सप्तपदी भाग २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ सप्टेंबर २०१६

सप्तपदी भाग २ - मराठी कथा | Saptapadi Part 2 - Marathi Katha - Page 3

सी.सी.टी.व्ही फुटेज मधुन मिळालेला महादेवचा फोटो इन्स्पेक्टर माने बराच वेळ न्याहाळत होते. “याला कुठे तरी बघीतले आहे, पण नक्की आठवत नाही. अरे हा! आत्ता आठवले. हा तर महादेव काळे. काळे बिल्डरचा छोकरा. परवाच काळे बिल्डरच्या एका प्रोजेक्टच्या उद्घाटन प्रसंगी आमदार साहेब आले होते, आणि याचा छोकराच सगळी व्यवस्था बघत होता. पण याचा आनंदच्या खुनाशी काय संबंध? या खुनात बडी धेंडं सामील असावीत हे नक्की. ओ सावंत! त्या आनंद शिवलकर खुन प्रकरणातील चार गुंडांची फाईल काढा जरा.” इन्स्पेक्टर मानेंनी खुनाची पाळेमुळे खणुन काढण्यासाठी आपली कंबर कसली. पक्या, उमेश, इक्बाल आणि सलीम हे चौघेही सराईत गुंड होते. मारामारी, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, बलात्कार, जबरी चोरी अशा वेगवेगळ्या गुन्हांमध्ये वेळोवेळी शिक्षा भोगुन आलेले रेकॉर्ड वरील गुन्हेगार होते. त्यातला सलीम तर तडीपार होता. तो राजरोस शहरात फिरतोय आणि आपल्याला खबरही नाही ही गोष्ट इन्स्पेक्टर मानेंना चांगलीच खटकली होती. खबऱ्यांना बोलावण्यात आले. “सलीम शहरात आलाय याची खबर का नाही दिली गेली?” इन्स्पेक्टर माने गरजले. पण कोणाकडुनही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे इन्स्पेक्टर माने आणखीनच चिडले. “चौवीस तासाच्या आत मला या चौघांची खबर पाहिजे. जा कामाला लागा.” त्यांनी ऑर्डर सोडली. खबरे जाताच इन्स्पेक्टर मानेंनी आपले लक्ष महादेवकडे वळवले. वामनरावांपेक्षा त्याची चौकशी करणे तुलनेने सोपे होते. पण काळे बिल्डरही काही सामान्य माणुस नव्हता. मोठमोठ्या राजकारण्यांशी त्याची उठबस होती. पण कुठुन तरी सुरवात करणे गरजेचे होते.

मोठ्या पाठपुराव्यानंतर वरिष्ठांकडुन महादेव काळेच्या चौकशीची परवानगी मिळवुन इन्स्पेक्टर माने, काळे बिल्डर्सच्या ऑफिसला पोहोचले. महादेव काळेने इन्स्पेक्टर मानेंना ओळखले व त्यांचे स्वागत केले आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे काबुल केले. पोलीस स्टेशनला महादेव काळेची जवळ जवळ तीन तास चौकशी झाली. त्यामध्ये महादेव काळेने सी.ए. च्या ऑफिसमध्ये अस्मिताला पाहिल्यापासुन ते आनंदने तिला कसे फसवले हे बारमध्ये त्याच्याकडुन काढुन घेण्यापर्यंत; त्यानंतर तांत्रिकाच्या मदतीने अस्मिताची वशीकरणातुन मुक्तता करेपर्यंतची सगळी माहिती इन्स्पेक्टर मानेंना सांगितली. आनंदच्या खुनाबद्दल मात्र आपणास काहीही माहित नसल्याचे त्याने सांगितले. महादेव खरे बोलत असल्याचे इन्स्पेक्टर मानेंनी ओळखले पण अजुनही आनंदचे खरे खुनी कोण? हा प्रश्न अनिर्णयीतच होता. आता मोठे आव्हान होते ते म्हणजे वामनरावांनी चौकशी करणे. महादेवला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते हे वामनरावांना त्याच्याकडुन कळले आणि त्यांनी मोर्चे बांधणी सुरु केली. महादेव काळेच्या जबाबाच्या आधारावर इन्स्पेक्टर मानेंनी त्यांच्या वरिष्ठांकडुन वामनराव कुलकर्ण्यांची चौकशी करण्याचीही परवानगी मिळवली. वामनरावांनी अस्मिताला कदाचित तिचीही चौकशी होईल याची जाणीव करून दिली. “अस्मि! बाळा मला ठाऊक आहे, तु अजुन सावरली नाहीस पण यातुन तुझे बाहेर पडणे तुझ्यासाठी आणि आम्हा सर्वांसाठीही खुप गरजेचे आहे. पोलिस चौकशीसाठी येतील तेव्हा जे खरे आहे ते न घाबरता सांग. तुझा बाप इथे खंबीर उभा आहे. तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. मुळात आपण कोणताच गुन्हा केला नसल्यामुळे आपल्याला घाबरण्याचे काहीच कारण नाही.”

“महादेवच्या चौकशीतुन आनंदच्या खुनाशी वामनरावांचा संबंध असावा या आकाशने व्यक्त केलेल्या संशयाला बळ मिळते आणि वामनरावांच्या मागे पोलिसी चौकशीचे शुक्लकाष्ट लागते. इन्स्पेक्टर मानेंचा वामनरावांच्या व अस्मिताच्या जबानीवर विश्वास बसतो का? की वामनरावांना संशयाच्या बळावर अटक होते. ते जाणण्यासाठी पुढे वाचा.”