सप्तपदी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ ऑगस्ट २०१६

सप्तपदी - मराठी कथा | Saptapadi - Marathi Katha - Page 11

संध्याकाळचे साडेपाच वाजले होते आणि ऑफिस बंद करण्याची वेळ जसजशी जवळ येत होती, तसतशी अस्मिताची बेचैनी वाढतच चालली होती. आनंदने तिला तिच्या वडिलांकडुन पैसे आणण्यास सांगितले होते. ती वडिलांकडे कोणत्या तोंडाने पैसे मागायला जाणार होती आणि जर का पैसे घेऊन नाही गेली तर रात्री मार खाणे काही चुकणार नव्हते. ती पुरती कात्रीत अडकली होती. शेवटी तिने मार खाणे निवडले आणि घराची वाट धरली. रात्री साडेआठला दुकान बंद झाल्यावर, आज जर का अस्मिताने तिच्या बापाकडुन पैसे आणले असतील तर ठीक नाहीतर तिला चांगलीच तुडवायची असा विचार करून आनंद बारकडे निघाला. खिशात पैसे नसल्यामुळे बारवाला त्याला धक्के मारून बाहेर काढू लागला. तसे इतका वेळ त्याच्या मागावर असलेला महादेव त्या बारवाल्याला अडवत म्हणाला, “याचे बिल माझ्या बिलात ऍड करा, आणि त्याला काय हवे असेल ते द्या” म्हणत एका एका मोकळ्या टेबल समोरील खुर्चीत जाऊन बसला. साहजिकच आनंद त्याच्या समोर जाऊन उभा राहिला. “कोण आहेस तु? आणि माझे बिल भरायची तुला काय गरज? त्यात तुझा काय फायदा?” असे आनंदने महादेवला विचारताच महादेव शांतपणे त्याला म्हणाला “काहीच फायदा नाही, मला वाटले की तुझी मदत करावी आणि मी केली, दुसरे काही नाही.” त्याच्या या वक्तव्यावर अविश्वास दाखवत आनंद म्हणाला, “काही तरी स्वार्थ असल्याशिवाय कोणीच कोणाची मदत करत नाही. काय हवय तुला माझ्याकडुन?” महादेव हसला आणि म्हणाला, “काही वर्षांपुर्वी माझी पण तुझ्यासारखीच अवस्था होती. मला पण एकाने असेच बारमधुन धक्के देऊन बाहेर काढले होते. मी तेव्हाच ठरवले की आपली परिस्थिती सुधारली की जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुझ्यासारख्या कोणाची तरी मदत करायची. माझा झालेला अपमान इतर कोणाच्या वाट्याला येऊ द्यायचा नाही. तुला हवे असेल तर तु मला कंपनी देऊन हवी तेवढी दारू पिऊ शकतोस आणि अजुनही तुझा माझ्यावर विश्वास बसत नसेल तर बारचा दरवाजा तुला माहीत आहेच, कसलीच जबरदस्ती नाही.” महादेवने आपली चाल खेळली होती आता तो शांतपणे मासा गळाला लागायची वाट पाहत होता.

आनंदचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नव्हता पण टेबलावरची व्हिस्कीची बाटली त्याला आकर्षित करत होती. फुकटात दारू प्यायला मिळतेय ती पिऊ मग पुढचे पुढे बघु. याच्यासारखे मुर्ख रोज भेटले तर काय मजा येईल! असा विचार करून आनंद महादेव समोरील खुर्चीत बसला. वेटरने दोघांसाठी पेग बनवले व चाखणा ठेऊन निघुन गेला. आनंदने अधाशासारखा पहिला पेग संपवला व आशाळभुतासारखा महादेवकडे पाहु लागला. तसे महादेवने त्याला संकोच न करता हवी तेवढी दारू घेण्यास सांगितले. वेटर येण्याची वाट न पाहता आनंदने आणखीन दोन तीन मोठे पेग रिचवले. दारूचा अंमल त्याच्यावर व्हायला लागला होता. आनंदचे शब्द जड येऊ लागल्यावर महादेवने त्याच्याशी गप्पा मारायला सुरवात केली. नांव गाव विचारून झाल्यावर हळू-हळू आनंद खुलत गेला. स्वतःचा मोठेपणा सांगण्याच्या नादात त्याने एका मोठ्या व्यापाऱ्याच्या मुलीला आपण मोठ्या हुशारीने पटवले आणि तिच्याशी लग्न करून आता तिच्या बापाची सगळी इस्टेट घशात घालणार असल्याचे सांगितले. त्यावर त्याच्या हुशारीचे कौतुक करत महादेवने त्याला हे जमवलेस कसे? असे विचारताच, आनंदने त्याला थोडे जवळ बोलावले. महादेव थोडा पुढे सरकताच तो त्याला म्हणाला, “कोणाला सांगु नकोस, पण मी एका तांत्रिकाची मदत घेतली आणि तिच्यावर जालीम वशीकरणाचा प्रयोग केला. आधी तो तांत्रिक तयार होईना मग मी त्याला खोटेच सांगितले की माझे तिच्यावर खुप प्रेम आहे आणि तिच्याशिवाय मी जगु शकत नाही, रडल्याचे नाटकही केले तेव्हा कुठे तो मुर्ख तांत्रिक माझ्या बोलण्याला फसला. त्या तांत्रिकाने मला सांगितले की तो मला एक पावडर देईल ती काहीही करून तिच्या जिभेवर पडली पाहिजे. मग मला संधी मिळताच एका पाचशेच्या नोटवर ती पावडर टाकुन नोट घडी करून मी तिला दिली. नोट हातात घेताच सवयीने तिने ती खरी आहे का हे तपासण्यासाठी वर धरली आणि त्या नोटवर लावलेली पावडर तिच्या नाकातोंडात गेली आणि माझे काम झाले. मला तिची सवय माहीत होती आणि मी त्याचाच फायदा उचलला.” स्वतःच्या हुशारीवर खुश होत आनंद म्हणाला.