सप्तपदी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ ऑगस्ट २०१६

सप्तपदी - मराठी कथा | Saptapadi - Marathi Katha

अस्मिता नावाच्या एका विशीतील मुलीला आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या आनंद नावाच्या एका पुरुषाच्या प्रेमात पडण्याची मोजावी लागलेली किंमत, तिने जिवंतपणी भोगलेल्या नरकयातना, त्याच्या मृत्युनंतरही त्याने तिला दिलेला त्रास तिच्या वडिलांनी आणि तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या महादेवने तिला वाचवण्यासाठी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा याची खिळवुन ठेवणारी कहाणी म्हणजेच सप्तपदी...

मैत्रिणींसोबत हॉटेलमध्ये खाऊन झाल्यावर अस्मिताच्या लक्षात आले की आपण तर पर्स आणायलाच विसरलो आहोत. आता बिल कसे देणार? तिने मैत्रिणींना पैसे आहेत का? असे विचारताच त्यांनीही हात वर केले; त्या आता काय करायचे असा विचार करत असतानाच समोरच्या दुकानात काम करणाऱ्या आनंदने अस्मितासमोर पाचशे रुपयांची नोट धरली आणि म्हणाला, ‘‘हे घे पैसे.” अस्मिता त्याच्या तोंडाकडे पाहातच राहीली, तसा तिचा संभ्रम आणि संकोच लक्षात येऊन आनंद म्हणाला, “मी ऐकलय तुमचे बोलणे, पैसे आणायला विसरलीस ना? काही काळजी करू नकोस. मी आनंद शिवलकर, समोरच्याच दुकानात कामाला आहे. मी नेहमी पाहातो तुला हॉटेलमध्ये येतेस तेव्हा. हे पैसे घे आणि त्या हॉटेलवाल्याचे बिल देऊन टाक. उद्या येशील तेव्हा माझे पैसे मला परत कर. पैसे काय कुठे पळुन का जाणार आहेत?” क्षणभर विचार करून अस्मिताने ते पैसे घेतले. सवयीने तिने नोट खरी आहे का ते पाहण्यासाठी वर धरली आणि कसली तरी पांढरी पावडर तिच्या नाकातोंडात गेली आणि तिला ठसका लागला. त्यासरशी आनंदच्या डोळ्यांत एका वेगळीच चमक तरळुन गेली. ओठांना लागलेली पावडर अस्मिताने जीभेने चाटली पण तिची चव न कळल्यामुळे तिने आनंदला विचारले, “काय हो, कसली पावडर लागली होती नोटेला? “सॉरी हं! मगाशी मी गिऱ्हाईकाला एक किलो मैदा दिला होता, कदाचित पैसे घेताना थोडासा मैदा त्या नोटेवर सांडला असेल” असे आनंदने सांगितले. त्यावर अच्छा अच्छा असे म्हणुन तिने बिल चुकते केले. नाकावर सांडलेली पावडर रुमालाने पुसत अस्मिता म्हणाली, “मी अस्मिता कुलकर्णी, तुमचे आभार कसे मानावे तेच मला कळत नाही. आज वेळेवर तुम्ही मदत केली नसती तर माझी खुप मोठी पंचाईत झाली असती. खरंच खुप खुप आभारी आहे मी तुमची. उद्या तुमचे पैसे आठवणीने परत करते” असे बोलुन अस्मिता तिथुन निघाली. आनंद फक्त हसला. थोडे पुढे गेल्यावर वळणावर अस्मिताने मागे वळुन पाहिले तर आनंद अजुनही तिच्याकडेच पाहात होता. ती हलकेच हसली आणि पुढे निघुन गेली. बराच वेळ आनंद, अस्मिता गेलेल्या रस्त्याच्या दिशेने पाहात तिथेच उभा होता. “आनंद! गिऱ्हाईक बघायचे सोडुन कुठे उलथलास?” असे मालक कडाडताच आनंद भानावर आला व “आलो!” असे ओरडत दुकानात पळाला. अशी झाली अस्मिता आणि आनंदची पहिली भेट.