सप्तपदी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ ऑगस्ट २०१६

सप्तपदी - मराठी कथा | Saptapadi - Marathi Katha - Page 16

“त्या तंत्रिकांचा पत्ता मिळाला ना? चल आपण आत्ताच निघु त्याच्याकडे”, असे म्हणत वामनराव महादेव सोबत आनंदने दिलेल्या पत्त्यावर जायला निघाले. शहराबाहेर तासभर कार चालवल्यावर ते इच्छित स्थळी पोहोचले. खुण म्हणुन सांगितलेल्या वडाच्या झाडाजवळ त्यांनी कार उभी केली. तिथुन डाव्या हाताला एका पायवाट जाताना त्यांना दिसली. त्या वाटेने ते जाऊ लागले. साधारण पंधरा मिनिटे चालल्यावर त्यांना ओळखीची दुसरी खुण दिसली ती म्हणजे एका छोटेसे तळे. तिथुन पुढे गेल्यावर एका विस्तीर्ण बुंधा असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळ ते आले. त्या झाडाच्या बाजूला एका झोपडी वजा घर होते. घराजवळ जाऊन त्यांनी आवाज दिला पण कोणताच प्रतिसाद मिळाला नाही म्हणुन त्यांनी आत डोकावून पहिले. आतमध्ये पुर्ण अंगावर चिताभस्म चोपडलेला एका धिप्पाड माणुस व्याघ्रजिनावर ध्यानस्थ बसला होता. त्याच्या चेहेऱ्यावरील तेज अभुतपुर्व होते. त्या तांत्रिकाची तपस्या भंग करायचे धाडस त्या दोघांनाही झाले नाही त्यामुळे त्याचे ध्यान तुटण्याची ते दोघे वाट पाहु लागले. जवळपास तासाभराने त्या तांत्रिकाने डोळे उघडले. आपल्या समोर बसलेल्या त्या दोघांना पाहुन तो आश्चर्यचकित झाला व म्हणाला, “कोण तुम्ही? माझ्याकडे काय काम आहे? आणि मुळात तुम्हाला माझा पत्ता कोणी दिला?” तेव्हा महादेवने त्या तांत्रिकाला सगळी गोष्ट सांगितली की कसे आनंदने त्यांच्याकडुन एका मुलीवर वशीकरण करवुन घेतले होते, आणि नंतर तिच्या वडिलांकडून पैसे मिळवण्यासाठी कसा तिचा अनन्वित छळ करत होता. सगळे ऐकल्यावर त्या तांत्रिकाने विचारले की तुम्हाला आता माझ्याकडुन काय हवे आहे? त्यावर वामनरावांनी हात जोडत त्या तांत्रिकाला कळकळीने विनंती केली की त्याने आपल्या मुलीवरील वशीकरण नाहीसे करावे नाहीतर ती काही फार जगणार नाही. तेव्हा त्या तांत्रिकाने तसे करण्यास नकार दिला. तो म्हणाला, “तसे करणे उचित होणार नाही, मी आनंदला शब्द दिला होता की त्याचे काम करेन म्हणुन आता जर का मी केलेले वशीकरण काढले तर ती बेईमानी होईल.”

तेव्हा रडवेल्या स्वरात वामनराव त्या तांत्रिकाचे पाय धरून म्हणाले, “माझ्या पोरीला वाचावा, एकुलती एका पोर आहे हो माझी! तो आनंद तिला खुप मारझोड करतो, उपाशी ठेवतो. माझा सगळा पैसा तुम्हाला द्यायला मी तयार आहे पण माझ्या पोरीचा जीव वाचावा.” तरीही तो तांत्रिक बधत नाही हे पाहिल्यावर महादेवने बारमध्ये दारू पिऊन आनंद बरळतानाचा आणि अस्मिताला निर्दयपणे मारहाण करत असतानाचे दोन्ही व्हिडिओ त्या तांत्रिकाला दाखवले. त्याचा अपेक्षित परिणाम झाला. आपली मोठी चुक झाल्याचे त्या तांत्रिकाच्या लक्षात आले. त्या तांत्रिकाने वामनरावांनी माफी मागितली आणि वशीकरण तोडण्याचा उपाय सांगितला. झोपडी बाहेरील एक गुलाबाचे फुल तोडून आणले व वशीकरण नष्ट होण्यासाठी एक अधिष्ठान मांडले. जवळ-जवळ तासभर ते अधिष्ठान सुरु होते. अधिष्ठान संपताच त्याने कसली तरी पावडर त्या गुलाबावर टाकली आणि मंत्राने तो गुलाब भरून टाकला. नंतर ते भारलेले गुलाबाचे फुल त्याने महादेवकडे दिले आणि ते फुल अस्मिताला हुंगायला लावण्यास सांगितले. त्याचवेळी वशीकरण मोडण्यासाठी एक मंत्रही म्हणावयास सांगितला. एवढे केले की वशीकरणाच्या प्रभावापासुन अस्मिता मुक्त होईल असे त्याने सांगितले. त्या तांत्रिकाचे आभार मानत वामनरावांनी आपल्या खिशात हात घातला, तेव्हा त्यांना अडवत त्या तांत्रिकाने पैसे घेण्यास नकार दिला, अनावधानाने त्याच्यामुळे जो त्रास झाला त्याबद्दल त्यांची माफी पण मागितली. “आयुष्यात कधी गरज पडली तर खुशाल माझ्याकडे या, माझ्या झोपडीचे दरवाजे तुमच्यासाठी नेहेमी खुले आहेत”, असे म्हणुन त्या तांत्रिकाने त्यांना निघण्यास सांगितले. तसेच त्या गुलाबाच्या फुलाला त्या दोघांनी किंवा अस्मिता व्यतिरिक्त इतर कोणीही हुंगल्यास फार विचित्र परिणाम होतील असे सांगुन त्याने खबरदारी घेण्यास बजावले, पुन्हा एकदा तांत्रिकाचे आभार मानल्यावर गुलाबाचे फुल सोबत घेऊन त्या मंत्राची मनात उजळणी करत वामनराव आणि महादेव परतीच्या रस्त्याला लागले.

“महादेव आणि वामनराव तांत्रिकाकडुन वशीकरणाचा तोड मिळवण्यात तर यशस्वी होतात पण ते अस्मिताला त्या वशीकरणातुन मुक्त करू शकतात का? की आनंद त्यांचा डाव हाणुन पडतो ते जाणण्यासाठी पुढे वाचा.”