सप्तपदी भाग २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ सप्टेंबर २०१६

सप्तपदी भाग २ - मराठी कथा | Saptapadi Part 2 - Marathi Katha - Page 9

आनंदच्या मृत्यूच्या धक्क्यातुन अस्मिता आता कुठे सावरू लागली होती तोच पेपर मधील बातमीने तिला परत भुतकाळात ढकलले. “आनंद शिवलकर खुन खटल्यातील दोन कैद्यांची इतर दोन कैद्यांकडुन हत्या” लगेच जोडुन दुसरी बातमी होती, “साथीदारांचा खुन करून जेलमधुन फरार कैद्यांचे मृतदेह गावातील बंद घरात आढळले” त्या दोन्ही बातम्या आणि त्यातील मृतदेहांच्या अवस्थेचे वर्णन वाचुन तिच्या शरीरावर काटा आला. इतक्या निर्दयपणे कोणी खुन केले असतील असा विचार तिच्या मनात येतो न येतो तोच वामनराव तिच्या बेडरूम मध्ये आले. अस्मिताच्या हातातील पेपर पाहुन त्यांच्या कपाळावर आठ्या पसरल्या. तिच्या हातातील पेपर खेचुन घेत ते म्हणाले, “या असल्या बातम्या वाचणे बंद करा आणि अभ्यासात लक्ष्य द्या जरा! आम्ही तुला या सगळ्यातुन बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय आणि तु परत परत त्यातच गुंतुन पडते आहेस. आनंद मेलाय आणि त्याच्यासोबत तुझा भुतकाळही! ज्या माणसाने तुला फसवुन तुझा विश्वासघात केला, पैशासाठी अनन्वित छळ केला, मारझोड केली, उपाशी ठेवले, तुझ्या बापाचा अपमान केला आणि पैसेही उकळले अशा माणसासाठी तुझे मन अजुनही द्रवते याचे मला आश्चर्य वाटते. आजपासुन या घरात जर त्या हरामखोराचे नावच काय पण त्याचा साधा विचार जरी तुझ्या मनात आला तर माझ्यासारखा वाईट आणखी कोणी नसेल!” असे म्हणुन वामनराव पेपर घेऊन अस्मिताच्या रूममधुन बाहेर निघुन गेले. दरवाजाबाहेर वामनराव आणि दरवाज्याच्या आत अस्मिता, दोघांचेही डोळे भरले होते. अस्मिताच्या आईने वामनरावांना सावरले. अश्रुंनी डबडबलेल्या डोळ्यांनी ते आपल्या पत्नीला म्हणाले, “मला आपल्या अस्मिची काळजी वाटते गं! माझ्या इवल्याश्या पोरीच्या नशिबी एवढ्या कमी वयात हे कसले भोग त्या विधात्याने लिहुन ठेवले आहेत, ते त्याचे त्यालाच ठाऊक.” आणि ते हमसुन हमसुन रडू लागले. वामनराव अस्मिताविषयी फारच हळवे होते हे त्यांच्या पत्नी जाणत होत्या. त्यांचे सांत्वन करताना त्या म्हणाल्या, “तुम्ही नका काळजी करू. काळ हेच यावरचे औषध आहे. आपली अस्मि पुन्हा पहिल्यासारखी होईल पण त्यासाठी आपल्यालाच थोडा संय्यम बाळगला पाहिजे. ती खुश राहील असे वातावरण ठेवले पाहिजे म्हणजे ती पुन्हा पुन्हा तिच्या भुतकाळात नाही जाणार. सगळे काही व्यवस्थित होईल तुम्ही नका त्रास करून घेऊ. कळतंय ना मी काय म्हणतेय ते” यावर मान हलवुन वामनरावांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि आपले डोळे पुसत ते घराबाहेर पडले.

वामनराव अस्मिताच्या खोलीतुन निघुन गेले आणि थोड्याच वेळात अस्मिताच्या किंकाळीने त्यांचा बंगला दुमदुमला. अस्मिताची आई धावतच तिच्या रूममध्ये आली. पाहाते तर अस्मिता बेडवर उपडी पडली होती. तिचे केस तिच्या चेहऱ्यावर पसरले होते. ड्रेस फाटला होता आणि तिच्या नाजुक, गोऱ्या, उघड्या पाठीवर उभे आडवे वळ उठले होते व त्यातुन रक्त वाहत होते. जणु काही कुणी तरी तिच्या पाठीवर चाबकाने जबरदस्त फटके दिले होते. वेदनेने ती बिचारी विव्हळत होती. अस्मिताच्या आईने तिला जवळ घेतले व काळजीने तिला विचारू लागल्या, “काय झाले अस्मि? तुझ्या पाठीवर हे वळ कसे उठले? कोणी मारले तुला?” “आई! तो परत आलाय!” अस्मिता रडत म्हणाली. "कोण परत आलाय? काय बोलतेस तु?" तिच्या आईला काहीच कळेना. आनंद परत आलाय असे अस्मिताने म्हणताच तिच्या आईच्या काळजाचा ठोकाच चुकला. "मला नीट सांग, आनंद परत आलाय म्हणजे काय? त्याचा तर खुन झाला ना? मग तो परत कसा येईल?" अस्मिताची आई पुरती घाबरली होती. "आई तो मेलाय पण त्याचा आत्मा अजुन माझ्या अवती भवती वावरतोय. तो मला त्याच्यासोबत घेऊन जाणार आहे आणि त्याने मला धमकी दिली आहे की मी जर का इतर कोणाचा विचारही केला तर तो माझा खुप छळ करेल. आत्ता बाबा बाहेर गेल्यावर मी रडत बसले होते तेव्हा अचानक रूम मधली हवा जड झाली, वातावरण अंधारून आले. मला थंडी भरून आली म्हणुन मी पांघरूण अंगावर ओढून घेतले तर कोणी तरी खसकन अंगावरून ओढून फेकावे तसे ते फेकले गेले आणि मला आनंदचा आवाज ऐकू आला. तो म्हणाला, "तुला वाटत असेल की वशीकरण नाहीसे झाल्यावर आणि माझा खुन झाल्यामुळे तुझी माझ्यापासुन सुटका झाली म्हणुन! पण तुला माझ्यापासुन फक्त एकच जण वाचवु शकतो तो म्हणजे फक्त मी. तुझा बाप माझे काहीच बिघडवु शकत नाही. मला मारणाऱ्यांचा बदला तर मी घेतला आत्ता तुझ्या बापाची पाळी आहे. तुला माझ्यापासुन घेऊन जातो काय? आत्ता बघतोच मी तो माझे काय वाकडे करतो ते!" असे म्हणुन त्याने मला मारण्यास सुरवात केली. त्याने मला खुप मारले. तो मला कधीच सोडणार नाही. माझी यातुन सुटका होणे अशक्य आहे. मी कोणाचे काय बिघडवले म्हणुन मला हे भोगावे लागतंय? मला वाचव आई!" असे म्हणुन अस्मिता मोठमोठ्याने रडु लागली. अस्मिताच्या आईला काहीच समजेना की काय बोलावे आणि काय करावे. आपल्या मुलीच्या काळजीने ती अर्धी झाली होती. शेवटी तिने अस्मिताच्या जखमांवर हळद लावली आणि वामनरावांना फोन लावला.

“अस्मिताच्या आईकडुन सगळा प्रकार कळल्यावर वामनराव नखशिखांत हादरतात. आगीतुन फुफाट्यात सापडल्यासारखी त्यांची अवस्था झाली. आनंद जीवंत असताना आपली ओळख आणि समाजातील स्थान याच्या बळावर ते त्याचा बंदोबस्त करू शकले असते पण इथे तर त्याच्या आत्म्याशी गाठ होती. आत्ता वामनराव काय शक्कल लढवतात? आनंदच्या आत्म्यापासुन ते अस्मिताचे रक्षण करू शकतात की त्यांचा स्वतःचा जीव धोक्यात येतो हे जाणण्यासाठी पुढे वाचा.”