सप्तपदी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ ऑगस्ट २०१६

सप्तपदी - मराठी कथा | Saptapadi - Marathi Katha - Page 13

दुसऱ्या दिवशी सकाळीच महादेव वामनरावांच्या घरी पोहोचला. तो अस्मिताचा मित्र आहे आणि तिच्या विषयी त्याला काही बोलायचे आहे असे त्याने सांगताच वामनरावांच्या कपाळावर आठ्या आल्या. “माझी मुलगी मला केव्हाच मेली. मला तिच्या विषयी काहीच बोलायचे नाही. तु जाऊ शकतोस” म्हणुन त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. पण “तिचा जीव धोक्यात आहे” असे महादेव म्हणताच ते जागीच थबकले. “काय म्हणालास? नीट सांग तुला काय माहीत आहे ते!” वामनराव कडाडले. आनंदने दारूच्या नशेत जे काही महादेवला सांगितले होते ते त्याच्या नकळत महादेवने आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केले होते. तो व्हिडीओ त्याने वामनरावांना दाखवला. त्यावर वामनराव त्याला म्हणाले, “त्या भिकारड्या आनंदला मी एका फुटकी कवडी पण देणार नाही.” तेव्हा महादेव त्यांना म्हणाला की “आनंदने अस्मिताला तुमच्याकडुन पैसे न आणल्या बद्दल खुप मारले.” ते ऐकुन वामनरावांच्या मनात कालवा कालव झाली पण तरीही तसे न दाखवता ते म्हणाले, मारू दे. तिची तिच लायकी आहे. तिला किती वेळा समजावले पण शेवटी गेली त्या हलकट माणसाबरोबर पळुन. भोग म्हणावं आपल्या कर्माची फळे. त्यासरशी महादेवने आनंद अस्मिताला निर्दयपणे मारझोड करत असतानाचा विडिओ वामनरावांच्या समोर धरला व म्हणाला, “हा विडिओ पाहिल्यावरसुद्धा तुम्ही हेच म्हणाल का?” तो विडिओ पाहताच वामनरावांचा चेहरा पार लालबुंद झाला. त्यांच्या डोळ्यात अंगार भडकले. रागाच्या भरात ते थरथर कापू लागले आणि मोठ्याने ओरडले, “आनंद, मी तुझा जीव घेईन xxxxx. माझ्या फुलासारख्या पोरीला इतक्या निर्दयपणे ती बेशुद्ध पडेपर्यंत मारतोस, षंढ कुठला! स्वतःमध्ये पैसे कमवायची धमक नाही आणि माझ्या पोरीला त्रास देऊन माझ्याकडुन पैसे उकळायला बघतोस, हरामखोर! अरे तुझी लायकी तरी आहे का तिचा नवरा म्हणवण्याची. मी तुला जीवंत सोडणार नाही” म्हणत त्यांनी भिंतीवर लटकवलेली आपली बंदुक काढली.

महादेव त्यांना अडवत म्हणाला, “काका अस्मिताला आनंद मारत असताना माझेही रक्त असेच खवळले होते, पण मी स्वतःवर संय्यम ठेवला. थोडा धीर धरा. ज्या तांत्रिकाकडुन आनंदने अस्मितावर वशीकरण करवले त्याचा पत्ता मला आज संध्याकाळी आनंदकडुन मिळणार आहे. तो एकदा का मिळाला की अस्मिताला त्या जालीम वशीकरणातुन मुक्त करण्याचा उपाय शोधता येईल. मग आपण बघु आनंदचे काय करायचे ते.” महादेव पुढे म्हणाला, “सध्या अस्मितावर त्याच्या वशीकरणाचा प्रभाव आहे त्यामुळे तिला या क्षणाला जरी आपण त्याच्याकडुन उचलुन इथे आणले तरी त्याचा काहीच उपयोग नाही कारण ती त्याच्यातच अडकलेली राहील व संधी मिळताच परत त्याच्याकडेच जाईल. जसे ती या सगळ्यातुन मुक्त होईल तसे तिला त्याच्या तावडीतुन सोडवणे आपल्याला कठीण जाणार नाही. मला वाटते की तुम्ही स्वतः त्याच्याकडे जाऊन त्याला पैसे द्या, वर विनंती करा की हवे तेवढे पैसे तुम्ही त्याला द्याल पण तुमच्या मुलीला त्याने त्रास देऊ नये. त्यामुळे त्याला तो जिंकल्याची भावना होईल, त्याला त्या भ्रमातच राहु दे जेणेकरून तो अस्मितावर अजुन अत्याचार करणार नाही. दिलेले पैसे नंतर कसे वसुल करायचे ते पाहता येईल.” महादेवचे म्हणणे वामनरावांना पटले. त्यावेळी त्यांना त्याचा खुप आधार वाटला. आनंदकडुन त्या तंत्रिकांचा नांव पत्ता वगैरे मिळाल्यावर पुन्हा भेटण्याचे ठरवुन महादेव तिथुन निघाला. महादेव व वामनरावांचे बोलणे आपल्या बेडरूमच्या दाराआडून ऐकत उभी असलेली अस्मिताची आई हॉल मध्ये आली. वामनरावांसारखे तिचेही डोळे भरलेले होते. माझ्या पोरीला वाचावा हो! म्हणत त्या माऊलीने हंबरडा फोडला. वामनरावांनी तिला जवळ घेत तिचे सांत्वन केले. तिच्या दुःखाचा भर ओसरल्यावर ते आपल्या पत्नीला म्हणाले, “तु काही काळजी करू नकोस, मी वाटल्यास माझी सगळी संपत्ती पणाला लावीन पण आपल्या लाडक्या अस्मिला सुखरूप परत आणेन.” त्यांनी बॅगेत पाच लाख रुपये भरले व ड्रायव्हरला आनंदच्या घराकडे गाडी घेण्यास सांगितले.