सप्तपदी भाग २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ सप्टेंबर २०१६

सप्तपदी भाग २ - मराठी कथा | Saptapadi Part 2 - Marathi Katha - Page 6

आकाशने आनंदच्या छिन्न विच्छिन्न देहाला भडाग्नी दिला खरा पण त्याचा आणि शिवलकर कुटुंबीयांचा आत्मा आतल्या आत सुडाग्नीत जळत होता. आनंदच्या देहाची राख, त्याच्या मृत्यूचा बदला घेईपर्यंत विसर्जित करणार नाही असा आकाशने प्रण केला. त्याने त्या राखेचा कलश घरामध्येच दडवुन ठेवला. वामनरावांचा बदला घेण्यासाठी तो योग्य संधीची वाट पाहत होता. एका रात्री घरातील सगळे झोपले असताना किचनमध्ये भांडे पडल्याचा आवाज आल्यामुळे आकाशच्या आईची झोपमोड झाली. आधी तिने मांजर असेल असे समजुन दुर्लक्ष केले पण जेव्हा एका पाठोपाठ धडाधड भांडी पडु लागली तशी ती उठली आणि नक्की काय झाले ते बघण्यासाठी किचनमध्ये जाऊन तिने लाईट लावला आणि तिचा श्वास तिच्या गळ्यातच अडकला. तिने आकाशला हाक मारायचा प्रयत्न केला पण तिच्या तोंडुन आवाजच फुटेना. भीतीने तिची बोबडी वळली होती. "कोण आहे गं आई?" आकाशने पडल्या पडल्याच विचारले. आपल्या आईकडुन उत्तर येत नाही हे पाहुन आकाश किचनकडे गेला. एका जागेवर थिजलेली त्याची आई त्याला दिसली. काहीतरी भयानक पहिल्यासारखी भितीने ती थरथरत होती. जवळ जाऊन त्याने तिला हात लावला पण तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तिची विस्फारलेली नजर समोर रोखली होती. तोंड उघडे पडले होते. आकाशने तिच्या नजरेच्या रोखाने पहिले तिथे काहीच नव्हते.

“आई तु एवढी घाबरलेली का दिसतेस?” असे म्हणत आकाशने आईच्या दिशेने पहिले तर ती जागेवर नव्हती. तो हळू हळू मागे सरकु लागला आणि कशाला तरी अडकुन धडपडला. तो कशामुळे धडपडला हे पाहण्यासाठी खाली झुकला तर त्याची आई जमीनीवर पडली होती जी केव्हाच बेशुद्ध झाली होती. इतक्यात त्याच्या खांद्यावर पाठीमागुन एक हात पडला आणि तो कमालीचा घाबरला. त्याने सावकाश वळुन बघितले तर मागे सुमन उभी होती. “काय सुमन! केवढा घाबरलो मी? अशी न सांगता मागे येऊन थांबत जाऊ नको म्हणुन तुला हजार वेळा सांगीतलय पण तुझ्या मडक्यात काही शिरतच नाही.” तो सुमन वर डाफरू लागला. त्याला आई बेशुद्ध पडली आहे याचा क्षणभर विसर पडला होता “आईंना काय झाले?” या तिच्या प्रश्नाने तो भानावर आला. त्याची नजर आपल्या आईकडे गेली. “माहित नाही पण कशाला तरी घाबरली आणि बेशुद्ध पडली.” असे म्हणत त्याने सुमनकडे बघितले तर तिही जमीनीवर बेशुद्ध होऊन पडली होती. त्याला कळेना या दोघींना झाले तरी काय? तेवढ्यात त्याच्या खांद्यावर पाठीमागुन एक हात पडला, आता कोण? म्हणुन त्याने मागे वळुन पहिले आणि मोठ्याने किंचाळुन तोही बेशुद्ध पडला. त्याच्या समोर डोक्याचा पार चेंदा मेंदा झालेल्या अवस्थेत आनंदचे प्रेत उभे होते. बऱ्याच वेळाने जेव्हा त्या तिघांना जाग आली तेव्हा सकाळ झाली होती. आपल्याला भास झाला की आनंद खरेच आला होता हा प्रश्न त्यांना पडला. किचन मध्ये पसरलेल्या भांड्यानी मात्र त्यांची खात्री पटली की तो भास नक्कीच नव्हता. आनंदच्या प्रेताची आठवण झाल्यावर त्या तिघांच्याही मणक्यातुन भीतीची थंड शिरशिरी उठली.

“रात्री किचन मधुन आलेल्या आवाजाने जागे झालेले शिवलकर कुटुंबिय आनंदचे भयानक रूप पाहुन बेशुद्ध होऊन पडतात. सकाळी जाग आल्यावर, तो खरंच परत आलाय का? असा प्रश्न त्यांना पडतो. पण त्या चारही गुंडांचे काय होते? त्यांना कोर्टाने सुनावलेली शिक्षा होते का? की नियतीने त्यांच्यासाठी काही वेगळे ठरवले होते? हे जाणुन घेण्यासाठी पुढे वाचा.”