सप्तपदी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ ऑगस्ट २०१६

सप्तपदी - मराठी कथा | Saptapadi - Marathi Katha - Page 21

काही जिज्ञासु लोकांनी कसला आवाज येतोय म्हणुन गल्लीत शोध घेतला तर मोबाईलच्या प्रकाशात डोक्याचा पार चेंदामेंदा झालेल्या आनंदचा मृतदेह पाहुन खुनऽऽऽ खुनऽऽऽ असे ओरडत ते रस्त्यावर पळाले. गल्लीत खुन झाल्याची बातमी मिळताच पोलिसांची गाडी तिथे येऊन पोहोचली. “Crime Scene Do not cross” ची पट्टी लावुन पोलिसांनी तो भाग seal केला, व पंचनामा सुरु झाला. त्यांनी जमलेल्या लोकांचा जबाब घ्यायला सुरवात केली. कोणीच खुन्यांना पाहिले नव्हते, फक्त झटापटीचे आवाज ऐकुन काहीजण तिथे गेले होते, तोपर्यंत आनंदचा खुन करून ते गुंड पसार झाले होते. आनंदचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहुन असली दृश्य नेहेमीच पाहायची सवय असलेल्या पोलिसांचाही जीव गलबला कारण त्याचा चेहरा तर ओळखण्याच्या पलीकडे गेला होता, अंगावरील सर्व चीज वस्तुही लुटून नेल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोरचे मोठे आव्हान होते. फोटोग्राफरनी फोटो काढुन झाल्यावर, उत्तर तपासणीसाठी आनंदचा मृतदेह हलवण्यात आला. त्याच्या डोक्याचे तुकडे पोलिसांना अक्षरशः गोळा करावे लागले होते. एका प्लॅस्टिकच्या पिशवीत गोळा करून ते ही मृतदेहाबरोबर पाठवण्यात आले. पुरावा म्हणुन आनंदच्या डोक्यात घातलेला दगडही ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आजुबाजुच्या दुकानात, हॉटेलमध्ये चौकशी सुरु केली पण काहीच थांगपत्ता लागला नाही. चौकशी करत रात्री उशिरा पोलीस त्या बारमध्ये पोहोचले, ज्यातुन भांडण करून आनंद निघाला होता. मोबाईल मधील आनंदच्या मृतदेहाचा फोटो दाखवुन त्यांनी बारच्या काउंटरवर चौकशी केली तेव्हा त्या मृतदेहाच्या कपड्यांवरून तिथल्या एका वेटरने तो मृतदेह आनंदचा असल्याचे ओळखले. हा तोच वेटर होता ज्याला आनंदच्या रागाचा प्रसाद मिळाला होता. त्याने पोलिसांना आनंदची माहिती दिली. बारमधील सी.सी.टी.व्ही फुटेज मध्ये तो आनंदच असल्याचे स्पष्ट झाले.

दुसऱ्या दिवशी आनंद शिवलकर नावाच्या इसमाचा दगडाने ठेचुन निर्घृण खुन अशी बातमी स्थानिक पेपर मध्ये पहिल्या पानावर झळकलेली पाहुन महादेवने वामनरावांना फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतला आणि त्याचवेळी त्याच्या मोबाईलवर वामनरावांचा फोन आला. “तु पेपरमधली बातमी वाचलीस?” वामनरावांनी फोन उचलताच प्रश्न केला? “हो. ती वाचुन तुम्हाला कॉल करणार इतक्यात तुमचाच कॉल आला. बातमी वाचुन मला पण शॉक बसला.” महादेवने उत्तर दिले. “म्हणजे हे तु करवून नाही आणलेस?” वामनरावांच्या स्वरात आश्चर्य ओसंडत होते. “काहीतरीच काय बोलताय काका? मी असे काही करू शकतो, असे तुम्हाला वाटलेच कसे? मला तर वाटले की रागाच्या भरात तुम्हीच फिल्डिंग लावलीत की काय! म्हणुन तर मी तुम्हाला फोन करत होतो.” महादेव, वामनरावांच्या प्रश्नाने दुखावला गेला होता. “अरे काल तु म्हणाला होतास ना? की आनंदचा पुरता बंदोबस्त केला पाहिजे. म्हणुन मला तसे वाटले. पण जर हे मी नाही केले, तुही नाही केलेस मग हे केले कुणी?” वामनरावांचा भाबडा प्रश्न. यावर “कुणी का केले असेना! पण आपला प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला, सुंठी वाचुन खोकला गेला म्हणा ना! तसेही त्या बेवड्याचे किती दुश्मन असतील देव जाणे त्यांच्यापैकीच कोणीतरी केले असेल हे काम. ज्या कोणी हे काम केलय त्याला धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहेत, वकील, कोर्ट वगैरे सगळ्या कटकटी एका झटक्यात दूर झाल्या आणि आपल्या अस्मिताला विनासायास स्वातंत्र्य मिळाले. या आनंदाच्या प्रसंगी पेढे तर मिळालेच पाहिजेत काका!” महादेव आनंदीत होत म्हणाला. (त्याच्याही मार्गातील काटा आपसुक दूर झाला होता, आता अस्मितांचे मन जिंकण्यासाठी तो नव्या दमाने प्रयत्न करू शकत होता. तसेही तो वामनरावांच्या मर्जीत असल्यामुळे त्यांच्याकडून विरोध व्हायची शक्यताही कमीच होती पण त्याने थोडे सबुरीने घ्यायचे ठरवले). “तेही खरेच, पण अस्मिताला हे सांगताना थोडी काळजी घ्यावी लागेल तिला कदाचित धक्का बसेल. भलेही त्याने वशीकरणाचा वापर केला होता पण तिचे त्याच्यावर प्रेम बसले होते. वामनरावांच्या स्वरात अस्मिताची काळजी डोकावत होती. वामनराव महादेवशी फोन वर बोलत असतानाच अस्मिताची दुःखाने भरलेली किंचाळी त्यांच्या कानावर आदळली. ज्याची भीती होती तेच झाले. अस्मिताने पेपर मधील बातमी वाचली होती. वामनराव आणि त्यांच्या पत्नी अस्मिताच्या रूमकडे धावले.