सप्तपदी भाग २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ सप्टेंबर २०१६

सप्तपदी भाग २ - मराठी कथा | Saptapadi Part 2 - Marathi Katha - Page 7

माफीचे साक्षीदार झाल्यामुळे पक्या आणि उमेशवर सलीम आणि इक्बालचा रोष होता. बदल्याच्या भावनेने पेटलेले सलीम आणि इक्बाल आतल्या आत धुमसत होते. “साले दगाबाज! पकडे जाने पर दोस्ती भुल गये! खुदको तो बचा लिया और कानुन के हाथो हमारी कुर्बानी चढा गये!” सलीम रागाने फुरफुरत होता. पक्या आणि उमेश दोघेही बेसावध होते. चमच्याच्या दांड्यांना घासुन टोकदार बनवुन त्यांनी जेलमध्ये त्या दोघांवर जीवघेणा हल्ला केला. कोणाला काही कळायच्या आतच सलीम आणि इक्बालने अस्तनीत लपवलेले टोकदार चमचे सपासप पक्या आणि उमेशचा गळ्यात घुसवले. सात आठ वेळा वार झाल्यामुळे पक्या आणि उमेशचा गळ्यातुन रक्ताच्या चिळकांड्या उडु लागल्या. त्यांनी घातलेले कैद्यांचे युनिफॉर्म त्यांच्याच रक्ताने लाल झाले. पुढच्याच क्षणाला ते दोघे आपापला गळा दोन्ही हातांनी दाबुन धरत खाली कोसळले आणि त्यांनी प्राण सोडला. सुरक्षा रक्षक तिथे पोहोचायच्या आत सलीम आणि इक्बाल तिथुन गायब झाले होते. जेलमध्ये नेहेमीचे येणे जाणे असल्यामुळे त्यांनी आधीच फिल्डिंग लावली होती. काही अधिकाऱ्यांशी त्यांचे लागेबांधे होते. अंधाराचा फायदा घेऊन सांडपाणी वाहुन नेणाऱ्या वाहिन्यांमधुन ते दोघे जेलमधुन सुखरूप बाहेर पडले. पक्या आणि उमेशचा खुन करून सलीम व इक्बाल पळाल्यामुळे जेलमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यांना शोधण्यासाठी जेलरने जंग जंग पछाडले पण त्याच्याच माणसांच्या मदतीमुळे सलीम आणि इक्बाल सारखे अट्टल गुन्हेगार त्याच्या जेलमध्ये खुन करून त्याच्याच हातावर तुरी देऊन फरार झाले होते. जेलमधुन कैदी फरार होणे ही कोणत्याही जेलरसाठी अत्यंत लाजीरवाणी गोष्ट असते. जेलरच्या साम्राज्यात (जेलमध्ये) ही घटना घडल्यामुळे कोणीतरी भर रस्त्यात आपले कपडे उतरवल्यासारखेच त्या जेलरला वाटत होते. त्याने चवताळुन सलीम आणि इक्बालला शोधण्यासाठी शोधपथके सगळीकडे रवाना केली.

जेलमधुन बाहेर पडल्यावर सलीम आणि इक्बाल मुख्य रस्ता सोडुन गावाच्या दिशेने पळत होते. त्यांना लवकरात लवकर जेलपासुन दूर जायचे होते. एकदा का ते गाव पार करून जंगलात घुसले की मग ते कोणाच्याही हाती लागु शकत नव्हते. दोघांच्या अंगावर जेलचे कपडे होते आणि अंगाला दुर्गंधीही येत होती. ते बऱ्यापैकी दूर आले होते आणि पळुन पळुन त्यांना धापही लागली होती. विश्रांतीसाठी ते एका घराच्या आडोशाला थांबले. खिडकीतुन त्यांनी आत डोकावून पहिले तर घर रिकामे होते. मालक कदाचित कुठे बाहेरगावी गेला असावा. पण हे त्यांच्या पथ्थ्यावर पडले. त्या रात्रीपुरते लपण्यासाठी त्यांनी त्या घराची निवड केली. घराभोवती चक्कर मारून आत शिरण्याचा सोपा रस्ता कुठून आहे याचा त्यांनी शोध घेतला. दरवाजा आणि कडीकोयंडा भक्कम होता आणि त्यांच्याकडे कोणतेच हत्यार नसल्यामुळे दरवाजातुन आत शिरणे अशक्य होते. त्यामुळे खिडकीवाटे आत शिरणे जास्त सोयीचे आहे हे त्यांच्या लक्षात आले. खिडकीची कडी उचकटुन त्या दोघांनी घरात प्रवेश केला. घरात शिरल्यावर सर्वप्रथम त्यांनी खिडकी लावली आणि शांतपणे बाहेरचा कानोसा घेतला. शिपायांचा किंवा इतर कोणाचाही आवाज येत नसल्याची खात्री केली आणि घरात कुठे काय आहे याचा अंदाज घेतला. मग त्यांनी आपले कपडे काढुन आंघोळ केली आणि कपाटात ठेवलेले घराच्या मालकाचे कपडे घातले. पहाटे घरातील चिज वस्तुंसकट जंगलाच्या दिशेने पोबारा करायचा प्लॅन त्यांनी आखला. या सगळ्यात बराच वेळ गेला होता त्यामुळे त्यांच्या पोटात भुकेचा डोंब उसळला होता. घरात जे काही खायला मिळाले त्याचा फडशा पाडुन ते झोपी गेले.

“माफीचे साक्षीदार होणे पक्या आणि उमेशच्या चांगलेच अंगलट आले. ज्यांच्यासोबत आजपर्यंत त्यांनी गुन्हे केले होते, लोकांना लुबाडून मिळवलेले पैसे उधळले होते त्या त्यांच्या साथीदारांनीच त्यांना यमसदनी पाठवले होते. इतरांचे वाईट करणाऱ्याचे कधीच चांगले होत नाही हेच खरे. पण मग सलीम आणि इक्बाल कसे काय मोकळे सुटले? त्यांना शिक्षा मिळणार की नाही? कोण देणार त्यांना शिक्षा? हे जाणुन घेण्यासाठी पुढे वाचा.”