सप्तपदी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ ऑगस्ट २०१६

सप्तपदी - मराठी कथा | Saptapadi - Marathi Katha - Page 14

आनंदच्या घरी पोहोचताच त्यांनी दारावर टक टक केली, तसे “कोण आहे?” असा वैतागलेला आवाज त्यांच्या कानावर पडला. “अस्मिता आहे का? मी तिचा बाबा, अस्मिताला भेटायला आलोय.” वामनरावांचे वाक्य संपताच खाडकन दरवाजा उघडला. दारात आपल्या सासऱ्याला हातात बॅग घेऊन आलेले पाहुन आनंद वेडा व्हायचाच बाकी राहिला होता. त्याच्या पाठोपाठ घरातील सगळे सदस्य उभे होते. बघा! थेरड्याला नाक घासत दारात यायला लावले की नाही असे भाव त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होते. तो बाहेर आला. त्याला पाहताच वामनरावांनी कानशिले गरम झाली पण त्यांनी स्वतःला सावरले व म्हणाले, “अस्मिता आहे का? मला तिला भेटायचे आहे.” तसे आनंद गुर्मीत म्हणाला, “काय काम आहे?” काम असे काही नाही, फक्त भेटायला आलो होतो, लग्नाला येता आले नाही आणि काही भेटही देता नाही आली म्हणुन हे थोडे पैसे सोबत आणले होते.” असे म्हणत वामनरावांनी ड्रायव्हरकडील बॅग हातात घेऊन उघडून दाखवली. त्यातील नोटांची बंडल पाहुन सर्वांचेच डोळे फिरले. हर्षवायु होतो की काय अशी त्यांची अवस्था झाली. त्यांच्या हातातील बॅग जवळ जवळ हिसकावुन घेत आनंद आणि त्याचे कुटुंबीय घरात गेले. या त्यांच्या निर्लज्जपणामुळे आवाक झालेले वामनराव त्यांच्या पाठोपाठ आत गेले. त्यांची नजर अस्मिताला शोधत होती. अस्मि कुठे दिसत नाही, तिला बोलवता का? किचन मध्ये अस्मिता जमिनीवर लाळा गोळा होऊन पडली होती. आपल्या वडिलांचा आवाज कानात शिरताच मोठ्या कष्टाने ती उठली आणि भिंतीचा आधार घेत हळुहळु बाहेर आली.

अस्मिताच्या डोळ्याखाली मारामुळे काळे निळे झाले होते, ओठ फुटून रक्त सुकले होते, अंगावर जागो जागी वळ उठले होते. हाता पायावर सुज आली होती. बिचारीचा चेहरा वेदनेने पुरता पिळवटला होता. तिची ती अवस्था पाहुन वामनरावांच्या हृदयात कालवाकालव झाली. त्यांचे डोळे भरले. संतापाने त्यांचे स्नायु फुरफुरू लागले. आपल्या हृदयाच्या तुकड्याची ती दयनीय अवस्था त्या बापाच्या जीवाला असह्य वेदना देऊन गेली. रागाच्या भरात त्यांनी आनंदला अशी काही जोराची थप्पड ठेऊन दिली की त्याच्या डोळ्यासमोर काजवेच चमकले. तो कोलमडला. ती थप्पड आनंदच्या इतकी जिव्हारी लागली की रागाच्या भरात तो वामनरावांच्या अंगावर धावुन गेला व त्याने त्यांच्या वर हात उगारला पण त्याचवेळी अस्मिता मध्ये आली आणि तिने तो मार स्वतःच्या अंगावर झेलला. त्या फटक्यामुळे ती खाली पडली, तिला सावरायला वामनराव खाली झुकले तसे हात जोडून ती आपल्या वडिलांना म्हणाली, “बाबा का आलात तुम्ही इथे? तुम्ही जा इथुन. मी ठीक आहे. इथे नका थांबु, मी वाटेल तेवढा मार खायला तयार आहे पण तुमचा अपमान मला नाही सहन होणार. प्लिज बाबा तुम्ही जा इथुन.” “अगं पण! तुला अशा अवस्थेत कसे सोडुन जाऊ? ही माणसं नाहीत, सैतान आहेत सैतान. तुझा जीव घेतील ते. माझे ऐक पोरी, चल घरी.” वामनराव काकुळतीने म्हणाले. तेव्हा आनंद त्यांच्या अंगावर खेकसला, “तुझी पोरगी जर जीवंत राहावी असे तुला वाटत असेल ना तर वेळच्या वेळी मला पैसे देत जा, कळलं का रे थेरड्या. आणि तिला इथुन तुच काय तुझा स्वर्गात गेलेला बाप पण नाही नेऊ शकत. सोन्याचे अंड देणारी कोंबडी जाऊ द्यायला मी काय मुर्ख वाटलो की काय? चल निघ आता. भेटीची वेळ संपली.” त्यावर वामनराव हात जोडुन त्याला म्हणाले, “तु म्हणशील तेवढे पैसे तुला द्यायला मी तयार आहे, पण कृपा करून माझ्या मुलीचा छळ करू नकोस. माझी तुला हात जोडुन विनंती आहे. असे म्हणत वामनरावांनी भरल्या डोळ्यांनी अस्मिताच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ते आनंदच्या घरातुन बाहेर पडले. कारमध्ये बसुन ते ओक्सबोशी रडु लागले तसे ड्रायव्हरने गाडी त्वरेने घराच्या दिशेने दामटली.

“महादेवच्या सुचनेनुसार वामनराव आनंदच्या घरी पाच लाख रुपये देतात आणि शिवलकर कुटुंब पैशासाठी किती खालच्या थराला जाऊ शकते हे पाहुन ते पुरते आवाक होतात. आपल्या बुद्धी आणि हुशारीच्या जोरावर महादेव आनंदकडुन तंत्रिकाचा पत्ता काढुन घेतो का? तो तांत्रिक वामनरावांनी मदत करतो की त्यांना हाकलुन देतो ते आता पुढे वाचा.”