सप्तपदी भाग २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ सप्टेंबर २०१६

सप्तपदी भाग २ - मराठी कथा | Saptapadi Part 2 - Marathi Katha - Page 15

महादेव त्याला म्हणाला, "तुला जेवढा त्रास द्यायचा होतास तेवढा तु देऊन झाला, आता तुझा खेळ संपलाय. तुझ्या घरच्यांना मी आधीच विश्वासात घेतले होते की तु त्यांचा आनंद नाहीस. तुला मुक्ती दिली गेली नाही तर तु उद्या त्यांनाही दगा फटका करायला कमी करणार नाहीस इतका तु उलट्या काळजाचा आहेस. काय विचार करतोयस? तुझ्या अस्थी कुठे गेल्या म्हणुन? या कलशात तुझ्या अस्थी नव्हत्याच, वामनराव त्या दुसऱ्या घाटावर विसर्जित करत आहेत. तुला मुर्ख बनवण्यासाठी तुझ्या घरात अस्थी शोधायचे मी नाटक करत होतो, तुझ्या आईनेच अस्थी असलेला कलश कपाटात मागील बाजुस आणि हा रिकामा कलश पुढे ठेवला होता. तु अस्थींसाठी माझ्या मागे यावस आणि वामनरावांना अस्थी विसर्जित करण्यासाठी वेळ मिळावा म्हणुन मी हा रिकामा कलश घेऊन पळालो कारण तु मला गाठणार याची मला जाणीव होतीच. मी वामनरावांना या सगळ्यापासुन अनभिद्न्य ठेवले कारण मला त्याच्याकडुन कोणतीही चुक व्हायला नको होती. तुझ्या आईला हे सगळे माहित होते. एव्हाना तुझा भाऊही त्यांना सामील झाला असेल." महादेवाचे बोलणे ऐकुन आनंद प्रचंड चिडला, तो महादेवच्या डोक्यात दगड घालणार इतक्यात तिथे एक दिव्य प्रकाश अवतीर्ण झाला आणि आनंद मोठ्याने किंचाळला "नाहीऽऽऽ" आनंदचा आत्मा त्या दिव्य प्रकाशात ओढला जाऊ लागला. काय घडतंय हे कळायच्या आतच आनंदचा आत्मा अनंतात विलीन झाला. दुसऱ्या घाटावर आकाशने आपल्या भावाच्या अस्थी अगदी योग्य वेळी विसर्जित केल्या होत्या. आनंदचा आत्मा पुढच्या प्रवासाला लागला आणि त्याने उचललेला दगड धाडकन महादेवच्या पुढ्यात पडला. महादेव वेळीच बाजुला झाल्यामुळे वाचला नाहीतर त्याचा कपाळमोक्षच व्हायचा. वामनराव आणि महादेवच्या प्रयत्नांनी अस्मिताची त्या दुष्टचक्रातुन कायमची सुटका झाली. पुन्हा एकदा आपल्या अक्कलहुशारीने महादेवने परिस्थितीवर मात केली होती आणि त्या जीवघेण्या संकटातुन सर्वानाच मुक्ती मिळवून दिली होती.

आकाश आणि सुमनला वामनरावांनी आपल्या ऑफिसमध्ये नोकरी दिली, आणि त्याची आर्थिक घडी व्यवस्थित लावुन दिली. ते दोघेही इमाने इतबारे त्यांच्याकडे नोकरी करू लागले. आकाशच्या वडिलांचा इलाजही त्यांनी स्वखर्चाने करवला. पुढे शिवलकर कुटुंबाला सुखाचे दिवस आले. ग्रॅज्युएशन मध्ये डिस्टिंक्शन मिळाल्यावर अस्मिताने पुढे सी.ए ची परीक्षाही चांगल्या मार्कांनी पास होऊन स्वतःची फर्म टाकली. शेवटी महादेव अस्मिताचे मन जिंकण्यात यशस्वी झालाच. योग्य वेळ आल्यावर दोन्ही कुटुंबांच्या शुभाशीर्वादाने महादेव आणि अस्मिताचे लग्न मोठ्या थाटा-माटात पार पडले. वामनरावांना त्यांच्या लाडक्या अस्मिसाठी जसा अनुरूप जावई हवा होता, महादेव अगदी तसाच होता. आपली अस्मि सुखात आहे हे पाहुन वामनराव आणि त्यांच्या पत्नीची काळजी मिटली. आपल्या लेकीचा हात आपण योग्य मुलाच्या हातात दिल्याचे समाधान वामनराव व त्यांच्या पत्नीच्या मुखावर विलसत होते.आनंद बाप बनण्यास असमर्थ असल्यामुळे अस्मिताला दिवस गेले नव्हते हे उत्तमच झाले. महादेवच्या आई वडिलांनी आपल्या मुलाच्या सुखासाठी या लग्नाला कोणताच आक्षेप घेतला नाही. पुढे आपल्या वागणुकीने अस्मिताने त्यांचे मन जिंकुन घेतल्यामुळे तेही तिला आपल्या मुलीप्रमाणे वागवु लागले. अशा रीतीने आनंद नावाचं ग्रहण आयुष्यातुन दूर झाल्यावर सगळ्यांच्याच आयुष्यात सुख आणि समाधान उदयास आले.

“आपला पाल्य कुठे जातो? त्याचे मित्र कोण आहेत? कोणाशी त्याची उठबस आहे याची माहिती प्रत्येक आई वडिलांनी ठेवणे गरजेचे आहे. मुलांवर कडक बंधने न घालता प्रेमाने योग्य अयोग्य गोष्टींची जाणीव करून दिली पाहिजे म्हणजे ते आपसुकच शिस्तीत वागतील. ठराविक वयानंतर मुलांशी मित्रत्वाचे नाते ठेवले तर ते कोणतीच गोष्ट आपल्या आई वडिलांपासुन लपवुन ठेवणार नाहीत आणि निकोप नात्यामुळे कोणत्याही वाईट प्रवृत्तीचा बळी जाणार नाहीत किंवा व्यसनाधीनतेकडेही वळणार नाहीत. अस्मिता सुदैवी ठरली जी यातुन वाचली. प्रत्येक मुल असे सुदैवी असेलच असे नाही त्यामुळे सतर्क राहा! सुरक्षित राहा! आपल्या सावधानतेतच आपल्या कुटुंबाची सुरक्षा आहे.”