सप्तपदी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ ऑगस्ट २०१६

सप्तपदी - मराठी कथा | Saptapadi - Marathi Katha - Page 15

पैसे हातात आल्यावर आनंदला आकाश ठेंगणे झाले. त्याने घरच्यांना सांगितले की “आज पाच लाख आले आहेत उद्या सगळी इस्टेट आपली होते की नाही ते बघा. आता आपले गरीबीचे दिवस संपले. आता कोणालाही काम करायची गरज नाही. दुपारी जेवायला मस्तपैकी मटण बनवा.” अस्मिता तशीच जमिनीवर पडुन होती. त्याने तिच्याकडे ढुंकूनही पहिले नाही की तिची साधी विचारपुसही केली नाही. तो आज सकाळीच आपले पहिले यश साजरे करायला बाहेर पडला. इकडे वामनरावांनी फोन करून महादेवला सगळा वृत्तांत कथन केला होता. महादेवच्या अंदाजानुसार पैसे मिळताच आनंद स्वस्थ बसणे शक्यच नव्हते. आणि घडलेही तसेच. तो आवरून लगेच घराबाहेर पडला. त्याने दोन किलो मटण व एका वाईन शॉप मधुन दारू खरेदी केली. घेतलेले मटण त्याने घरी आणुन दिले आणि तो पुन्हा घराबाहेर पडला व दारू पिण्यासाठी निवांत ठिकाण शोधु लागला. महादेव त्याच्या मागावर होताच. आनंद कुठे जातोय याचा महादेवने अंदाज घेतला आणि आपली कार फिरवून अशा रितीने आणली की तो आनंदला व्यवस्थित दिसेल. आनंदने महादेवला ओळखले आणि आवाज दिला. तसे महादेवने आश्चर्य दाखवत कार आनंदजवळ थांबवली आणि आनंदला विचारले, “काय आनंदराव आज सकाळी सकाळीच दर्शन झाले, आणि खुप खुशीत पण दिसता! तुमच्या सासऱ्याने पैसे दिले वाटते!” आश्चर्य वाटुन आनंदने त्याला विचारले, “तुला कसे कळले?” “काल रात्री तुम्ही एवढे उदास आणि दुःखी वाटत होतात. दारू प्यायला पण पैसे नव्हते आणि आज एवढे खुश दिसत आहात. शर्टचा खिसा काल छातीला चिकटला होता आणि आज मात्र फुगलेला आहे. हातात वाईन शॉप आणि मटणाच्या दुकानात देतात तसली काळी प्लॅस्टिकची पिशवी दिसते आणि त्यात दारूच्या बाटलीच्या बॉक्ससारखा आकार दिसतो याचा अर्थ न कळण्याइतका काही मी मुर्ख नाही!” महादेवच्या अचुक निरीक्षणामुळे आनंद एकदम प्रभावित झाला आणि म्हणाला, “एकदम बरोबर ओळखले महादेव राव तुम्ही. (नकळत तो महादेवला आदर देऊन बोलु लागला होता.) मानले बुवा तुमच्या निरीक्षण आणि तर्काला. आज सकाळीच तो थेरडा माझ्या घरी आला होता. पाच लाख रुपये देऊन गेला, आहात कुठे? त्याची दुखती नस जी मी आवळली! पैसे न देऊन सांगतो कोणाला?” आणि महादेवला टाळी देत आपल्याच कोटीवर तो खदा खदा हसु लागला. महादेवला त्याच्या निर्लज्जपणाचा भयंकर तिटकारा आला होता पण त्याने चेहेऱ्यावर काहीच भाव न आणता त्याची स्तुती करत त्याच्या नशिबावर जळल्यासारखे दाखवले.

“आमचे तेवढे काम करा की आनंदराव”, असे महादेवने म्हणताच, स्वतःच्या स्तुतीने सुखावलेला आनंद लगेच तयार झाला. हातातील बाटली उंचावत आनंद म्हणाला, “काल तुम्ही मला दारू पाजली, आज माझ्याकडून तुम्हाला पार्टी. आपला प्रोग्रॅम झाला की मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो. पण बसणार कुठे? तुमच्या कार मध्ये बसले तर चालेल का?” तेव्हा क्षणभर विचार करून महादेव त्याला म्हणाला, “कार मध्ये बसून दारू प्यायला मला काहीच प्रॉब्लेम नाही पण माफ करा मी दिवसा घेत नाही. मला नंतर ऑफिसलाही जायचे आहे तेव्हा तुम्ही घ्या, मी तुम्हाला फक्त कंपनी देईन. वाटल्यास संध्याकाळी आपण एकत्र बसु.” यावर आनंदने ते मान्य केले आणि गाडीत बसला. आनंदने सांगितलेल्या पत्त्याच्या दिशेने महादेवने कार वळवली आणि एका शांत जागी झाडाच्या सावलीत त्याने आपली कार थांबवली. आनंदनें प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये दारू ओतुन आपला प्रोग्रॅम सुरु केला. बोलण्या बोलण्यात महादेवने त्या तांत्रिकाविषयी बरीच माहिती विचारून घेतली. पत्ता नीट समजून घेतला. जसा आनंदचा कोटा पुरा होत आला तसा महादेवने आनंदचे लक्ष नाही असे पाहुन वामनरावांना एका मिस कॉल दिला, लगेचच वामनरावांनी महादेवला कॉल केला. एक मिनिट हा आनंदराव, ऑफिस मधुन फोन आहे म्हणत त्याने कॉल उचलला. फोनवर केवळ हो नाही अशी जुजबी उत्तरे देत, “हो मी लगेच निघतो” म्हणत त्याने फोन ठेवला. “काय झाले? कुठे निघालात एवढ्या घाईत? तुम्हाला तांत्रिकाकडे जायचे होते ना?” असे आनंदने विचारताच महादेव म्हणाला, ऑफिसमध्ये महत्वाचे काम आले आहे मला तातडीने जावे लागतंय. सॉरी आनंद आपण पुन्हा केव्हा तरी जाऊ. आज संध्याकाळी नक्की भेटु पण आता मला जायला हवं” असे म्हणत महादेवने आनंदच्या बाजुचा दरवाजा उघडला. महादेवचा इशारा समजुन आनंद कारमधुन उतरला. आनंदला तिथेच सोडुन महादेवने कार वामनरावांच्या घराकडे वळवली.