सप्तपदी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ ऑगस्ट २०१६

सप्तपदी - मराठी कथा | Saptapadi - Marathi Katha - Page 12

नंतर इतर कोणी तिचे ब्रेन वॉश करू नये यासाठी खबरदारी म्हणुन त्या तांत्रिकाने मानवी हाडांची मंतरलेली भुकटी पण मला दिली. मी तिला अगदी सहजपणे ती खाण्यातुन दिली. आता ती मला सोडुन जायचा विचारही कधी करणार नाही आणि माझ्या आज्ञेतही राहील. पण तिच्या बापाने तिला इस्टेटीतून बेदखल केले त्यामुळे इस्टेटच काय, एक रुपया पण नाही दिला तिच्या बापाने अजुन. काल चांगलीच चामडी सोलुन काढली आहे तिची आणि आज तिला तिच्या बापाकडुन पैसे घेऊन यायला सांगितले आहे. जर का तिने पैसे नाही आणले तर आज तिची कंबक्ती ठरलेली आहेच. बघु तिचा बाप कुठवर पैसे देत नाही ते.” असे म्हणुन आनंद हसु लागला. महादेवच्या मस्तकात तिडीक गेली त्याला वाटले व्हिस्कीची बाटली उचलावी आणि आनंदच्या टाळक्यात हाणावी पण त्याला अजुन माहिती हवी होती त्यामुळे त्याने स्वतःवर संय्यम ठेवला. आनंदची स्तुती करत तो म्हणाला, “तु तर खुप भारी डाव खेळलास, मला पण त्या तांत्रिकाकडे घेऊन चल ना! मला पण एक पोरगी पटवायची आहे.” तेव्हा खुश होऊन आनंद त्याला म्हणाला, “तु उद्या मला अशीच दारू पाज मग नक्की घेऊन जाईन. पण याची कोणाकडे वाच्यता करू नकोस.” असेही ठणकावले. दुसऱ्या दिवशी आजच्या सारखेच भेटायचे ठरवुन झोकांड्या खात आनंद बारमधून बाहेर पडला तसे महादेवने बिल चुकते करून पुरेसे अंतर ठेवत त्याच्या मागे जाण्यास सुरवात केली.

धडपडत ठेचकाळत आनंद आपल्या घरी येऊन पोहोचला. त्याने अस्मिताला हाक मारली तसा अस्मिताच्या जीवाचा थरकाप उडाला पण तिच्या मनाची मार खाण्याची तयारी झाली होती. तिने दरवाजा उघडला तसा दारूचा घाण वास तिच्या नाकात शिरला. तिच्या घरी कोणीच दारू घेत नसे ना मांसाहार करत असे त्यामुळे तिला या सगळ्याची सवय नव्हती. इतर कोणत्याही स्त्रीने आपल्या नवऱ्याचा तिरस्कार केला असता पण वशीकरणाच्या प्रभावामुळे आनंदने तिला कितीही त्रास दिला तरी ती त्याच्यावर प्रेमच करत होती. आनंदने दारातच तिला विचारले, “बापाकडुन पैसे आणलेस?” ती नाही म्हणताच त्याने तिच्या कानाखाली एवढ्या जोरात वाजवली की ती कोलमडुन खालीच पडली. आनंद इतका बेफाम झाला की तिला लाथा बुक्क्यांनी मारू लागला. ते कमी पडले म्हणुन त्याने तोंडातील जळती विडी तिच्या मनगटावर चुरडली. वेदनेने अस्मिता किंचाळली. ते पाहुन महादेव प्रचंड संतापला पण महत्प्रयासाने त्याने स्वतःला आवरले. शेवटी अस्मिता बेशुद्ध पडल्यावर आनंद थोडा थंडावला. अस्मिताच्या सासुने तिच्या तोंडावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणले आणि घरात नेले. जावेने दरवाजा बंद करताच काळोखात लपलेला महादेव बाहेर आला व त्याने दरवाजा जवळ जाऊन कानोसा घेतला. आत सगळी शांतता होती, रडण्याचे किंवा शिव्या दिल्याचे कुठलेच आवाज त्याच्या कानावर पडले नाही. अर्धा तास थांबुन आता सगळे ठीक असावे असा विचार करून तो आपल्या घरी जाण्यास निघाला.

“एकीकडे एकतर्फी प्रेमातुन, अस्मिता मिळेल याची काहीही शाश्वती नसताना महादेव तिला आनंदच्या जाचातुन मुक्त करण्यासाठी धडपडतोय. आणि दुसरीकडे आनंद, प्रेमाखातर आपल्या बापाची इस्टेट झुगारून आलेल्या अस्मिताची अवस्था पैशासाठी किती दयनीय करतोय. अजब आहे हे सारे! महादेव आता पुढे काय शक्कल लढवतो ते पुढे वाचा.”