सप्तपदी भाग २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ सप्टेंबर २०१६

सप्तपदी भाग २ - मराठी कथा | Saptapadi Part 2 - Marathi Katha - Page 2

आनंदच्या खुनामागे वामनरावांचा हात असावा, असा शिवलकर कुटुंबीयांचा पक्का ग्रह झाला होता. सुडभावनेने आकाशचे रक्त उकळत होते. काही झाले तरी अस्मिता आणि वामनरावांना सुखा-सुखी जगु द्यायचे नाही असे त्याने ठरवले. दुसर्‍या दिवशी जबानीसाठी तो पोलिस स्टेशन मध्ये गेला. पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली. आनंदच्या खुनाच्यावेळी तो नेमका कुठे होता? आनंदशी त्याचे संबंध कसे होते? आनंद कुठे नोकरी करायचा? आनंदची कोणाशी दुश्मनी होती का? असे अनेक प्रश्न त्याला विचारण्यास पोलिसांनी सुरवात केली. या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याने दिली. पण तुझा कुणावर संशय आहे का? असा प्रश्न पोलिसांनी विचारल्यावर मात्र तो मनातल्या मनात आनंदित झाला कारण तो याच प्रश्नांची आतुरतेने वाट बघत होता. आपला संशय आनंदच्या सासऱ्यांवर म्हणजेच वामनरावांवर असल्याचे त्याने सांगितले. कारण विचारताच त्याने सांगितले की, “आनंद आणि अस्मिताच्या लग्नाला वामनरावांचा विरोध होता, त्यांनी अस्मिताला आपल्या इस्टेटीतुन बेदखल केले होते आणि आनंदला जीवे मारण्याची धमकीही दिली होती” असेही खोटेच सांगितले. पोलिसांच्या तपासाला आता दिशा मिळाली होती. वामनराव त्यांच्या रडारवर आले होते, पण ते काही साधारण व्यक्ती नव्हते तर एक बडी आसामी होते. पोलिसांना त्यांच्यावर हात टाकण्यापुर्वी भरपुर तयारी करावी लागणार होती, भक्कम पुरावे गोळा करावे लागणार होते. केवळ आकाशच्या जबानीवर ते त्यांची साधी चौकशीही करू शकणार नव्हते मग अटक करणे तर खुप लांबची गोष्ट राहिली.

पोलिसांनी बार मधील सी.सी.टी.व्ही फुटेज पुन्हा एकदा काळजीपुर्वक बघायला सुरवात केली. आनंदने वेटरशी वाद घालुन सगळ्यांसमोर त्याच्या कानाखाली वाजवली असल्यामुळे त्याने बदला घेण्यासाठी आनंदचा खुन केला असु शकतो ही शक्यता, सी.सी.टी.व्ही फुटेज मध्ये आनंदच्या खुनाच्या वेळी तो वेटर बार मध्येच सर्व्हिस देत असल्याचे दिसल्यावर निकालात निघाली. आणखी एक गोष्ट पोलिसांच्या ध्यानात आली ती म्हणजे बारमध्ये आनंदचे वेटरशी भांडण सुरु असताना जे लोक त्यांच्याकडे बघत होते त्यात चार सराईत गुंडही होते. त्यातील एक तर तडीपार होता. आनंद पैशाची गड्डी नाचवत असताना त्या चौघांची नजर त्याच्या गड्डीवरच होती, त्यांच्यात काही चर्चा झाली आणि आनंद बाहेर पडताच तेही त्याच्या मागोमाग निघाले. पोलिसांनी अंदाज बांधला की कदाचित या गुंडानीच आनंदचा पैशासाठी खुन केला असावा वामनरावांनी त्या गुंडाना सुपारी दिली असल्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. थोडी अजुन चौकशी करताना त्यांना समजले की आदल्या दिवशी पैसे नसल्यामुळे आनंदला बारमधुन हाकलुन देताना, कोणा एका माणसाने त्याला हवे ते द्यायला सांगुन त्याचे बिल स्वतःच्या खिशातुन भरले होते. तो माणुस आणि आनंद बराच वेळ गप्पा मारत होते आणि बिल दिल्यावर आनंदच्या पाठोपाठ तो माणुसही बारमधुन बाहेर पडला होता. त्या दिवशीचे सी.सी.टी.व्ही फुटेज तपासल्यावर आनंदसोबत बारमध्ये बसलेला महादेव पोलिसांना दिसला. इन्स्पेक्टर माने सब इन्स्पेक्टर जाधवांना म्हणाले, “त्या दिवशी आनंदकडे दारू प्यायला पैसे नव्हते आणि त्या माणसाने त्याची ओळख नसताना त्याचे बिल भरले होते आणि दुसऱ्या दिवशी आनंदाकडे अमाप पैसेही आले होते. त्या माणसाने तर ते त्याला दिले नव्हते? पण तो का देईल त्याला इतके पैसे? आनंद एखादे गुपित जाणत होता का? की जे जाणण्यासाठी त्याला दारू पाजली गेली आणि भरपुर पैसेही दिले गेले. हा गुंता अधिकाधीक वाढतच चाललाय. या सर्वांची उकल त्या माणसाला आणि त्या गुंडाना पकडल्यावरच होईल असे मला वाटते.”

“आकाशने आनंदच्या खुनामागे वामनराव कुलकर्ण्यांचा हात असावा असा संशय व्यक्त केला. वामनरावांना त्रास देणे हाच त्याचा एकमेव हेतु होता. वामनराव गजाआड होतात का? पोलिसांच्या तपासाला कोणते वळण लागले हे जाणुन घेण्यासाठी पुढे वाचा.”