सप्तपदी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ ऑगस्ट २०१६

सप्तपदी - मराठी कथा | Saptapadi - Marathi Katha - Page 19

अस्मिताला वामनराव घेऊन गेल्याला आता दोन तास होत आले होते, त्यामुळे आनंदच्या आईचा जीव वर खाली होत होता. झक मारली आणि तुझे ऐकले, आता आनंद उठला की तुच त्याला काय ते उत्तर दे, ती आकाशला शिव्या घालु लागली. तिच्या तोंडाचा पट्टा अविरत सुरूच होता. इकडे वामनरावांनी अस्मिताला आनंदच्या घरी सोडण्याची तयारी करा असे आपल्या पत्नीस सांगताच अस्मिताला रडूच कोसळले, “मी नाही जाणार त्या नरकात, मला इथेच राहायचे आहे. मी आता अजुन मार नाही खाऊ शकत, बाबा प्लिज मला नका ना पाठवु” असे म्हणुन अस्मिता जास्तच रडू लागली. तेव्हा महादेव तिला म्हणाला, “आनंद तुला आता हातही लावणार नाही, तु काही काळजी करू नकोस फक्त थोडे दिवस कळ काढ. काका आणि मी उद्याच चांगला वकील गाठतो आणि कायदेशीररित्या तुला आनंदपासुन मुक्त कसे करता येईल ते पाहतो तोपर्यंत तुला तुझ्या सासरीच राहावे लागेल.” पण अस्मिता ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती, “आता त्या घरात केवळ माझे प्रेतच जाईल, जीवंतपणी मी तिथे जाणार नाही. तुम्ही माझ्यावर जबरदस्ती कराल तर मी जीव देईन” असे म्हणुन तिने आपल्या बेडरूममध्ये जाऊन आतुन कडी लावुन घेतली.

यावर वामनराव महादेवला म्हणाले, “महादेवा! अस्मिता म्हणते ते बरोबर आहे तिला परत त्या नरकात पाठवायची काहीच गरज नाही. ज्या वशीकरणातुन ती मुक्त होणे गरजेचे होते, ते मोठे काम तर पार पडले. आता त्या आनंदपासुन वेगळे करण्यासाठी तिला त्याच्याकडे ठेवायची गरज नाही आपण त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवु शकतो. “ते बरोबर आहे काका, पण पुन्हा तो तिच्यावर वशीकरण करणार नाही कशावरून. तो काय एकमेव तांत्रिक आहे का? त्यामुळे आनंदचा पुरता बंदोबस्त केल्याशिवाय अस्मिता कधीच मोकळेपणाने श्वास घेऊ शकेल असे मला वाटत नाही.” महादेवने आपली शंका मांडली. “तुझेही म्हणणे बरोबरच आहे म्हणा, आपण आनंदचा पुरता बंदोबस्त करणे जरुरीचे आहेच पण आपण त्या आनंदची अस्मितेशी भेटच होऊ दिली नाही तर पुन्हा वशीकरण कसा करू शकेल? पुन्हा तिला तिकडे पाठवायचा विचारही आता मला सहन होत नाही.” वामनराव म्हणाले. “हो. पण असे किती दिवस तिला तुम्ही कैद करून ठेवणार आहात? तिचा मोकळेपणाने जगायचा अधिकार तुम्ही तिच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तिला त्याच्यापासुन दूर केल्याने भडकुन त्याने अजुन काही अघोरी प्रकार केला तर? आपल्याला त्याला बेसावध ठेऊनच हे काम करावे लागेल आणि त्यासाठी अस्मिताचे त्याच्याकडे जाणे नितांत गरजेचे आहे. मलाही तिची काळजी आहे, म्हणुन तर इतके सगळे केले ना? माझ्यावर विश्वास ठेवा मी योग्य तेच सांगतोय”, असे म्हणुन महादेवने वामनरावांना समजावले. ते पण यासाठी तयार झाले “पण आज माझी पोरगी कुठेही जाणार नाही, उद्या बघु काय करायचे ते” असे म्हणुन वामनरावांनी तो विषय तिथेच बंद केला.