सप्तपदी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ ऑगस्ट २०१६

सप्तपदी - मराठी कथा | Saptapadi - Marathi Katha - Page 20

इकडे आनंदची झोप उघडल्यावर, अस्मिताला तिचे वडिल सोबत घेऊन गेल्याचे कळताच तो प्रचंड भडकला. आपल्या घरच्यांना तो शिव्या घालु लागला. “तुम्हाला काही अक्कल आहे का? तिला तुम्ही त्या थेरड्या बरोबर जाऊच का दिलेत? आता त्याने तिला कुठे दूर पाठवुन दिले किंवा घरात डांबून ठेवले तर आपण काय करणार आहोत? सोन्याचे अंडे देणारी कोंबडी अशी सोडुन देताना तुमच्या अकलेचे काय दिवाळे वाजले होते? ते काही नाही. आत्ताच्या आत्ता जातो आणि अस्मिताला परत घेऊन येतो. माझा आवाज ऐकताच ती स्वतःला अडवु शकणार नाही आणि काहीही करून माझ्याकडे येईलच. मी बाहेर पडुन गेल्यावर समजा ती परत आली तर तिला प्रेमाने वागवा आता मारझोड करण्यापेक्षा गोड बोलुन काम लवकर होईल” असे बोलुन आनंद घरातुन बाहेर पडला. निघताना त्याने सोबत अजुन दहा हजार खिशात कोंबले आणि त्याची पाऊले बारकडे वळली. बारमध्ये जाऊन त्याने भरपुर दारू ढोसली. वामनरावांवरचा राग त्याने तिथल्या वेटरवर काढला. त्याच्या थोबाडात ठेऊन दिली. वर आपल्या खिशातील पैशांची गड्डी काढून तुला या क्षणाला विकत घेईन इतका पैसा आहे माझ्याकडे, तु दिड दमडीचा वेटर मला अक्कल शिकवतोस काय रे? म्हणुन वर एका अस्खलित शिवी पण हासडली. त्या बार मध्ये काही गुंड पण बसले होते त्यांनी आनंदच्या हातातील नोटांचे बंडल पाहुन एक प्लॅन केला आणि आनंद बारच्या बाहेर पडण्याची वाट पाहु लागले. आनंदला दारू खुप जास्त झाली होती त्याला धड उभेही राहता येत नव्हते. त्याच्या झेपा जात होत्या. शेवटी आनंद धडपडत कसाबसा बारच्या बाहेर पडला. तोंडाने तो सतत बरळत चालला होता, “साला, तो वेटर मला अक्कल शिकवतो! मी कोण आहे माहीत नाही त्याला. त्याच्या अख्या खानदानाला विकत घेईन मी” काही अंतर ठेऊन ते गुंड त्याचा पाठलाग करत होते हे त्याच्या ध्यानीही नव्हते, तो आपल्याच धुंदीत चालला होता. वाटेत एका अंधाऱ्या गल्लीजवळ त्या गुंडानी त्याला गाठले.

रस्त्यावरील वर्दळ कमी झाली होती आणि गल्ली सुनसान होती. पोरांनी दगड मारुन ट्युब फोडल्यामुळे दिव्याखाली अंधार होता. आनंदला धक्का बुक्की करत ते त्या गल्लीत घेऊन गेले. ते त्याचे पैसे हिसकावण्याचा प्रयत्न करू लागले तसे आनंदने प्रतिकार करायचा सुरवात केली. दारू प्यायला असला तरी तो त्याच्या मजबुत तब्येतीमुळे आणि मारामारीच्या सवयीमुळे तो त्यांना चांगलाच प्रतिकार करत होता. इतक्या सहजपणे तो पैसे देणार नाही हे लक्षात आल्यावर त्यातल्या एकाने खिशातुन रामपुरी काढला आणि आनंदच्या गळयावर ठेवला. बऱ्या बोलाने आम्हाला पैसे दे नाही तर तुला आता ढगातच पाठवतो असे तो म्हणताच, आनंदने त्याच्या पोटात एक लाथ मारली. तो गुंड सटपटून खाली पडला.रागाने बेभान झालेल्या त्याने आनंदच्या छातीत तो रामपुरी चाकु खुपसला, बरगड्यांच्या आरपार होत तो चाकु त्याच्या फुफ्फुसात शिरला. आनंदच्या छातीत वेदनेचा डोंब उसळला. फुफ्फुसात छेद झाल्यामुळे त्याला श्वास घेताना अडचण होऊ लागली होती. तरीही त्याने पुन्हा एका लाथ त्या गुंडाच्या पेकाटात घातली त्या सरशी तो गुंड सहा सात फुट लांब जाऊन पडला. ते पाहताच इतर गुंडानी आनंदला गच्च जखडुन ठेवले. आनंद ओरडत होता, “मला सोडा नाहीतर तुमच्या पैकी एकालाही मी जीवंत सोडणार नाही” पण त्या गुंडानी त्याला चांगलाच दाबुन ठेवला होता. रागाने धुमसत असलेल्या त्या गुंडाने यावेळी रामपुरी थेट आनंदच्या गळ्यातच घुसवला. मुख्य रक्तवाहिनी कापली गेल्यामुळे आनंदच्या गळ्यातुन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. तसे त्या गुंडानी त्याच्या कडील पैसे हिसकावून घेतले आणि त्याला जमिनीवर ढकलुन दिले. ते तिथुन जाऊ लागले पण त्याही परिस्थितीत आनंदने एका हाताने आपला गळा धरला आणि दुसऱ्या हाताने एका गुंडाचा पाय धरून ठेवला. ते पाहिल्यावर त्या गुंडानी आनंदला लाथा मारत आपल्या साथीदाराला सोडवायचा प्रयत्न केला. तरीही आनंदने त्या गुंडाचा पाय सोडला नाही. एव्हाना लोकांचे लक्ष त्या झटापटीच्या आवाजाकडे वेधले जाऊ लागले होते. ते पाहुन त्यातील एका गुंडाने बाजुलाच पडलेला एका मोठा दगड उचलुन आनंदच्या डोक्यात घातला आणि आनंदचा खेळ संपला. आनंदचा प्रतिकार थांबताच ते गुंड त्यांच्याकडचे पैसे घेऊन अंधारात गायब झाले.

“अरेच्चा! हे तर अजबच घडले. ज्या आनंदपासुन अस्मिताची सुटका करण्यासाठी वामनराव आणि महादेव जीवाचा आटापिटा करत होते तो तर गुंडांकडुन कुत्र्याच्या मौतीने मारला गेला. हे तर असेच झाले की साप भी मर गया और लाठी भी नही टूटी. की आनंदच्या खुनामागे या दोघांपैकीच कुणी होते? पुढे वाचा.