सप्तपदी भाग २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ सप्टेंबर २०१६

सप्तपदी भाग २ - मराठी कथा | Saptapadi Part 2 - Marathi Katha - Page 5

इन्स्पेक्टर मानेंनी अस्मिताला जबानीसाठी पोलिस स्टेशनला बोलावुन घेतले. पोलिस स्टेशनला आल्यावर अस्मिताने आनंदशी झालेली पहिली भेट, पळुन जाऊन त्याच्याशी देवळात केलेले लग्न, त्यानंतर त्याने तिचा केलेला छळ, वामनरावांनी आनंदच्या घरी येऊन त्याला दिलेले पैसे, नंतर तिला डॉक्टरला दाखवण्याचे कारण सांगुन त्यांचे आपल्या घरी घेऊन जाणे, तिथे महादेवने येऊन तिला तांत्रिकाने दिलेले फुल हुंगवणे आणि मंत्र म्हणणे, नंतर ती बेशुद्ध होणे, शुद्धीत आल्यावर तिला सर्व वस्तुस्थिती कळणे आणि दुसऱ्या दिवशी आनंदच्या खुनाची बातमी तिने पेपरात वाचणे इथपर्यंत सर्व काही मुसमुसत सांगुन टाकले. महादेव, वामनराव आणि तांत्रिक या तिघांव्यतिरिक्त अस्मिताचीही जबानी ऐकल्यावर इन्स्पेक्टर मानेंची खात्री पटली की आनंदच्या खुनात या चौघांपैकी कुणाचाही हात नाही. आता फक्त ते चार गुंड सापडणे बाकी राहिले होते मग या खुनामागचे रहस्य उलगडणार होते. इन्स्पेक्टर माने नव्या जोमाने कामाला लागले. नाकाबंदी केली गेली. गाड्यांची तपासणी होऊ लागली. संशयितांची चौकशी केली जाऊ लागली. यात जवळ जवळ सात दिवस गेले आणि एके दिवशी संध्याकाळी खबऱ्यांनी टीप दिली. भुताटकीच्या अफवेमुळे मोकळ्या असलेल्या, शहराबाहेरच्या एका जुन्या वाड्यात ते चौघे लपुन बसल्याची खबर मिळायचा अवकाश इन्स्पेक्टर मानेंनी ज्यादा कुमक मागवली. मध्यरात्री त्यांनी वीस शस्त्र सज्ज पोलिस सोबत घेऊन त्या वाड्याला वेढा दिला. आपण घेरले गेल्याचे कळताच आधी त्या गुंडानी प्रतिकार केला पण पोलिसांच्या पथकापुढे त्यांना शरण यावेच लागले. त्यांच्या मुसक्या आवळुन इन्स्पेक्टर माने विजयी मुद्रेने परतले.

लॉकअप मध्ये थर्ड डिग्री दाखवल्यावर चारही गुंड पोपटासारखे बोलु लागले. आपण केवळ आनंदकडील पैसे घेऊन पळणार होतो पण त्याने प्रतिकार केल्यामुळे नाईलाजाने त्याला मारावे लागले हे त्यांनी काबुल केले. आपल्याला कोणीही सुपारी दिली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्याकडुन जो चाकु आनंदच्या छातीत आणि गळ्यात घुसवला गेला होता तोही जप्त केला गेला. कोर्टात केस उभी राहिली तेव्हा पक्या आणि उमेश माफीचे साक्षीदार झाले आणि पैशाच्या लोभाने त्या चौघांनी आनंदचा खुन केल्याचे मान्य केले. आनंदच्या डोक्यात दगड घालणाऱ्या सलीमला मुख्य आरोपी ठरवले गेले व फाशीची शिक्षा सुनावली गेली. इक्बालने आनंदच्या छातीत आणि गळ्यात रामपुरी चाकु खुपसला होता, खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवत त्याला आजन्म सक्त मजुरीची शिक्षा सुनावली गेली. पक्या आणि उमेशला गुन्ह्यात सहभाग असल्याबद्दल पाच वर्षांची शिक्षा झाली. पण माफीचे साक्षीदार बनल्यामुळे ती कमी होऊन त्यांना नाम मात्र शिक्षा झाली. आनंदचा त्रास अनपेक्षितरित्या दूर झाला आणि त्याचे खुनी पकडले गेल्यामुळे महादेव, वामनराव आणि अस्मिताच्या डोक्यावरची टांगती तलवार दूर झाली. पोलिसांची कटकटही शांत झाली होती. पण वामनरावांचा सुड घेण्यासाठी व्याकुळ झालेला आकाश आणि त्याचे कुटुंबीय मात्र आतल्या आत धगधगत होते.

“महादेव आणि वामनरावांविरुद्ध पुरावे न मिळाल्यामुळे निराश झालेल्या इन्स्पेक्टर मान्यांनी खबऱ्यांमुळे आनंदच्या खऱ्या खुन्यांना मोठ्या शिताफीने पकडले. आनंदचे खरे खुनी पकडले गेल्यावर वामनरावांच्या कुटुंबाला त्रास देण्याचे मनसुबे उध्वस्त झाल्यामुळे शिवलकर कुटुंबीय निराश झाले होते. आणि अचानक काही तरी अनपेक्षित घडते कोणीतरी परत येते, ते कोण आणि ते आल्यावर काय काय गोष्टी घडतात ते पुढे वाचा.”