सप्तपदी भाग २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ सप्टेंबर २०१६

सप्तपदी भाग २ - मराठी कथा | Saptapadi Part 2 - Marathi Katha - Page 8

रात्रीचे दोन वाजले असतील, सावध झोप असलेल्या इक्बालच्या कानांनी जमीनीवर काहीतरी घसपटत चालल्याचा आवाज टिपला होता. त्याचबरोबर एखादी लोखंडी वस्तु फरशींवरून घासत नेल्यासारखाही आवाज येत होता. ज्या कशाचा तो आवाज येत होता ते त्याच्या भोवती फिरत असल्याचे त्याला जाणवले. डोळे किलकिले करून त्याने आजुबाजुला पहिले पण त्याला कोणीच दिसले नाही. त्याने सलीमला ढोसळले तसा तोही सावध झाला. काहीतरी घासपटत आपल्याभोवती गोल चक्कर मारतंय असे त्याने दबक्या आवाजात सलीमला सांगितले. सलीमच्या कानांनी पण तो आवाज ऐकला. खिडकीच्या दिशेने जाण्यासाठी त्यांनी गादीवरून जमीनीवर पाय टाकला आणि दोघेही कशावरून तरी सरकुन खाली पडले. दोघांनाही चांगलाच मार लागला होता पण आवाज न करता कसेतरी खिडकीपाशी जाऊन त्यांनी बाहेर सावध नजर टाकली आणि काही दिसतंय का ते पहिले त्याचवेळी तो आवाज त्यांच्या मागे येऊन थांबला. आपल्या मागे काहीतरी आहे याची जाणीव त्या दोघांनाही झाली. त्यांच्या मानेवरचे केस ताठ झाले. हळू हळू सावधपणे ते मागे वळले आणि अंधारात डोळे ताणुन पाहण्याचा प्रयत्न करू लागले. एव्हाना अंधाराला त्यांचे डोळे सरावल्यामुळे आपल्या समोर जमीनीवर काहीतरी पडलेले असल्याचे त्यांना अंधुकसे दिसले. त्यांची नजर जमीनीकडे रोखली गेल्यावर ते जे काही जमीनीवर पडले होते त्यात आता हालचाल होऊ लागली. खुरडत खुरडत ते त्यांच्या दिशेने पुढे सरकु लागले. पुन्हा तोच घासपटल्याचा आणि लोखंडी वस्तु जमीनीवर घासत गेल्यासारखा आवाज येऊ लागला. त्याबरोबर प्रतिक्षिप्त क्रियेने ते दोघे दोन पावले मागे सरकले. त्यांच्या पायाच्या तळव्यांना कसला तरी चिकट आणि गरम स्पर्श जाणवला. इक्बालने लाईटचे बटन शोधण्यासाठी भिंत चाचपडायला सुरवात केली. थोड्याशा प्रयत्नातच त्याला भिंतीवर एक बटन सापडले. त्याने बटन दाबले आणि ती रूम प्रकाशाने उजळली. दोघांनी जमीनीवर काय घासपटत होते ते पाहण्यासाठी आपली नजर पुऱ्या रूममध्ये फिरवली पण त्यांना काहीच आढळले नाही. इतक्यात सलीमचा पाय घसरून तो खाली पडला आणि त्यांचे लक्ष जमीनीकडे गेले. जमीनीवर गरम रक्ताचे थारोळे साचले होते आणि सलीम त्यात पुरा बरबटला होता. इक्बालही त्या रक्ताच्या थारोळ्यातच उभा होता. ते पाहुन दोघेही घाबरले. रूममध्ये अचानक एवढे रक्त कुठून आले हेच त्यांना समजेना. ते ज्या गाद्यांवर झोपले होते त्यांच्या सभोवतीही रक्ताचे मंडल बनले होते. मगाशी त्याच्यावरूनच ते घसरून पडले होते. हा प्रकार काही साधा सुधा नाही हे त्यांच्या लक्षात आले.

अंगाला लागलेले रक्त साफ करून इथुन लगेच निघावे असे ठरवुन ते गडबडीने बाथरूमकडे गेले. इक्बाल जास्त बरबटला नसल्यामुळे त्याने फक्त हात पाय धुतले व कपडे बदलण्यासाठी तो बाथरूमच्या बाहेर आला व सलीम बाथरूममध्ये शिरला. भितीने त्याने बाथरूमचा दरवाजा उघडाच ठेवला. गर्मीमुळे सलीमने थंड पाण्याचा शॉवर सुरु केला आणि आपले अंग चोळु लागला. इक्बाल कपडे बदलत असतानाच त्याला सलीमचे वेदनेने किंचाळणे ऐकु आले. तो धावतच बाथरूमकडे गेला. दरवाजा उघडुन त्याने आत पहिले तर त्याच्या अंगावर एकदम खुप सारी गरम वाफ आली. पुर्ण बाथरूम त्या वाफेने भरले होते आणि सलीम मात्र कुठेच दिसत नव्हता फक्त त्याचा विव्हळण्याचा आवाज ऐकु येत होता. बाथरूममध्ये आत गेल्यावर जमीनीवर एका कोपऱ्यात अस्ताव्यस्त पडलेला सलीम इक्बालला दिसला. "अरे क्या हुवा तुझे?" म्हणत इक्बाल सलीमला उठवायचा प्रयत्न करू लागला तसा सलीम त्याच्या हातातुन निसटुन खाली पडला आणि प्राणांतिक वेदनेने या अल्लाह! असे किंचाळला. इक्बालचे लक्ष स्वतःच्या हातांकडे गेले, सलीमची त्वचा त्याच्या हातावर चिकटली होती. उकळत्या पाण्यात बुडवून काढल्यासारखी सलीमची अवस्था झाली होती. “अरे तुने इतना उबलता हुवा पाणी अपने बदन पे क्यु डाला? तेरी तो खाल ही निकल गयी” असे म्हणुन इक्बाल सलीमवर थंड पाणी टाकु लागला. वेदना थोड्या कमी झाल्यावर सलीम कण्हत म्हणाला, “मैंने तो थंडा पानीही बदन पर लिया था। अचानक उबला हुवा पानी शॉवरसे बरसने लगा और मेरी ये हालत हो गयी। जैसेही गरम पानी आना शुरु हुवा मैंने शॉवर बंद करने की बहोत कोशीश की पर नल जैसे जॅम हो गया था। मैं बचने के लिये कोनोमें भी गया पर शॉवर अपने आप मेरी तरफ मुडता गया और उबले हुवे आलु जैसी मेरी खाल निकल गयी, बहोत दर्द हो रहा है यारऽऽऽ” असे म्हणत सलीम हळू हळू इक्बालच्या मदतीने बाथरूमच्या बाहेर आला.

असे कसे होऊ शकते? याचा विचार करत असतानाच इक्बालची नजर समोर रोखली गेली, त्याचे शरीर थरथरू लागले, घशाला कोरड पडली आणि त्याचा आ वासाला गेला. तो पुतळ्यासारखा जागीच थबकला. तो का थांबला म्हणुन सलीमने तो पाहत असलेल्या दिशेने पहिले आणि त्याचीही अवस्था इक्बाल सारखीच झाली. समोर आनंदचे दगडाने डोके ठेचलेले प्रेत पडले होते. त्यातुन वाहणारे रक्त संपुर्ण रूममध्ये पसरले होते. त्या दोघांची नजर त्या प्रेतावर खिळली होती आणि अचानक त्या प्रेतामध्ये हालचाल होऊ लागली. ते प्रेत खुरडत त्यांच्या दिशेने पुढे सरकु लागले आणि त्याच्या गळ्यात घुसलेला रामपुरी चाकु जमीनीवर घासला जाऊ लागला. ते पाहुन दोघेही मागे मागे सरकु लागले. अचानक ते प्रेत हवेत उसळले आणि त्यांच्यासमोर उभे राहिले. काही कळायच्या आतच त्या प्रेताने स्वतःच्या गळ्यात घुसलेला रामपुरी काढला आणि सलीमच्या गळ्यात घुसवला. त्याबरोबर सलीमच्या गळ्यातुन रक्ताच्या चिळकांड्या उडु लागल्या. उकळत्या पाण्याने भाजलेल्या सलीमसाठी तो हल्ला जीवघेणा ठरला. आपला प्राण सोडत तो जमिनीवर कोसळला त्याला तिथेच सोडुन इक्बाल दरवाजाकडे पळाला. पण दरवाजाला बाहेरून कुलुप असल्याचे लक्षात येताच तो खिडकीच्या दिशेने वळला. पाठीमागुन आपल्या मानेत काही तरी धार धार घुसल्याचे त्याला जाणवले आणि पुढच्याच क्षणाला त्याचा कंठ चिरत रामपुरीचे पाते त्याच्या गळ्यातुन बाहेर आले. जमीनीवर सांडलेल्या स्वतःच्याच रक्तावरून त्याचा पाय सरकला आणि तो खिडकीसकट घराच्या बाहेर फेकला गेला. डोक्यावर पडल्यामुळे त्याचे डोके फुटले व मानेचे मणके तुटले. मानेत घुसलेल्या रामपुरीच्या पात्याने त्याचे शीर अलगद धडावेगळे केले. इक्बालच्या सताड उघड्या पडलेल्या डोळ्यात मुर्तिमंत भीती दाटली होती. आपल्या खुनाचा बदला आनंदच्या आत्म्याने सलीम आणि इक्बालला भयानक मृत्यू देऊन घेतला आणि त्याच्या अमंगळ भेसुर अश्या सैतानी हास्याने ते निर्जीव घरही शहारले.

“म्हणजे आनंद, आपल्या मारेकऱ्यांचा बदला घेण्यासाठी परत आला होता तर! पक्या आणि उमेशला सलीम आणि इक्बालने संपवले. त्या दोघांना आनंदच्या आत्म्याने संपवले. खेळ खल्लास! पर पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! वामनराव कुलकर्णी आनंदच्या हिट लिस्टवर होते हे आपल्याला विसरून चालणार नाही. आता आनंदचा आत्मा अजुन काय काय गोंधळ घालतो ते पुढे वाचा.”