्या पडल्या आनंदाला उद्या कसे भेटायचे याचा विचार करता करता तिचा कधी डोळा लागला हे तिला कळलेच नाही.

दुसऱ्या दिवशी कॉलेज मधली लेक्चर्स आटपल्यावर अस्मिता मैत्रिणींना टाळून आनंदला भेटण्यासाठी आपल्या ऍक्टिवावरुन निघाली. दुपारची वेळ असल्याने दुकानाची शटर्स बंद करून मालक जेवायला घरी गेले होते. आनंद जवळच्याच एका झाडाखाली आराम करत बसला होता. त्याला पाहुन अस्मिताला आनंद झाला. ती त्याच्याकडे जात म्हणाली, काल कुठे होतात तुम्ही? मी तुमची किती वाट पाहिली माहीत आहे? त्याने तिच्याकडे मान वर करून पाहिले तशी ती चक्क लाजली. काय बोलावे ते न सुचल्यामुळे तिने पटकन पाचशे रुपये काढुन त्याच्या पुढे धरले व म्हणाली, “हे घ्या तुमचे पैसे. काल तुम्ही वेळेवर पैसे दिले नसतेत तर माझी पुरती फजितीच झाली असती. थँक्स हं!” ते घ्यायला त्याने हात पुढे केला खरा पण नोटेबरोबर अस्मिताचा देखील हात धरला. आधी अस्मिता घाबरली, इकडे तिकडे पाहु लागली. पण तिची नजर त्याच्या नजरेला भिडली आणि त्याच्या डोळ्यातील आश्वासक भाव पाहुन तिच्या नजरेतील भीती जाऊन गालावर लाली पसरली. “आम्ही तुला कॉलेजमध्ये शोधतोय आणि तु इथे आहेस होय! अरेच्या! इथे तर काही भलतेच सुरु आहे”, मैत्रिणींच्या आवाजाने अस्मिता दचकलीच. तिने पटकन आनंदच्या हातातून आपला हात सोडवून घेतला आणि सावरण्यासाठी म्हणाली, “अगं त्यांचे पैसे द्यायला आले होते.” हो का? म्हणत तिच्या मैत्रिणी खो खो हसत सुटल्या. अस्मिताला लाजेने मेल्याहुन मेल्यासारखे झाले. त्यांच्या गराड्यातुन गडबडीने निघुन तिने आपली ऍक्टिवा घराच्या दिशेने सुसाट सोडली.