सप्तपदी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ ऑगस्ट २०१६

सप्तपदी - मराठी कथा | Saptapadi - Marathi Katha - Page 2

वाटेत अस्मिताच्या मैत्रिणी तिला चिडवु लागल्या, “आत्ता काय बाबा! अस्मिताला पैसे जवळ बाळगायची गरज नाही! हे घे पैसे, मी तुला नेहमी पाहतो! हा हा हा हा!” आपल्या खिदळणाऱ्या मैत्रिणींना अस्मिता लटक्या रागाने दटावत होती पण त्यांच्या चिडवण्याने अस्मिताला मनातल्या मनात मात्र गुदगुदल्या होत होत्या. तिच्या चेहऱ्यावर लज्जामिश्रित हसु उमटत होते. अल्लड वयाच्या त्या मुलींच्या हे गावीही नव्हतं की नकळत त्या अस्मिताला एका धोकादायक रस्त्यावर चालायला प्रोत्साहीत करत होत्या की ज्यावरून परतणे अस्मितासाठी केवळ अशक्य होणार होते. आनंदने वेळेवर मदत करून मैत्रिणींमध्ये अस्मिताचे हसे होण्यापासुन वाचवले होते. तिला तो आवडला होता. त्याच्या नजरेतले तिच्यासाठी असलेले आकर्षणही तिला जाणवले होते. कधी कोणाच्या अध्यात ना मध्यात असलेली अस्मिता अचानक एका एकोणचाळीस वर्षाच्या पुरुषाकडे आकृष्ट झाली होती. दुर्दैवाने तिला त्यापासुन परावृत्त करण्याऐवजी मैत्रिणींनी तिच्या मनात रुजणाऱ्या नाजुक भावनांना नकळत खत-पाणीच घातले होते. एकोणचाळीस वर्षाचा आनंद तिशीतील दिसायचा. व्यक्तिमत्व उमदे होते. कष्टाची कामे करून कमावलेले पिळदार शरीर त्याच्या देखणेपणात भरच टाकत होते. लाघवी बोलण्यामुळे तो लोकांना आपलेसे करून घ्यायचा व आपले काम साधायचा. त्याच्या वागण्या बोलण्याला अस्मिता भाळली नसती तर नवलंच म्हणायचे.

आनंद एकोणचाळीस वर्षांचा होता अडचण नव्हती नव्हती तर तो कुठल्याच बाजुने अस्मिताच्या लायक नव्हता. तो पुर्णपणे वाया गेला होता. विडी, दारु, जुगार यांचे त्याला असलेले व्यसन, त्यातुन होणाऱ्या हाणामाऱ्या त्याच्यासाठी रोजच्याच होत्या. दरवर्षी पहिल्या पाचात नंबर काढणारी अस्मिता, कॉमर्सच्या शेवटच्या वर्षाला होती तर आनंद आठवी नापास होता. अस्मिताच्या वडिलांचा स्वकष्टावर उभा केलेला दुधाचा मोठा व्यवसाय होता. पुऱ्या जिल्ह्याचे ते दुध वितरक होते. स्वतःचे मोठे घर आणि चार फ्लॅट होते, दुधासाठी घेतलेले दहा कंटेनर असलेले ट्रक होते. दारात दिमतीला महागड्या गाड्या होत्या. घरची परिस्थिती चांगली सधन होती. याउलट आनंदच्या घरी अठराविश्वे दारिद्र्य होते पण त्यातुन उभरण्याची ना त्याच्यात धमक होती ना इच्छा. घरात अर्धांगवात झालेले वडिल अंथरुणाला खिळुन होते. मोठा भाऊ आकाश कुठेतरी रोजंदारी करायचा आणि त्याची बायको सुमन आपल्या सासुसोबत इतरांकडे धुणी भांडी करायची. त्यामुळे एखादी श्रीमंत घरची पोरगी पटवुन तिच्याशी लग्न करून तिच्या वडिलांची सगळी ईस्टेट घशात घालायचे त्याचे मनसुबे होते. अस्मिता त्या हॉटेलमध्ये मैत्रिणींसोबत येत असते आणि नेहमी चार पाचशेचे बील तीच देते हेही त्याने पाहिले होते. त्याने अंदाज बांधला की नेहमी इतके पैसे खर्च करते म्हणजे ही नक्कीच श्रीमंत घरातील असणार. नेमके त्या दिवशी अस्मिता पैसे आणायला विसरली आणि हे त्याच्या पथ्थ्यावरच पडले होते आणि त्याने या संधीचा त्याने पुरेपुर फायदा उचलला. अस्मिताची मदत करून त्याने आपल्या योजनेची पहिली चाल यशस्वीरित्या खेळली होती.

सामान वयाच्या मुला मुलींमध्ये प्रेम जुळणे समजते पण अस्मितासारख्या नाकासमोर चालणाऱ्या मुलीचे केवळ वेळेवर मदत केल्यामुळे एका वयस्क पुरुषाच्या प्रेमात पडणे नक्कीच खटकते. नक्की कशामुळे असे घडले, अस्मिताच्या घरी हे कळल्यावर त्याचा काय परिणाम होतो? अस्मिता आनंदला विसरते की वडिलांशी बंड करते जाणण्यासाठी पुढे वाचा.