सप्तपदी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ ऑगस्ट २०१६

सप्तपदी - मराठी कथा | Saptapadi - Marathi Katha - Page 17

महादेवच्या गाडीतुन उतरल्यावर डोक्यावर दारूचा अंमल चढल्यामुळे आनंद त्या झाडाखाली बसला व बसल्या बसल्याच झोपी गेला होता. त्यावेळी त्यांच्या खिशात वीसेक हजार रुपये आहेत असे कोणी सांगितले असते तरी कोणाला विश्वास बसला नसता. त्याच्या अवतारावरून कोणी तरी बेवडा दारू पिऊन पडला असेल असा समज करून लोक त्याच्या बाजुने निघुन जात होते. दारूची नशा उतरल्यावर साधारण चार वाजता आनंद आपल्या घरी पोहोचला. घरी गेल्यावर त्याने मटणाचे पोटभर जेवण केले व पुन्हा झोपी गेला. पाच वाजण्याच्या सुमारास वामनराव आनंदच्या घरी पोहोचले. आनंदच्या आईला त्यांनी अस्मिताला डॉक्टरकडे घेऊन जायचे असल्याचे सांगितले. अपेक्षेप्रमाणे तिने त्यांना नकार दिला व आनंदला कळले तर तो भडकेल असे सांगितले. तेव्हा वामनरावांनी हजाराच्या नोटांची एका गड्डी तिच्या समोर ठेवली आणि अस्मिताला त्यांच्या सोबत जाऊ देण्याची विनंती केली. आनंदची आई काय करावे या विचारात पडली. तेव्हा तिचा दुसरा मुलगा आकाश तिला बाजुला घेऊन गेला आणि म्हणाला, एवढा कसला विचार करतेस, “ज्या पद्धतीने आनंद तिला मारतो ते पाहता ती काही जास्त जगेल असे वाटत नाही. उद्या जर का ती मेली बिली तर मिळणारे पैसे पण जातील आणि तिचा बाप आपल्या सगळ्यांना खाडी फोडायला पाठवेल ते वेगळे. तो नेतोय तिला डॉक्टरकडे तर नेऊ देत. त्यात आपले काहीच नुकसान नाही उलट फायदाच आहे. आनंदनें ती कुठे जाऊ नये म्हणुन बंदोबस्त केला आहे ना? मग टेन्शन कसले घेतेस? जाऊ दे तिला.” “ते ठीक आहे रे! पण आनंदचे काय? त्याला नाही आवडणार तिला तिच्या बापाबरोबर पाठवलेले.” आनंदच्या आईने आपली काळजी व्यक्त केली. एका तासाने काही होत नाही, तोपर्यंत अस्मिता घरी परत येईलही. पोटात दारू आणि मटण गेल्यामुळे हा काय एवढ्यात उठण्यातला नाही, त्यामुळे तु त्याची काळजी करू नकोस असे सांगुन आकाशने अस्मिताला घेऊन जाण्यास वामनरावांना परवानगी दिली पण एका तासाच्या आता तिला परत घेऊन येण्याची ताकीदही दिली.

अस्मिताला घेऊन वामनराव थेट आपल्या घरी गेले तिथे डॉक्टर आधीच आलेले होते. अस्मिताची अवस्था पाहुन तिच्या आईने तर हंबरडाच फोडला. घरातील सर्वच लोकांचे डोळे पाणावले. पण ही वेळ दुःख करत बसण्याची नव्हती. अस्मिताला तिच्या रूममध्ये नेऊन डॉक्टरांनी तिची पुर्ण शारीरिक तपासणी केली. कुठेही फ्रॅक्चर नव्हते पण मुका मार खुप लागला होता. तिला केवळ चांगले सकस अन्न आणि भरपुर विश्रांतीची गरज होती. काही गोळ्या व औषधे लिहुन देऊन डॉक्टर निघुन गेले. अस्मिताला तिच्या आईने मायेने जवळ घेतले व स्वतःच्या हाताने तिला खाऊ घातले. नंतर अस्मिताला आराम करायला सांगुन ती रूमच्या बाहेर निघुन गेली. इतक्यात महादेवने वामनराव कुलकर्ण्यांच्या घराची बेल वाजवली. आपण काय करणार आहोत याची कल्पना घरातील सदस्यांना न देता वामनरावांसोबत तो थेट अस्मिताच्या खोलीत आला, गुलाबाच्या फुलांचा एका सुरेख पुष्पगुच्छ त्याने अस्मिताच्या हातात दिला व “get well soon अस्मिता!” म्हणत एका छानसे स्मित केले. थँक्स म्हणत जसा अस्मिताने त्या पुष्पगुच्छाचा वास घेतला तसा महादेव आणि वामनरावांनी तांत्रिकाने सांगितलेल्या मंत्राचे उच्चारण हलक्या आवाजात सुरु केले. मंत्राचे उच्चारण संपताच अस्मिता बेशुद्ध झाली. महादेवने त्या पुष्पगुच्छात मांत्रिकाने दिलेले गुलाबाचे फुल खोचले होते. त्यामुळे कोणाला काहीच संशय नाही आला आणि कामही पार पडले होते. वामनराव महादेवच्या हुशारीवर खुप खुश झाले. हातात पाणी घेऊन त्यांनी अस्मिताच्या चेहऱ्यावर शिंपडले आणि झोपेतुन उठल्याप्रमाणे अस्मिता जागी झाली.