सप्तपदी भाग २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ सप्टेंबर २०१६

सप्तपदी भाग २ - मराठी कथा | Saptapadi Part 2 - Marathi Katha - Page 4

सकाळी ठीक ९ वाजता वामनरावांच्या चौकशीचे आदेश घेऊन इन्स्पेक्टर माने त्यांच्या घरी पोहोचले. त्यांचे सवाल जबाब त्यांच्याच शब्दात.

इन्स्पेक्टर माने: आपण मयत आनंद शिवलकर यांना ओळखता?
वामनराव: हो. दुर्दैवाने तो माझ्या मुलीचा नवरा होता.
इन्स्पेक्टर माने: आपणाला आनंद आणि आपल्या मुलीच्या प्रेमाबद्दल त्यांच्या लग्नाआधीपासुन माहिती होती?
वामनराव: हो.
इन्स्पेक्टर माने: मग त्यावर आपली प्रतिक्रिया काय होती?
वामनराव: मला ते अजिबात आवडले नव्हते. कारण तो कोणत्याच बाजुने माझ्या मुलीच्या लायक नव्हता. त्याने माझ्या मुलीला आपल्या जाळ्यात ओढले होते. प्रेमाला माझा विरोध नाही पण माझा जावई सुशिक्षित, सुसंस्कृत, सभ्य, स्वबळावर स्वतःच्या पायावर उभा असलेला आणि माझ्या मुलीच्या योग्यतेचा हवा अशी माझी माफक अपेक्षा होती.
इन्स्पेक्टर माने: आपल्याविरोधात जाऊन जेव्हा आपल्या मुलीने आनंदशी लग्न केले तेव्हा आपल्याला कसे वाटले?
वामनराव: स्वतःच्या हाताने जेव्हा एखादी मुलगी आपल्या आयुष्याचे वाटोळे करून घेते तेव्हा तिच्या बापाला जसे वाटेल तसेच वाटले होते.
इन्स्पेक्टर माने: आपण आनंदला ठार मारण्याची धमकी दिली होती काय?
वामनराव: नाही. उलट जर माझी मुलगी जीवंत राहावी असे वाटत असेल, तर तो मागेल तेव्हा आणि मागेल तितके पैसे मी त्याला देत राहण्यास त्यानेच मला धमकावले होते.
इन्स्पेक्टर माने: तुम्ही आत्तापर्यंत आनंदला किती पैसे दिलेत?
वामनराव: आनंदला पाच लाख आणि त्याच्या आईला एक लाख असे एकुन सहा लाख रुपये दिले.
इन्स्पेक्टर माने: तुम्ही रागातुन आनंदचा खुन करण्यासाठी सुपारी दिलीत का?
वामनराव: नाही. पण ज्या कोणी त्याला मारले त्याला मी धन्यवादच देईन. त्याच्यामुळेच माझ्या मुलीची त्या नराधमाकडुन सुटका झाली.
इन्स्पेक्टर माने: तुम्हाला आनंदच्या मृत्यूबाबत कधी समजले?
वामनराव: तो मेल्याचे पेपर मध्ये वाचले तेव्हा.
इन्स्पेक्टर माने: ठीक आहे. तुर्तास तरी माझे प्रश्न संपले आहेत. गरज पडली तर मी तुमच्याशी पुन्हा संपर्क साधेन. तसदीबद्दल माफ करा पण चौकशी करणे हा आमच्या कामाचा भाग आहे.
वामनराव: काही हरकत नाही. तुम्हाला जी मदत लागेल ती मी अवश्य करेन.

वामनरावांची जबानी घेतल्यावर इन्स्पेक्टर माने विचारात बुडाले. महादेव आणि वामनरावांनी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शांतपणे आणि न चाचरता दिले होते. ते खरे बोलत होते यात शंका नव्हती. पण त्यांचा या खुनाशी खरंच काही संबंध होता की ते फक्त ओघाने त्याच्याशी जोडले गेले होते यावर इन्स्पेक्टर माने आणि सब इन्स्पेक्टर जाधवांचे एकमत होत नव्हते. वामनरावांनी आनंदला एकुण सहा लाख रुपये दिले होते त्यामुळे त्याच्याकडे अचानक आलेल्या पैशांमागचे रहस्य उलगडले. मग केवळ त्या पैशांसाठीच त्याचा खुन झाला असावा का? कारण महादेव किंवा वामनरावांचा आनंदच्या खुनामध्ये काही सहभाग असावा याला अजुनही त्यांच्याकडे भक्कम पुरावा नव्हता. त्यासाठी ते गुंड पकडले जाणे गरजेचे होते. महादेवप्रमाणे वामनरावांकडुनही संपुर्ण घटनाक्रम जाणुन घेण्याचे माने साहेबांनी ठरवले. त्यांनी वामनरावांशी फोनवर संपर्क केला आणि त्यांना पोलिस स्टेशनला येण्याची विनंती केली. वामनरावांनी अस्मिता व आनंदचे प्रेम प्रकरण कळल्यापासुन ते तांत्रिकाच्या मदतीने अस्मिताची आनंदच्या वशीकरणातुन मुक्तता करेपर्यंतची सगळी माहिती इन्स्पेक्टर मानेंना सांगितली. महादेव व वामनराव दोघांच्याही बोलण्यात एकवाक्यता आहे हे इन्स्पेक्टर मानेंनी ओळखले. दोघांच्या बोलण्यात तांत्रिकाचा उल्लेख आल्यामुळे इन्स्पेक्टर मानेंचे लक्ष तांत्रिकाकडे वेधणे स्वाभाविक होते पण त्याने फक्त अस्मिताला वश करण्यासाठी आनंदला मदत केली होती. खुनाशी त्याच्या प्रत्यक्ष संबंध कुठेच येत नव्हता. तरीही काही माहिती मिळते का ते पाहावे असा विचार करून नंतर अस्मिताचीही जबानी घेण्याचे त्यांनी मनोमन ठरवले.

महादेव कडून इन्स्पेक्टर मानेंनी त्या तंत्रिकांचा पत्ता घेतला आणि त्याच्या झोपडीपाशी येऊन धडकले. तांत्रिक त्यावेळी आपल्या साधनेत ध्यानमग्न होता. आधी इन्स्पेक्टर मानेंना वाटले की जाऊन त्या तांत्रिकाची गचांडी धरीन आणि त्याला पोपटासारखा बोलता करेन, पण तांत्रिकाच्या चेहेऱ्यावरचे तेज आणि झळकत असलेली सात्विकता पाहुन नकळत त्यांनी तांत्रिकाचे ध्यान संपेपर्यंत झोपडी बाहेरच थांबायचे ठरवले. पण तेवढ्यात तांत्रिकाने डोळे उघडले आणि म्हणाला, "या इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही येणार याची मला खात्री होतीच. बोला मी आपली काय सेवा करू शकतो?" "अस्मिताला वश करण्यासाठी आनंदला तुम्हीच मदत केली होती ना? आता त्या आनंदचाच खुन झालाय. मी त्याबाबतीत तुमच्याकडे चौकशीसाठी आलो होतो. तुम्हाला या बाबतीत काय काय माहीत आहे?" इन्स्पेक्टर मानेंनी आवाजात जरब आणत विचारले. "मी आनंदच्या दिखाव्याला खरे प्रेम समजुन त्या मुलीचे मन वश करण्यासाठी त्याची मदत केली एवढेच. तसेही मी नियतीच्या कार्यात ढवळाढवळ होऊ नये म्हणुन माणसांपासुन दूर राहून आपल्या साधनेत मग्न असतो पण ती नियतीच होती त्यामुळे माझ्याकडून आनंदला मदत केली गेली. अन्यथा एवढी मोठी चुक घडली नसती. त्या मुलीचा मी अपराधी आहे." तांत्रिक म्हणाला. "हो का? मग आता खुन कोणी केला हे ही नियतीला विचारून सांगायची कृपा करावी महाराज!" इन्स्पेक्टर माने कुत्सितपणे म्हणाले. "माझा आनंदच्या खुनाशी काहीही संबंध नाही. मी एवढेच सांगेन की तुमचा तपास अगदी योग्य दिशेत सुरु आहे. महादेव आणि वामनराव हे पुर्णपणे निर्दोष आहेत आणि लवकरच तुमच्या हातात खरे खुनी सापडतील." इन्स्पेक्टर मानेंना हवे होते ते मिळाले होते त्यामुळे ते जाता जाता त्या तांत्रिकाला म्हणाले, "पुन्हा कोणाला असल्या कामात मदत करत जाऊ नका नाहीतर लॉकप मध्ये टाकावे लागेल, कळले का लव्हगुरू?" आणि ते तिथुन निघाले त्यावर तांत्रिक मनातल्या मनात हसला आणि पुन्हा डोळे बंद करून आपल्या साधनेत मग्न झाला.

"महादेव आणि वामनरावांची जबानी घेतल्यावर त्यांचा आनंदच्या खुनात सहभाग नाही हे इन्स्पेक्टर मानेंच्या लक्षात आले होतेच तांत्रिकांशी बोलल्यावर ते अधिकच स्पष्ट झाले तरीही खात्रीसाठी त्यांनी अस्मिताची पण जबानी घेण्याचे ठरवले. आनंदचे खरे खुनी पकडले जातात का? त्यांना शिक्षा होते का? शिवलकर कुटुंबीयांचा वामनरावांवरचा रोष कमी होतो का? या प्रश्नांची उत्तरे जाणण्यासाठी पुढे वाचा."