सप्तपदी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ ऑगस्ट २०१६

सप्तपदी - मराठी कथा | Saptapadi - Marathi Katha - Page 10

दुसऱ्या दिवशी सुजलेला डोळा, फुटलेला ओठ आणि अंगावर काळे निळे वळ झाकत ती कशीबशी ऑफिसला पोहोचली. ग्रॅजुएशनला तिच्या वर्गात शिकणारा महादेव काळे हा काही कामानिमित्त त्याच सी.ए. कडे आला होता. त्याच्याही वडिलांचा मोठा व्यवसाय होता, परीक्षा झाल्यावर तो आपल्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करत होता. त्यांच्याकडून व्यवसायातील खाचा खोचा शिकुन घेत होता. तो फर्स्ट इयरला असताना अस्मिताने कॉलेजला अकरावीला ऍडमिशन घेतली होती. पहिल्या दिवशी तिला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला. साधी भोळी, निरागस आणि कुणाच्याही अध्यात ना मध्यात नसणारी अस्मिता त्याच्या मनाला खुप भावली होती. तो फक्त तिला न्याहाळायचा, सतत तिच्या पुढून जायचा जेणेकरून तिने त्याची दाखल घ्यावी पण अस्मिता कायम आपल्याच तंद्रीत असायची. आपले प्रेम व्यक्त करण्याचे धाडस त्याला कधीच झाले नाही, पण ज्या वेळी त्याने तिला विचारण्यासाठी आपली हिम्मत गोळा केली तेव्हा मात्र अस्मिता कोणाच्या तरी प्रेमात पडल्याचे लक्षात येताच त्याने आपल्या भावनांना आवर घातला होता. आज दोन वर्षांनी तिला पाहुन नकळत काही काळासाठी तो भुतकाळात गेला. आत्मविश्वासाने तिच्या जवळ जाऊन त्याने तिला हाक मारली, “अस्मिता! मी महादेव काळे. ओळखलंस का मला? आपण एकाच कॉलेजला शिकत होतो.” अस्मिताने त्याच्याकडे पहिले पण कॉलेजमध्ये असताना तिचे लक्ष केवळ अभ्यासात असायचे आणि आनंद आयुष्यात आल्यावर तिने इतर कोणाकडे पाहायचा प्रश्नच नव्हता. तिच्या चेहेऱ्यावरचे अनोळखी भाव लक्षात येताच महादेवही वरमला पण त्याने स्वतःला सावरत तिची चौकशी केली. त्याच्याशी बोलताना ती सतत आपल्या माराच्या खुणा लपवायचा प्रयत्न करत होती. तिला पहिल्याच्या आनंदात महादेवचे तिकडे आधी लक्ष गेले नव्हते पण तिच्या अयशस्वी प्रयत्नांमुळे त्याचे लक्ष तिच्या सुजलेल्या डोळ्याकडे आणि फुटलेल्या ओठांकडे गेले तसा तो आवाकच झाला. अस्मितासारख्या साध्या आणि सुंदर मुलीशी इतक्या निर्दयपणे कोणी कसे काय वागु शकतो याचे त्याला अप्रुप वाटले. त्या अनोळखी माणसाबद्दल त्याच्या मनात चीडही निर्माण झाली. पण तिच्या गळ्यातील मंगळसुत्राने तिच्या अवस्थेला कारणीभुत असलेल्या माणसाचे बिंग फोडले होते.

महादेवने अस्मिताच्या अंगावर उठलेल्या वळांबद्दल आणि चेहेऱ्यावरील जखमांबद्दल बोलणे जाणिवपुर्वक टाळले. आणि तिची विचारपूस करून तो तिच्या बॉसच्या केबिन मध्ये गेला. आपले काम आटपल्यावर अस्मिताशी न बोलताच तो तिथुन निघुन गेला. महादेव अस्मिताच्या ऑफिस मधुन बाहेर पडला खरा पण त्याच्या मनात प्रचंड खळबळ उडाली होती. तो स्वतःशीच बोलत होता. “म्हणजे अस्मितांचे लग्न झाले तर! पण कोणाशी? त्या दिड दमडीच्या आनंद सोबत तर नव्हे? पण हे कसे शक्य आहे? अस्मिताचे वडिल या लग्नाला कसे काय तयार झाले? की अस्मिताने पळुन जाऊन लग्न केले? तिची अवस्था आणि अंगावरचे कपडे पाहून तरी असेच वाटते. अस्मिताला तो आनंद मारझोड करतोय की काय? आणि ती का सहन करतेय हे सगळे. जिच्या दिमतीला नोकरांची फौज असली पाहिजे ती ह्या सी.ए. कडे चक्क नोकरी करतेय! नाही-नाही, अस्मिता सारख्या मुलीच्या नशिबात असे दुःख आणि कष्ट येणे बरोबर नाही.” अस्मिताला या जाचातुन सोडवणे ही आपली नैतिक जवाबदारी आहे असेच महादेव मानत होता. त्याने अस्मिताच्या मैत्रिणीला प्रतीक्षाला गाठले आणि तिच्याकडुन सगळी वस्तुस्थिती समजल्यावर तर तो थक्कच झाला. अस्मितासारखी सुज्ञ मुलगी त्या भामट्या आनंदला कशी काय भुलू शकते तेच त्याला कळेना? नक्कीच यामागे काहीतरी कारस्थान आहे आणि ते आपल्याला शोधुन काढावेच लागेल. काहीही करून यातुन अस्मिताला बाहेर काढायलाच पाहिजे असे त्याने ठरवले. पुढे अस्मिताने आपल्याला स्वीकारले तर उत्तम आणि नाही स्वीकारले तरी काही हरकत नाही पण तिच्या आयुष्यातुन तो नीच आणि हलकट आनंद दूर गेलाच पाहिजे, असा निश्चय करून महादेव आपल्या विचारांना कृतीत उतरविण्यासाठी कामाला लागला.

“ज्योतिषाने सांगीतलेल्या गोष्टीतील पहिली गोष्ट घडु पाहत होती हे वाचकांच्या लक्षात आले असेलच, आता महादेव काळे अस्मिताच्या आयुष्यात आल्यावर काय काय घडामोडी घडतात ते जाणुन घेणे इथे महत्वाचे ठरेल. पुढे वाचा.”