सप्तपदी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ ऑगस्ट २०१६

सप्तपदी - मराठी कथा | Saptapadi - Marathi Katha - Page 18

क्षणभर तिला सुधरेना की ती कुठे आहे पण समोर आपल्या वडिलांना पाहुन तिच्या डोळ्यासमोरून सर्व घटना एखाद्या चित्रपटासारख्या तरळुन गेल्या आणि तिला खुप अपराधी वाटले. तिचे डोळे भरले. मला माफ करा बाबा म्हणत ती वामनरावांना बिलगली. वामनरावांची खात्री पटली की अस्मितावरचे वशीकरण तुटले होते. त्यांनी मनोमन त्या तांत्रिकाला धन्यवाद दिले आणि तिला हृदयाशी घट्ट धरले. गदगदलेल्या स्वरात ते म्हणाले, “जे झाले त्यात तुझा काहीच दोष नव्हता बाळा, या सर्वातुन तु सुखरूप बाहेर पडलीस हेच माझ्यासाठी मोलाचे आहे.” नंतर त्यांनी आनंदने त्यांच्या पैशासाठी तिच्यावर वशीकरण करून तिला त्याच्याशी लग्न करायला कसे भाग पडले, महादेवने सी. ए. च्या ऑफिस मध्ये तिला पाहिल्यावर आनंदकडुन सगळे खरे कसे काढून घेतले, नंतर त्याने तांत्रिकाकडे जाऊन तिच्यावरील वशीकरण दूर करण्यासाठी उपाय सुचविण्यास त्याला कसे प्रेरित केले आणि आपल्या अक्कल हुशारीने त्याने तो उपाय कसा यशस्वी केला हे सगळे समजावुन सांगितले. “आज तु आमच्या समोर जीवंत दिसतेस ना ती केवळ त्याच्या प्रयत्नांमुळेच.” ते सर्व ऐकताच अस्मिताने महादेवकडे पाहिले व नजरेने कृतज्ञता व्यक्त करत thanks म्हणाली. त्याने देखील तिला नजरेनेच आश्वस्त केले व welcome back म्हटले. दोघांनी एकमेकांकडे पाहत छान स्मितहास्य केले. आपल्या लेकीला असे हसताना पाहुन वामनरावांचा जीव सुखावला त्याचवेळी आपण आपल्या लेकीच्या वागण्यामागचे कारण समजुन न घेता तिला दोष दिला, तिची मदत करायचे सोडुन तिला त्या नराधमाच्या हवाली करून स्वस्थ बसलो याचा त्यांना प्रचंड पश्चात्ताप झाला. दुःखावेगाने ते लहान मुलासारखे रडू लागले. ते पाहुन महादेव आणि अस्मिता दोघेही गोंधळले. “मला माफ कर अस्मि! तुला जेव्हा माझी सर्वात जास्त गरज होती नेमके तेव्हाच मी तुला वाऱ्यावर सोडले. मला तुझा बाप म्हणवुन घ्यायची लाज वाटते पोरी.” मग ती काही बोलणार इतक्यात महादेवला उद्देशुन ते म्हणाले, “महादेवा! तु नसतास तर मी माझ्या मुलीला कायमचा मुकलो असतो रे! तुझे उपकार मी या जन्मात फेडू शकत नाही.” असे म्हणुन त्यांनी महादेव समोर हात जोडले. तेव्हा “अहो काही तरी काय बोलताय काका! मी माझे कर्तव्य केले. तुम्ही माझ्या वडिलांच्या जागी आहात तुम्ही मला हात जोडायचे नाहीत तर मला आशीर्वाद द्यायचा” असे म्हणुन त्याने वामनरावांच्या पायांना स्पर्श केला. सद्गदित होऊन वामनरावांनी त्याला छातीशी धरले. ते पाहुन अस्मितांच्याही डोळ्यातुन अश्रु वाहु लागले. दाराआडून हा सर्व प्रकार पाहणाऱ्या वामनरावांच्या पत्नीही त्या आनंदोत्सवात सामील झाल्या.

“मोठ्या चलाखीने महादेव अस्मितावरील वशीकरण दूर करण्यात यशस्वी होतो पण काय आनंद स्वस्थ बसेल? तो आपल्या बेअरर चेकला (अस्मिताला) इतक्या सहजा सहजी जाऊ देईल? की नियतीच्या मनात काही वेगळेच आहे? पुढे वाचा.”